अपरिचित हिमाचल – भाग ३ – जंझेली ते रोहांडा | Unexplored Himachal – Part 3 – Janjheli to Rohanda

चैल-चौक वरून करसोगच्या दिशेने जाणारा आणखी एक फाटा फुटतो. रोहांडाला जायला हाच रस्ता घ्यायचा होता. जसे चैल-चौक सोडले तसा रस्ता पुन्हा डोंगरावर चढू लागला. हिमाचल मधल्या डोंगररांगा एकसलग नाहीत. सतलज, बियास, तीर्थन, अशा नद्यांनी प्रचंड दऱ्या निर्माण केल्या आहेत. तसेच अधे-मधे काही पठारी प्रदेशही आहेत. जशी उंची बदलते तशी भूदृश्ये, वातावरण, झाडांचे प्रकार, पिके सारे काही बदलते. फिरता फिरता हे सारे बदल पाहणे म्हणजे एक रोचक अनुभव असतो. एव्हाना उन्हं उतरणीला लागली होती. गर्द झाडीतून झिरपणारा सोनेरी प्रकाश मोहक वाटत होता. वाटेत प्रत्येक वळणाला भूदृश्य पालटत होते. किती ठिकाणी थांबू आणि किती फोटो काढू असं झालं होतं. वाटेतल्या सृष्टिसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत एकदाचा रोहांडाला पोहोचलो.

अपरिचित हिमाचल – भाग २ – शिकारी देवी | Unexplored Himachal – Part 2 – Shikari Devi

शिकारी देवीचे हे मंदिर अतिशय प्राचीन मानले जाते. रोचक बाब अशी की या मंदिरावर कायमस्वरूपी छप्पर नाही. लोकांनी बऱ्याचदा मंदिरावर छप्पर बांधायचा प्रयत्न केला. पण ते कधीच टिकले नाही. आणि गंमत अशी की या जागी प्रचंड बर्फ पडत असूनही देवीच्या मूर्तीवर कधीच बर्फ साचत नाही. खरं-खोटं त्या देवीस ठाऊक. या देवीचे स्थानमाहात्म्य महाभारत काळापासूनचे. असं म्हणतात की पांडव कौरवांसोबत द्यूत खेळायला सुरुवात करणार होते तेव्हा शिकारी देवी एका सामान्य स्त्रीच्या रूपात तिथे आली आणि तिने पांडवांना द्यूत खेळू नका, याने तुम्ही सर्वस्व गमावाल असा इशारा दिला. मात्र पांडवांनी तिच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि खेळ सुरू केला. या द्यूतात पांडव नुसते हरलेच नाहीत तर त्यांना वनवास आणि अज्ञातवासही भोगावा लागला. एका अर्थाने देवीचा इशारा खरा ठरला.

अपरिचित हिमाचल – भाग १ – जंझेली | Unexplored Himachal – Part 1 – Janjheli

आसेतूहिमाचल असे वर्णन असणाऱ्या आपल्या देशासाठी हिमालय म्हणजे एक वरदानच. हा हिमालय केवळ भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्टयांसाठी नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक वैशिष्टयांसाठीही महत्त्वाचा आहे. याच हिमालयाच्या कुशीत वसलेली दोन राज्ये – हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड – देवभूमी असे बिरुद मिरावतात. आणि हे बिरुद या दोन्ही राज्यांसाठी तितकेच सार्थ आहे. उत्तराखंडमधली देवस्थाने, जसे की केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, तुंगनाथ, हेमकुंड साहिब, ही जगप्रसिद्ध आहेत. तुलनेने हिमाचल प्रदेशातली देवस्थाने तितकी प्रसिद्ध नाहीत. स्थानिक लोकांच्या पलीकडे यांच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही. एका अर्थाने बरेच आहे. नाहीतर यांचाही केदारनाथ व्हायला वेळ लागणार नाही. असो. आज अशाच तुलनेने अल्पप्रसिद्ध असणाऱ्या दोन देवस्थानांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती आहेत शिकारी देवी आणि कमरू नाग.