अपरिचित हिमाचल – भाग १ – जंझेली | Unexplored Himachal – Part 1 – Janjheli

आसेतूहिमाचल असे वर्णन असणाऱ्या आपल्या देशासाठी हिमालय म्हणजे एक वरदानच. हा हिमालय केवळ भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्टयांसाठी नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक वैशिष्टयांसाठीही महत्त्वाचा आहे. याच हिमालयाच्या कुशीत वसलेली दोन राज्ये – हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड – देवभूमी असे बिरुद मिरावतात. आणि हे बिरुद या दोन्ही राज्यांसाठी तितकेच सार्थ आहे. उत्तराखंडमधली देवस्थाने, जसे की केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, तुंगनाथ, हेमकुंड साहिब, ही जगप्रसिद्ध आहेत. तुलनेने हिमाचल प्रदेशातली देवस्थाने तितकी प्रसिद्ध नाहीत. स्थानिक लोकांच्या पलीकडे यांच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही. एका अर्थाने बरेच आहे. नाहीतर यांचाही केदारनाथ व्हायला वेळ लागणार नाही. असो. आज अशाच तुलनेने अल्पप्रसिद्ध असणाऱ्या दोन देवस्थानांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती आहेत शिकारी देवी आणि कमरू नाग.

Road to Janjheli
जंझेलीकडे जाणारा रस्ता

ही दोन्ही देवस्थाने हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात येतात. सोलन मध्ये स्थायिक झाल्यापासून या जागांविषयी ऐकून होतो. वर्षातले सहा-सात महीने तर इथे बर्फ असतो. उरलेल्या महिन्यांपैकी तीन महीने पावसाळा. मग उरतात मे आणि जूनचे दोन महीने. त्यात खूप ऊन असेल तरी ट्रेक करणे मुश्किल. पण हिमालयातली देवस्थाने म्हणजे खडतर प्रवास आलाच. एकदाची मेच्या शेवटच्या आठवड्यात वीकएंडला जोडून सुट्टी मिळाली आणि तिथे जायचा बेत आखला. सकाळी साडेसातच्या आसपास सोलनहून निघालो. उन्हाळ्याचे दिवस असले तरी वादळी पाऊस इथे नवा नाही. नशिबाने मी निघायच्या दोन दिवस आधीच असा वादळी पाऊस होऊन गेला होता. त्यामुळे हवा तुलनेने थंड होती आणि मुख्य म्हणजे रस्त्यावरची धूळ बसलेली होती. चंडीगढ-मनाली महामार्गावरून सुंदरनगरच्या पुढे चैल-चौकला जाणारा फाटा फुटतो. तिथून बाईक उजवीकडे वळवली. मंडी, सुंदरनगर, नेर-चौक, चैल-चौक ही शहरं एका खोलगट पठारी भागावर वसलेली आहेत. एका बाजूने बियास आणि दुसऱ्या बाजूने सुकेती अशा दोन नद्यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश. अत्यंत सुपीक. हिमाचल प्रदेशात तशीही सपाट प्रदेशाची कमी. त्यामुळे असंख्य डोंगररांगांच्या दुर्गम प्रदेशात हा सपाट आणि सुपीक भाग म्हणजे शेतीसाठी अनुकूल. त्यामुळे इथे भर उन्हाळ्यातही सुंदर हिरवीगार पिके डोलत होती. चैल-चौकवरुन पुढे परत दोन फाटे फुटतात. एक जातो गोहर वरुन पंडोहच्या दिशेने तर दुसरा जंझेलीच्या दिशेने.

वाटेतले सुंदर भूदृश्य

जंझेली म्हणजे शिकारी देवी मंदिराच्या पायथ्याचे गाव. या गावाच्या दिशेने जायला सुरुवात केली आणि रस्ता पुन्हा डोंगरावर चढू लागला. पाईनची झाडे दिसू लागली आणि हवेतला गारवा वाढू लागला. थुनाग मागे पडले आणि उंची अजूनच वाढू लागली. बाजूने खोल दऱ्या दिसत होत्या. आता पाईनची झाडे मागे पडली आणि देवदारचे प्रचंड वृक्ष दिसू लागले. जंझेली एका अरुंद दरीत वसलेले आहे. जसे जंझेली जवळ येऊ लागले तसा काहीसा सपाट भूप्रदेश दिसू लागला. आजूबाजूला सफरचंदाची झाडे दिसू लागली. भाजीपाल्याचे मळेही दिसत होते. स्वच्छ निळे आकाश होते आणि गार वारा सुटला होता. थोड्याच वेळात जंझेलीला पोहोचलो. अतिशय शांत आणि रम्य असे गाव. ना कुठे पर्यटकांची गजबज, ना कुठे शहरी तामझाम. इथला होमस्टे आधीच फोन करून बूक केला होता. लहानसेच दुमजली घर होते. खाली यजमानांचे घर तर वरच्या मजल्यावरच्या तीन खोल्या पाहुण्यांसाठी. पोहोचेपर्यंत दुपारचे तीन वाजले होते. चांगलीच भूक लागली होती. यजमान बाईंनी कढी-चावलचा स्वयंपाक केलाच होता. मग जेवून घेतलं. खरंतर आजच संध्याकाळी शिकारी देवीच्या दर्शनाला जायचे होते. पण हवा ढगाळ झाली होती. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असे वाटत होते. सात-आठ तास बाईक चालवून जीव थकला होता. मग शेवटी खोलीत चेक इन केले आणि आंघोळ करून थोडा वेळ विश्रांती घेतली.

देवदार वृक्षांनी वेढलेला परिसर

संध्याकाळी गावात फेरफटका मारायला निघालो. सूर्यास्ताच्या वेळेला गाव अजूनच सुंदर दिसत होतं. गावात लहान मोठे बरेच होम स्टे होते. मात्र स्वच्छता आणि सेवा यांबाबतीत परिस्थिती यथा-तथाच वाटत होती. गावाच्या बाजूने एक ओढा वाहत होता. त्याच्या काठाने भाज्यांचे मळे दिसत होते. आजूबाजूचे देवदार वृक्षांनी वेढलेले डोंगर ढगांत लपले होते. थोडीफार सफरचंदाची झाडेही दिसत होती. इथली उंची साधारण शिमल्याएवढीच. थोडीशी जास्त. पण इथे शिमल्यापेक्षा जास्त गारवा होता. हिवाळ्यात इथे तुफान बर्फ पडतो. आजूबाजूला सुंदर अरण्य आणि गावताळ कुरणेही आहेत. पण दुर्गम असल्याने हा भाग तसा दुर्लक्षित राहिला आहे. आता शिकारीदेवीच्या रस्त्यावरून एक थेट करसोगला जाणार नवीन रस्ता होतो आहे. अजून तरी तो रस्ता ऑफ-रोड आहे. म्हणजे रस्ता नुसता खोदून ठेवला आहे. अजून पक्का झालेला नाही. तो रस्ता पक्का झाल्यावर इथून तीन तासांत थेट शिमला गाठता येईल. असो. गावात बाकी विशेष काहीच नव्हते. एक चहा घेऊन आणि थोडीफार फोटोग्राफी करून मी आपल्या खोलीवर परतलो. रात्रीचे जेवण उरकून झोपी गेलो.

टुमदार जंझेली गाव
Directions to Janjheli from Sundar Nagar

क्रमशः

18 thoughts on “अपरिचित हिमाचल – भाग १ – जंझेली | Unexplored Himachal – Part 1 – Janjheli

  1. या देवभूमीला एकदा उडत भेट दिली आहे तुमच्या लेखणामुळे परत एकदा जावसं वाटू लागलं आहे.

  2. या दुर्गम गावांबद्दल मी कधीच ऐकलं नव्हतं…. this inspires me to plan a trip to Himachal soon….

  3. मस्त वर्णन ..शिकारी देवी बघायला आवडेल ..

  4. अनेक धन्यवाद अमृता! शिकारी देवीच्या दर्शनाला नक्की या!

  5. भन्नाट वर्णन केल आहेस..तुझ्या लेखनशैलीमधे जिवंतपणा आहे..स्वतः प्रवास करून आल्यासारख वाटलं. यामुळे शिकारी देवीला येण्याची जिज्ञासा वाढली
    From your blog we come to know about many new places
    Thank you for it Vihang 😊

  6. Enjoyed reading your travel diaries.we get to see our lovely places without traveling.masst.

  7. हिमाचलची सुंदरता फोटों द्वारे आणि अनुभव शब्दां द्वारे खूप चंगल्या पद्धतिने मंडले आहेत।
    इथली प्रत्येक जागा मनाला मोहनरी आहे।
    आशा ठिकाने शांतता आणि त्यात देव दर्शन चा आनंद , ह्याचा पेक्षा एकाला अजून काय पाहिजे।
    Great piece👍

  8. खूप छान वर्णन केले आहेस, एकदा येऊन समाधान होणार नाही, परत परत यावे लागेल हिमाचल बघायला. मस्त.

  9. 1998 la me Himachal la gelo hoto.Changle 15 diwas rahilo aani bharpur firlo. Ha blog vachun junya athvaninna ujala milala. Aani Arthatach…. Vihanga ne hya nisarga Ramya parisarache kelele surekh varnan vachtana maja aali!!😊

Leave a Reply