दोन-चार वळणे पार केली आणि कमरू नाग मंदिराचा प्रशस्त परिसर नजरेस पडला. हुश्श! पोहोचलो एकदाचा. डोंगर माथ्यावर एक सपाट प्रदेश होता. एका कोपऱ्यात मंदिर होते. तर त्याच्या समोरच एक तळे होते. तळ्याच्या बाजूने गोलाकार एक पायवाट बांधलेली होती. पलीकडच्या बाजूने आणखी एक वाट मंदिराकडे येताना दिसत होती. ही तीच वाट जी देवीधार आणि शिकारी देवीच्या मंदिराकडून येते. इथून बरेच लोक येताना दिसत होते. तळ्याच्या कडेने काही थोडीफार दुकाने आणि ढाबे होते. फारशी गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी लोकांचा राबता होता. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता. मी मंदिराच्या दिशेने निघालो. हेही मंदिर म्हणजे एक लहानसा चौथराच होता. देवाची मूर्ती म्हणजे एका चौकोनी दगडावर देवाची आकृती कोरलेली होती. चौथऱ्यावर छप्पर उभारले होते. सगळा अतिशय साधा प्रकार होता. पण तरीही फार छान वाटत होतं. मी दर्शन घेतलं आणि बाजूचे तळे निरखू लागलो. या तळ्यात लोकं पैसे, दागिने, वगैरे वस्तू टाकतात देवाला अर्पण करण्यासाठी. असं म्हणतात की या तळ्यात शेकडो करोडो रुपयांची संपत्ती आहे. मात्र त्याला कोणी हात लावत नाही. यातली संपत्ती कोणी बाहेर काढायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर अतिशय वाईट परिस्थिती ओढवते म्हणे. असो.
नयनरम्य बाली – भाग १० – बतूर ज्वालामुखीवर आरोहण Beautiful Bali – Part 10 – Hike to Batur volcano
बालीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले ज्वालामुखी. एकंदरीत इंडोनेशियामध्ये १३९ ज्वालामुखी आहेत. हा सगळं देशच pacific ring of fire वर वसलेला आहे. त्यामुळे वरचेवर भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक या गोष्टी इथे सामान्य आहेत. बाली मध्ये एकूण चार ज्वालामुखी आहेत. त्यांपैकी अगुंगचा उद्रेक २०१९ मध्ये झाला होता. आणि त्याचा उद्रेक हा अजूनही सुरू आहे. बतूर हादेखील जागृत ज्वालामुखी आहे. त्याचा शेवटचा उद्रेक २००० साली झाला होता. बाकीचे एक तर मृत आहेत किंवा अर्धमृत आहेत. किंतामानी हे गाव बतूरच्या caldera मध्येच वसले आहे. बतूरवर चढाई करण्यासाठीच मी इथे मुक्काम केला होता. बतूरवर चढाई ही बालीमधली एक अत्यंत लोकप्रिय गोष्ट आहे. असंख्य पर्यटक इथे सूर्योदय बघण्यासाठी रात्री चढाई करतात. त्यासाठी नियोजित गाइडेड ट्रेक असतात. असाच एक ट्रेक जॉइन करायचा माझा विचार होता. तशी आगाऊ सूचनादेखील मी हॉस्टेलला दिली होती.
कुद्रेमुखची रानवाट – भाग १ – तोंडओळख आणि ट्रेकची सुरुवात | Kudremukh Trek – Part 1 – Introduction and start of the trek
कुद्रेमुख हे एक १८९४ मीटर उंचीचे शिखर. हे कर्नाटकातल्या चिकमगळूर जिल्ह्यात येते. इथल्या कमी उंचीवरच्या टेकड्यांवर आणि दऱ्यांमध्ये घनदाट पर्जन्यवने आहेत तर अधिक उंचीवरच्या पठारी भागावर गवताळ वने आढळतात. या गवताळ प्रदेशास शोला ग्रासलँड असे संबोधतात. पावसाळ्यात हा गवताळ प्रदेश हिरव्यागार कुरणांनी बहरून जातो. पश्चिम घाटातली ही एकमेकाद्वितीय अशी परिसंस्था अनेक प्रदेशनिष्ठ सजीवांना आसरा देते. उदाहरणच द्यायचे झाले तर वान्दरू (Lion-tailed macaque; Macaca silenus) हे वानर केवळ केरळ आणि कर्नाटक राज्यांतील पर्जन्यवनांत आढळते. या वानराचा कुद्रेमुख म्हणजे सगळ्यात उत्तरेकडचा अधिवास. वानराची ही प्रजात संकटग्रस्त अवस्थेत आहे. त्यामुळेच हा सगळा प्रदेश राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेला आहे. याव्यतिरिक्त मलबार जायंट स्क्विरल, बायसन, अस्वल, बिबट्या असे असंख्य प्राणी आणि औषधी वनस्पती व रानफुले इथे आढळतात. अशा संपन्न प्रदेशात ट्रेकिंग करायला मी फारच उत्सुक होतो.