अपरिचित हिमाचल – भाग ३ – जंझेली ते रोहांडा | Unexplored Himachal – Part 3 – Janjheli to Rohanda

खरे तर शिकारी देवी आणि कमरू नाग ही दोन्ही देवस्थाने एकाच डोंगररांगेवर आहेत. बरेचसे स्थानिक भक्तगण पायी या दोन्ही देवस्थानांना भेट देतात. मात्र हा जवळपास १६ किमीचा ट्रेक आहे. जंझेलीहून सुरू होऊन हा ट्रेक कमरू नागच्या देवळावरून थेट करसोग जवळच्या रोहांडा गावात उतरतो. घनदाट अरण्यातून जाणारा हा ट्रेक म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच. माझी फार इच्छा होती हा ट्रेक करायची. पण ना तितका वेळ होता ना संसाधने. त्यामुळे मी रोहांडापर्यन्त बाईकनेच जायचे ठरवले. जंझेली ते रोहांडा असा गाडी रस्ता जवळपास १०० किमी होता. एकाच डोंगररांगेला एवढा मोठा वळसा घालून जावे लागत होते. पण दुसरा काही पर्याय नव्हता. आज संध्याकाळ पर्यन्त रोहांडाला पोहोचायचे, तिथे मुक्काम करायचा, आणि दुसऱ्या दिवशी कमरू नागचे दर्शन घ्यायचे असे ठरवले. जंझेलीहून निघालो तेव्हा वातावरण फारच सुखद होते. जंझेलीच्या दरीतली भूदृश्ये अतिशय मोहक दिसत होती. मुक्काम गाठायची काही घाई नव्हती. मग रमत-गमत निघालो.

जंझेली ते रोहांडा मार्गावरचे सुंदर दृश्य

वाटेत एक फलक दिसला – सेराज मनरेगा पार्क. म्हटलं बघूयात तरी काय प्रकार आहे. मुख्य रस्त्यावरून दोनेक किमी आत हे एक उद्यान होते. एका डोंगरमाथ्यावर मनरेगा योजने अंतर्गत एक छानसा पिकनिक स्पॉट विकसित केलेला होता. पाईन आणि देवदार वृक्षांची दाट झाडी, मध्यात एक लहानसे मंदिर, एक तळे, लहान मुलांना खेळायला एक उद्यान, आणि एक कॅफे अशी टुमदार रचना या पार्कची होती. माता बागलामुखीचे एक प्राचीन मंदिर इथे होते. पन्नास रुपयाचे तिकीट काढून मी आत शिरलो. सगळा परिसर अतिशय नीटनेटका ठेवला होता. डोंगराच्या नैसर्गिक रचनेचा कल्पक उपयोग करून आतल्या गोष्टी विकसित केल्या होत्या. दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती. देवीच्या मंदिरामागून एक पायवाट आणखी वर रानात जात होती. मी तिथून वर गेलो. इथले रान तर अगदीच गूढरम्य वाटत होते. वाटेच्या शेवटी आणखी एक मंदिर होते. स्थानिक पारंपरिक शैलीत बांधलेले हे मंदिर अगदीच रम्य वाटत होते. तिथे थोडेफार फोटो काढून आणि पार्कमधल्या कॅफे मध्ये थोडा चहा घेऊन पुढे निघालो. वाटेत एका ठिकाणी थांबून जेवण केले. चैल-चौक ला पोहोचलो तेव्हा दुपारचे चार वाजले होते.

मनरेगा पार्कमधील सुंदर विकसित केलेल्या जागा
पार्कमधील उंचावरचे गूढरम्य मंदिर

चैल-चौक वरून करसोगच्या दिशेने जाणारा आणखी एक फाटा फुटतो. रोहांडाला जायला हाच रस्ता घ्यायचा होता. जसे चैल-चौक सोडले तसा रस्ता पुन्हा डोंगरावर चढू लागला. हिमाचल मधल्या डोंगररांगा एकसलग नाहीत. सतलज, बियास, तीर्थन, अशा नद्यांनी प्रचंड दऱ्या निर्माण केल्या आहेत. तसेच अधे-मधे काही पठारी प्रदेशही आहेत. जशी उंची बदलते तशी भूदृश्ये, वातावरण, झाडांचे प्रकार, पिके सारे काही बदलते. फिरता फिरता हे सारे बदल पाहणे म्हणजे एक रोचक अनुभव असतो. एव्हाना उन्हं उतरणीला लागली होती. गर्द झाडीतून झिरपणारा सोनेरी प्रकाश मोहक वाटत होता. वाटेत प्रत्येक वळणाला भूदृश्य पालटत होते. किती ठिकाणी थांबू आणि किती फोटो काढू असं झालं होतं. वाटेतल्या सृष्टिसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत एकदाचा रोहांडाला पोहोचलो.

रोहांडा गावाजवळचे रम्य दृश्य
वाटेतले काही क्षण

हे गाव कमी आणि वाडी-वस्ती जास्त वाटत होती. दोन-चार उपहारगृहे, एक सरकारी कार्यालय, आणि वीसेक घरे, संपले गाव. मुख्य चौकाच्या बाजूलाच एक शाळा होती. तिथूनच कमरू नागच्या देवळाकडेकडे जाणारा मार्ग दिसत होता. आता इथे मला एखादे हॉटेल किंवा होम स्टे शोधायचा होता. समोरच्या चहावाल्याला विचारले तर त्याने एका घराकडे बोट दाखवले. घराच्या खालीच एक ढाबा होता. ढाब्यावर एक बाई होती. तिला विचारलं. ती म्हणाली रूम तर आहे पण सेवा देणारी कोणी माणसं उपलब्ध नाहीत. मी वर जाऊन खोल्या बघून आलो. पण व्यवस्था अगदीच सुमार होती. परत काही लागलं तर विचारायचं कोणाला? मग अजून काही पर्याय आहेत का म्हणून शोधायला बाहेर पडलो. संपूर्ण गावात दोन चकरा मारल्या पण बाकी काही पर्याय मिळेनात. गावातल्या सरकारी कार्यालयाबाहेर एक पोलिस उभा होता. त्याला विचारलं. मग त्याने गावापासून पुढे ५ किमी अंतरावर एक होम स्टे असल्याचं सांगितलं. मग मी थेट तिथे निघालो. नशिबाने होम स्टे लगेचच सापडला. इथेही व्यवस्था सुमारच होती. पण इथून दरीचा व्यू सुंदर दिसत होता. शिवाय सोबतच ढाबा होता. आता अंधारही पडू लागला होता. शेवटी तिथेच थांबायचा निर्णय घेतला. दिवसभराच्या दगदगीने थकायला झालं होतं. लवकर जेवण केलं आणि झोपी गेलो. पुढच्या दिवशी कमरू नागचा ट्रेक करायचा होता.

होम स्टेच्या मागची दरी

सकाळी बरोब्बर साडेसहाला उठलो. पटापट आवरलं आणि रोहांडा गावाकडे निघालो. गाव तर अजून झोपलेलंच होतं. कमरू नागच्या मंदिराकडे जाणारा जिना एका बाजूने दिसत होता. त्यावर लिहलं होतं मंदिर ५.५ किमी. मी म्हटलं साडेपाच किमी म्हणजे फार तर फार दोन तास. आत्ता साडेसात झालेत. आपण बारा वाजेपर्यंत सहज खाली येऊ. मग लगेचच सोलनला परत जाता येईल आणि उद्याचा सुट्टीचा दिवस आराम करता येईल. मोठ्या उत्साहात मी हर हर महादेव म्हटलं आणि वर चढायला सुरुवात केली. हवेत कमालीचा गारवा होता. पण उन्हं वर आली होती. आकाश स्वच्छ निळं दिसत होतं. गावातली काही मोजकी घरं आणि शाळा मागे पडल्या. थोड्याच वेळात ती वाट थेट रानात शिरली. एक टेकाड चढून वर आलो. इथून पुढे वाट नक्की कोणत्या दिशेने जातेय ते कळत नव्हतं. कुणाला विचारावं तर आसपास कुणीच नव्हतं. थोडा वेळ तिथेच घुटमळलो. इतक्यात काही लोकांचा आवाज ऐकू आला. बघतो तर बायकांचा एक मोठा ग्रुप भजनं म्हणत वर चालला होता. त्यांच्यासोबत एक-दोन पुरुष आणि काही लहान मुलेही होती. म्हटलं बरं झालं. आता यांच्या पाठोपाठ जाऊ. म्हणजे रस्ता चुकायला नको. आणि वर चढायचा वेगही ठीक राहील. बायकांचा उत्साह जबरदस्त होता. एवढा चढणीचा मार्ग असूनही त्या सुरात भजनं गात होत्या. पुढे चालणारा एक पुरुष सोबत एक बकरी घेऊन चालला होता. हिमाचलच्या अंतर्गत भागात देवाच्या ठिकाणी अजूनही प्राण्यांचे बळी दिले जातात हे ऐकून होतो. पण आज प्रत्यक्षात बघत होतो. त्या ग्रुपच्या पुढे-मागे फोटो काढत आणि विडियो शूट करत मी वर चढू लागलो.

ट्रेकच्या सुरुवातीचे दृश्य

क्रमशः

8 thoughts on “अपरिचित हिमाचल – भाग ३ – जंझेली ते रोहांडा | Unexplored Himachal – Part 3 – Janjheli to Rohanda

  1. खूप सुंदर वर्णन! पुढच्या भागाची उत्सुकता लागली आहे!

  2. अवर्णनीय वर्णन केलेस . फोटोवरून नजर हलवावीशी वाटत नाही. “ये कौन चित्रकार है?चित्रकार…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *