अपरिचित हिमाचल – भाग १ – जंझेली | Unexplored Himachal – Part 1 – Janjheli

आसेतूहिमाचल असे वर्णन असणाऱ्या आपल्या देशासाठी हिमालय म्हणजे एक वरदानच. हा हिमालय केवळ भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्टयांसाठी नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक वैशिष्टयांसाठीही महत्त्वाचा आहे. याच हिमालयाच्या कुशीत वसलेली दोन राज्ये – हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड – देवभूमी असे बिरुद मिरावतात. आणि हे बिरुद या दोन्ही राज्यांसाठी तितकेच सार्थ आहे. उत्तराखंडमधली देवस्थाने, जसे की केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, तुंगनाथ, हेमकुंड साहिब, ही जगप्रसिद्ध आहेत. तुलनेने हिमाचल प्रदेशातली देवस्थाने तितकी प्रसिद्ध नाहीत. स्थानिक लोकांच्या पलीकडे यांच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही. एका अर्थाने बरेच आहे. नाहीतर यांचाही केदारनाथ व्हायला वेळ लागणार नाही. असो. आज अशाच तुलनेने अल्पप्रसिद्ध असणाऱ्या दोन देवस्थानांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती आहेत शिकारी देवी आणि कमरू नाग.