दोन-चार वळणे पार केली आणि कमरू नाग मंदिराचा प्रशस्त परिसर नजरेस पडला. हुश्श! पोहोचलो एकदाचा. डोंगर माथ्यावर एक सपाट प्रदेश होता. एका कोपऱ्यात मंदिर होते. तर त्याच्या समोरच एक तळे होते. तळ्याच्या बाजूने गोलाकार एक पायवाट बांधलेली होती. पलीकडच्या बाजूने आणखी एक वाट मंदिराकडे येताना दिसत होती. ही तीच वाट जी देवीधार आणि शिकारी देवीच्या मंदिराकडून येते. इथून बरेच लोक येताना दिसत होते. तळ्याच्या कडेने काही थोडीफार दुकाने आणि ढाबे होते. फारशी गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी लोकांचा राबता होता. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता. मी मंदिराच्या दिशेने निघालो. हेही मंदिर म्हणजे एक लहानसा चौथराच होता. देवाची मूर्ती म्हणजे एका चौकोनी दगडावर देवाची आकृती कोरलेली होती. चौथऱ्यावर छप्पर उभारले होते. सगळा अतिशय साधा प्रकार होता. पण तरीही फार छान वाटत होतं. मी दर्शन घेतलं आणि बाजूचे तळे निरखू लागलो. या तळ्यात लोकं पैसे, दागिने, वगैरे वस्तू टाकतात देवाला अर्पण करण्यासाठी. असं म्हणतात की या तळ्यात शेकडो करोडो रुपयांची संपत्ती आहे. मात्र त्याला कोणी हात लावत नाही. यातली संपत्ती कोणी बाहेर काढायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर अतिशय वाईट परिस्थिती ओढवते म्हणे. असो.
अपरिचित हिमाचल – भाग ३ – जंझेली ते रोहांडा | Unexplored Himachal – Part 3 – Janjheli to Rohanda
चैल-चौक वरून करसोगच्या दिशेने जाणारा आणखी एक फाटा फुटतो. रोहांडाला जायला हाच रस्ता घ्यायचा होता. जसे चैल-चौक सोडले तसा रस्ता पुन्हा डोंगरावर चढू लागला. हिमाचल मधल्या डोंगररांगा एकसलग नाहीत. सतलज, बियास, तीर्थन, अशा नद्यांनी प्रचंड दऱ्या निर्माण केल्या आहेत. तसेच अधे-मधे काही पठारी प्रदेशही आहेत. जशी उंची बदलते तशी भूदृश्ये, वातावरण, झाडांचे प्रकार, पिके सारे काही बदलते. फिरता फिरता हे सारे बदल पाहणे म्हणजे एक रोचक अनुभव असतो. एव्हाना उन्हं उतरणीला लागली होती. गर्द झाडीतून झिरपणारा सोनेरी प्रकाश मोहक वाटत होता. वाटेत प्रत्येक वळणाला भूदृश्य पालटत होते. किती ठिकाणी थांबू आणि किती फोटो काढू असं झालं होतं. वाटेतल्या सृष्टिसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत एकदाचा रोहांडाला पोहोचलो.
अपरिचित हिमाचल – भाग २ – शिकारी देवी | Unexplored Himachal – Part 2 – Shikari Devi
शिकारी देवीचे हे मंदिर अतिशय प्राचीन मानले जाते. रोचक बाब अशी की या मंदिरावर कायमस्वरूपी छप्पर नाही. लोकांनी बऱ्याचदा मंदिरावर छप्पर बांधायचा प्रयत्न केला. पण ते कधीच टिकले नाही. आणि गंमत अशी की या जागी प्रचंड बर्फ पडत असूनही देवीच्या मूर्तीवर कधीच बर्फ साचत नाही. खरं-खोटं त्या देवीस ठाऊक. या देवीचे स्थानमाहात्म्य महाभारत काळापासूनचे. असं म्हणतात की पांडव कौरवांसोबत द्यूत खेळायला सुरुवात करणार होते तेव्हा शिकारी देवी एका सामान्य स्त्रीच्या रूपात तिथे आली आणि तिने पांडवांना द्यूत खेळू नका, याने तुम्ही सर्वस्व गमावाल असा इशारा दिला. मात्र पांडवांनी तिच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि खेळ सुरू केला. या द्यूतात पांडव नुसते हरलेच नाहीत तर त्यांना वनवास आणि अज्ञातवासही भोगावा लागला. एका अर्थाने देवीचा इशारा खरा ठरला.
अपरिचित हिमाचल – भाग १ – जंझेली | Unexplored Himachal – Part 1 – Janjheli
आसेतूहिमाचल असे वर्णन असणाऱ्या आपल्या देशासाठी हिमालय म्हणजे एक वरदानच. हा हिमालय केवळ भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्टयांसाठी नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक वैशिष्टयांसाठीही महत्त्वाचा आहे. याच हिमालयाच्या कुशीत वसलेली दोन राज्ये – हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड – देवभूमी असे बिरुद मिरावतात. आणि हे बिरुद या दोन्ही राज्यांसाठी तितकेच सार्थ आहे. उत्तराखंडमधली देवस्थाने, जसे की केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, तुंगनाथ, हेमकुंड साहिब, ही जगप्रसिद्ध आहेत. तुलनेने हिमाचल प्रदेशातली देवस्थाने तितकी प्रसिद्ध नाहीत. स्थानिक लोकांच्या पलीकडे यांच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही. एका अर्थाने बरेच आहे. नाहीतर यांचाही केदारनाथ व्हायला वेळ लागणार नाही. असो. आज अशाच तुलनेने अल्पप्रसिद्ध असणाऱ्या दोन देवस्थानांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती आहेत शिकारी देवी आणि कमरू नाग.
नयनरम्य बाली – भाग ११ – अलविदा बाली Beautiful Bali – Part 11 – Goodbye Bali
युरोपियन लोकांची ही फिरण्याची तऱ्हा मला कायमच अचंबित करते. हे लोक फिरतात ते जग समरसून अनुभवण्यासाठी. उगीच पळापळ नाही. आणि ग्रुपने येऊन अंताक्षरी किंवा हाऊजी असला धांगडधिंगा नाही. आपलं आपण फिरायचं, स्थानिक लोकांची जीवनपद्धती बघायची, फोटो वगैरे काढायचे आणि एक समृद्ध अनुभव गाठीशी बांधून परत जायचं. मला कधी असं फिरायला जमेल का याचा विचार मी करू लागलो. पण लक्षात आलं की आपला पिंडच मुळी भटका आहे. एका जागी असे दोन-चार दिवस काही न करता घालवणं हे सर्वथा अशक्य आहे. असो. ज्याची त्याची फिरण्याची तऱ्हा न्यारी. मी काकांना विचारलं तुमचं इनस्टाग्राम किंवा फेसबुक वर प्रोफाइल आहे का. यावर ते हसायला लागले. या नव्या पिढीच्या गोष्टी काही जमत नाहीत आपल्याला असं सांगू लागले. मला एकदम आई-बाबांची आठवण झाली. देश कोणताही असो माणसं सारखीच असतात. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला मुठीत घेऊन जगभर संचार करणारी आमची पिढी आणि त्याच तंत्रज्ञानाच्या मागे न धावताही आयुष्यातले सगळे क्षण भरभरून जगणारी ही मागची पिढी. काय गंमत आहे नाही!
Beautiful Bali – Part 9 – The dark road to Kintamani | नयनरम्य बाली – भाग ९ – किंतामानीची अंधारवाट
एक वळण घेतलं आणि समोरचं दृश्य बघून मी हबकलोच. स्कूटर बाजूला लावली आणि रस्त्याच्या कडेला आलो. समोर विशाल दरी दिसत होती. आणि त्यात तीन त्रिकोणी डोंगर दिमाखात उभे दिसत होते. हेच ते तीन ज्वालामुखी – अगुंग, अबांग, आणि बतूर. अस्ताला जाणार्या सूर्याची प्रभा अवघ्या आसमंतात फोफावली होती. निळा, केशरी, लाल, राखाडी अशा काहीशा रंगांचे मिश्रण असावे तसे आकाश दिसत होते. थंड हवेचे लोट दरीतून उसळून वर झेपावत होते. समोरची दरी म्हणजे बतूर ज्वालामुखीचा caldera होता. उद्या याच ज्वालामुखीवर चढाई करायला जायचं होतं. इथे उभा राहून मी जणू काही त्या डोंगराला नमन करत होतो. चुकलेल्या रस्त्याने मला त्या अद्भुत जागी आणून ठेवलं होतं. आणि त्या डोंगरांचे मला दर्शन घडावे म्हणूनच जणू काही सूर्य क्षितिजावर रेंगाळला होता. माझ्या अंगावर शहारे उमटले. दिव्यत्वाची अनुभूती ती हीच का?
Beautiful Bali – Part 8 – Ulun Danu temple and Sekempul waterfall | नयनरम्य बाली – भाग ८ – उलून दानू मंदिर आणि सेकंपुल धबधबा
उलून दानू म्हणजे बाली मधले एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ. बेरातान सरोवराच्या काठाशी असलेल्या या मंदिराने देशोदेशीच्या पर्यटकांना भुरळ घातली आहे. किंबहुना हे मंदिर म्हणजे बालीची ओळख बनून राहिले आहे. सतराव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर पाण्याची देवता दानू हिच्यासाठी बांधले गेले आहे. इथे काही बौद्ध आणि हिंदू देवतांची पूजास्थाने आहेत. दुपारची वेळ असल्याने मंदिरात विशेष गर्दी नव्हती. मंदिराचा प्रशस्त परिसर उठून दिसत होता. इथेही मंदिराच्या आतल्या भागात जायला परवानगी नव्हतीच. आजूबाजूचा सगळा परिसर सुंदर फुलझाडांनी सुशोभित केलेला होता. तेवढ्यात दृष्टीस पडले ते मंदिराचे मुख्य आकर्षण – पाण्याच्या मधोमध असलेले उतरत्या छपरांचे दोन मनोरे. हे दोन मनोरे सरोवराच्या आत असलेल्या एक लहानशा बेटावर उभारले आहेत. बेटाचा पृष्ठभाग अगदी सपाट असल्याने हे मनोरे अक्षरशः पाण्यात तरंगत असल्यासारखे वाटतात.
Beautiful Bali – Part 7 – Architectural beauty of Balinese temples | नयनरम्य बाली – भाग ७ – बालीतील मंदिरांचे स्थापत्यसौंदर्य
आता वेळ आली होती मंदिरदर्शनाची. बाली जितकं समुद्रकिनार्यांसाठी प्रसिद्ध आहे तितकंच इथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. इथली मंदिरे भारतातल्या मंदिरांपेक्षा एकदम वेगळी असतात. मंडप, गाभारा, कळस, मूर्ती असं काहीच त्यांत नसतं. असते ते एक मोठे प्रांगण. हे प्रांगण तीन भागांत विभागलेले असते, ज्यांना मंडल म्हणतात. त्यांपैकी बाहेरचा भाग म्हणजे निष्टा मंडल किंवा जाबा. हा भाग कमी पवित्र मानला जातो. या भागात बाले कुलकुल म्हटले जाणारे ढोल लटकवलेले मनोरे असतात. हा ढोल वाजवून गावकर्यांना घोषणा करण्यासाठी एकत्र बोलावले जाते.
Beautiful Bali – Part 6 – In Ubud | नयनरम्य बाली – भाग ६ – मुक्काम पोस्ट ऊबुद
ऊबुद म्हणजे बालीची सांस्कृतिक राजधानी. बालीच्या मध्यवर्ती भागात काहीशा डोंगराळ भागात वसलेले हे शहर इथल्या योग प्रशिक्षण केंद्रांसाठी आणि वीगन खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथली काही प्रसिद्ध मंदिरे, भातशेती, पुरातन राजवाडे आणि वस्तुसंग्रहालये या शहराच्या सौंदर्यात भर घालतात. या जागेचा इतिहास अगदी आठव्या शतकापर्यंत जातो. त्या काळी जावा बेटावरून ऋषि मार्कंडेय इथे आले आणि इथल्या दोन नद्यांच्या संगमाजवळ त्यांनी ध्यानधारणा केली. पुढे त्यांनी त्या जागी गुनुंग लेबाह या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून या जागेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
Beautiful Bali – Part 5 – Nusa Lembongan and snorkelling adventure | नयनरम्य बाली – भाग ५ – नुसा लेंबोंगान आणि स्नोर्केलिंगचा थरार
हळू हळू धीर करून मी पाण्यात उडी मारली. दोन्ही हातांनी त्या चौकटीला घट्ट पकडून चेहरा पाण्याखाली नेला. आणि काय ते दृश्य! रंगीबेरंगी प्रवाळ आणि त्यावर पोहणारे लहान-लहान मासे! त्यातले धमक पिवळ्या रंगाचे प्रवाळ तर फारच आकर्षक दिसत होते. त्यांचे आकार तर कित्ती वेगवेगळे! काही हातातल्या पंख्यासारखे, काही काटेरी झुडुपांसारखे, काही गोल स्पंजसारखे, तर काही वळवळणार्या सापासारखे. सगळे दृश्य अगदी डिस्कवरी चॅनेल वर दाखवतात तसे दिसत होते. काश माझ्याकडे गो-प्रो असता!