नयनरम्य बाली – भाग ९ – किंतामानीची अंधारवाट Beautiful Bali – Part 9 – The dark road to Kintamani

एक वळण घेतलं आणि समोरचं दृश्य बघून मी हबकलोच. स्कूटर बाजूला लावली आणि रस्त्याच्या कडेला आलो. समोर विशाल दरी दिसत होती. आणि त्यात तीन त्रिकोणी डोंगर दिमाखात उभे दिसत होते. हेच ते तीन ज्वालामुखी – अगुंग, अबांग, आणि बतूर. अस्ताला जाणार्‍या सूर्याची प्रभा अवघ्या आसमंतात फोफावली होती. निळा, केशरी, लाल, राखाडी अशा काहीशा रंगांचे मिश्रण असावे तसे आकाश दिसत होते. थंड हवेचे लोट दरीतून उसळून वर झेपावत होते. समोरची दरी म्हणजे बतूर ज्वालामुखीचा caldera होता. उद्या याच ज्वालामुखीवर चढाई करायला जायचं होतं. इथे उभा राहून मी जणू काही त्या डोंगराला नमन करत होतो. चुकलेल्या रस्त्याने मला त्या अद्भुत जागी आणून ठेवलं होतं. आणि त्या डोंगरांचे मला दर्शन घडावे म्हणूनच जणू काही सूर्य क्षितिजावर रेंगाळला होता. माझ्या अंगावर शहारे उमटले. दिव्यत्वाची अनुभूती ती हीच का?