अपरिचित हिमाचल – भाग २ – शिकारी देवी | Unexplored Himachal – Part 2 – Shikari Devi

जंझेलीच्या थंड वातावरणात छान झोप लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे अलार्म वाजायच्या आधीच जाग आली. साडेसातच्या आसपास तयार होऊन बाहेर पडलो. मंदिरात जायचे होते. वातावरण तसे स्वच्छ होते. बाईक सुरू केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो. जंझेलीपासून मंदिर होते साधारण १७ किमी. गावाबाहेर पडलो आणि रस्ता वेटोळे घेऊन अजून वर चढू लागला. इथून जंझेली गावाचे दृश्य फारच सुंदर दिसत होते. अजून दोन-चार वळणे पार पडली आणि चांगला डांबरी पक्का रस्ता अचानक खडबडीत दगडी रस्त्यात पालटला! मंदिराचा रस्ता थोडासा ऑफ-रोड आहे असं ऐकून होतो. पण इतका खराब असेल असं वाटलं नव्हतं. गणपती बाप्पा मोरया म्हटलं आणि निघालो. रस्ता अतिशय घनदाट रानातून जात होता. वाटेत शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य असे फलक लागलेले दिसत होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. यथावकाश मंदिरापर्यंत पोहोचलो. इतक्या लवकर आलो होतो तरी दहा-बारा गाड्या दिसत होत्याच. आजूबाजूचे ढाबे नुकतेच सुरू होत होते. एव्हाना चांगलीच भूक लागली होती. म्हटलं दर्शन करून येऊ आणि मग नाश्ता करू. जय माता दी म्हटलं आणि मंदिराच्या पायऱ्या चढू लागलो. साधारण १५-२० मिनिटांची पक्की बांधलेली वाट होती. पण चढण तीव्र होती. ही जागा समुद्रसपाटीपासून ३००० मिटरच्या वर होती. त्यामुळे चार पायऱ्या चढल्या तरी धाप लागत होती. आजूबाजूचे ओक वृक्षांचे रान गूढ वाटत होते. ती वाट एका मोकळ्या डोंगर माथ्यावर येऊन पोहोचली. इथून समोर मंदिर दिसत होते. आणि आजूबाजूच्या पर्वतांचे मोहक दृश्यही दिसत होते.

शिकारी देवीच्या रस्त्यावरून दिसणारे दृश्य
मंदिराकडे जाणारा खडबडीत रस्ता
मंदिराकडे जाणारा पायऱ्यांचा रस्ता

शिकारी देवीचे हे मंदिर अतिशय प्राचीन मानले जाते. रोचक बाब अशी की या मंदिरावर कायमस्वरूपी छप्पर नाही. लोकांनी बऱ्याचदा मंदिरावर छप्पर बांधायचा प्रयत्न केला. पण ते कधीच टिकले नाही. आणि गंमत अशी की या जागी प्रचंड बर्फ पडत असूनही देवीच्या मूर्तीवर कधीच बर्फ साचत नाही. खरं-खोटं त्या देवीस ठाऊक. या देवीचे स्थानमाहात्म्य महाभारत काळापासूनचे. असं म्हणतात की पांडव कौरवांसोबत द्यूत खेळायला सुरुवात करणार होते तेव्हा शिकारी देवी एका सामान्य स्त्रीच्या रूपात तिथे आली आणि तिने पांडवांना द्यूत खेळू नका, याने तुम्ही सर्वस्व गमावाल असा इशारा दिला. मात्र पांडवांनी तिच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि खेळ सुरू केला. या द्यूतात पांडव नुसते हरलेच नाहीत तर त्यांना वनवास आणि अज्ञातवासही भोगावा लागला. एका अर्थाने देवीचा इशारा खरा ठरला. पुढे पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते हिमालयाच्या या भागातून प्रवास करत होते. हाच शिकारी देवीचा अधिवास. इथून प्रवास करताना पांडवांना एक हरिण दिसले. या हरणाची शिकार करण्याच्या हेतूने ते त्याचा पाठलाग करू लागले. पण हरिण काही हाती लागेना. पांडव अगदी हताश झाले. शेवटी हरणाच्या रूपात असलेल्या शिकारी देवीने आपले खरे रूप प्रकट केले. देवी म्हणाली की द्यूत खेळायच्या आधी तुम्हाला सावध करणारी स्त्री मीच होते. मात्र तुम्ही माझा इशारा मानला नाहीत. आणि आज त्याचीच शिक्षा भोगत आहात. पांडवांनी देवीची सपशेल माफी मागितली व काय प्रायश्चित्त करावे अशी विचारणा केली. देवी म्हणाली माझी इथेच स्थापना करा. तर तुम्हाला पुढे यश लाभेल. पांडवांनी मग त्याच डोंगरमाथ्यावर देवीची स्थापना केली. शिकार करताना पांडवांनी स्थापन केलेली देवी म्हणून ही शिकारी देवी म्हणून ओळखली जाते.

शिकारी देवी मंदिर आणि आजूबाजूचे भूदृश्य

मंदिर तसे लहानसेच होते. एक चौथरा. त्यावर कोरलेले मूर्तीजन्य दगड. आजूबाजूला मुखवटे आणि सजावट. एवढेच. मात्र त्या जागेची ऊर्जाच अशी होती की अतिशय भव्य वाटत होते. आणि आजूबाजूचा निसर्ग तर शब्दातीत होता. गवताळ कुरणांनी झाकलेले डोंगरमाथे आणि त्यांच्या बाजूने असलेली देवदार वृक्षांची घनदाट वने फारच मोहक वाटत होती. दूरवर अस्पष्टशी हिमशिखरे दिसत होती. स्वच्छ वातावरण असते तर इथला नजारा अजूनच सुंदर दिसला असता. पलीकडच्या बाजूने देवीधारवरुन येणारा रस्ता दिसत होता. हा रस्ता अगदीच कच्चा होता. काही वर्षांनी हा रस्ता पक्का झाला की चैल-चौक वरून हा जवळचा रस्ता उपलब्ध होईल. सध्या चैल-चौक वरून सुमारे ६५ किमी भरणारे अंतर या रस्त्याने निम्मे होईल. असो. दर्शन घेतल्यावर तिथला पुजारी म्हणाला, भंडारा लगा हुआ है, खाके जाना. मला अगदी हायसं वाटलं.

चौथऱ्यावर बांधलेले छप्पर नसलेले मंदिर
मंदिरावरून दिसणारे भूदृश्य – घनदाट अरण्य आणि उत्तुंग पर्वत शृंखला
हिमाचली धाम. फोटो आंतरजालावरून साभार (https://poonambachhav.blogspot.com/2018/01/dham-traditional-food-of-himachal.html)

हिमाचलमध्ये ही एक उत्तम प्रथा आहे. सुट्टीच्या दिवशी किंवा सणावाराला मंदिरात भंडारा असतो. पंचक्रोशीतली कोणी एक दानशूर व्यक्ती हा भंडारा प्रायोजित करते. अशा ठिकाणी बेत कायम हिमाचली धाम असतो. हिमाचली धाम म्हणजे इथले स्थानिक full course meal. त्यात भातासोबत कढी, राजमा, सेपू बाडी, खट्टा चना वगैरे पदार्थ असतात. या धाम मधले पदार्थ गावागावानुसार बदलतात. त्यातल्या त्यात मंडयाली धाम आणि कांगडी धाम विशेष प्रसिद्ध आहेत. मंदिराच्या मागेच लोकांची पंगत बसली होती. मी त्यांच्यासोबत जाऊन बसलो. इथे मंडयाली धाम होता. सकाळची वेळ असल्याने जेवण अगदी गरमागरम होते. खाऊन अगदी तृप्त वाटले. भंडारा प्रयोजकांना धन्यवाद म्हणून मी खाली उतरु लागलो. आता मंदिरात येणाऱ्यांची गर्दी वाढली होती. एक तरुणांचा ग्रुप भजनं गात, ढोलकी वाजवत, आणि नाचत वर चढत होता. आजच्या पिढीमध्ये अशा पारंपरिक पद्धतीने देवदर्शन करणारी लोकं पाहून छान वाटलं. त्यांचा एक विडियो सुद्धा घेतला. पार्किंगच्या जागी आलो तेव्हा खालचे ढाबे सुरू झाले होते. एक चहा घेतला आणि जंझेलीच्या दिशेने निघालो. शिकारी देवीचे दर्शन अगदी उत्तम झाले. होम स्टे वर परत येऊन थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग सामानाची बांधाबांध करून निघालो. पुढचा मुक्काम होता कमरु नाग!

क्रमशः

4 thoughts on “अपरिचित हिमाचल – भाग २ – शिकारी देवी | Unexplored Himachal – Part 2 – Shikari Devi

  1. अप्रतिम वर्णन. त्यात सुंदर फोटोग्राफी मुळे बरोबरीने प्रवास करण्याचा आनंद लुटता आला. पुढच्या ब्लॉग ची उत्सुकता लागलेली आहे.धन्यवाद.

Leave a Reply