कुद्रेमुखची रानवाट – भाग १ – तोंडओळख आणि ट्रेकची सुरुवात | Kudremukh Trek – Part 1 – Introduction and start of the trek

बेंगळूरुत स्थायिक झाल्यापासून कधी एकदा जवळपासचे डोंगर तुडवायला निघतोय असं झालं होतं. कर्नाटक राज्याला पश्चिम घाटाच्या डोंगररांगांचं वरदान लाभलं आहे. मुलायनगिरी, कुमारपर्वता, कोडचादरी, ताडीयांडामोल असे असंख्य ट्रेकिंग रुट्स इथे आहेत. कुद्रेमुख हा त्यांपैकीच एक अत्यंत लोकप्रिय असा ट्रेक. बऱ्याच वर्षांपासून हा ट्रेक बकेट लिस्ट वर होता. तिथले हिरवेगार डोंगर आणि घनदाट अरण्ये खुणावत होती. फक्त पाऊस सुरु व्हायची वाट बघत होतो. जुलै महिना लागला, पावसाचे बस्तान बसले, आणि मी एका प्रथितयश ट्रेकिंग ग्रुपसोबत ट्रेकची नोंदणी करून टाकली. दरम्यान कुद्रेमुखबद्दल माहिती शोधू लागलो. 

कुद्रेमुख हे एक १८९४ मीटर उंचीचे शिखर. हे कर्नाटकातल्या चिकमगळूर जिल्ह्यात येते. इथल्या कमी उंचीवरच्या टेकड्यांवर आणि दऱ्यांमध्ये घनदाट पर्जन्यवने आहेत तर अधिक उंचीवरच्या पठारी भागावर गवताळ वने आढळतात. या गवताळ प्रदेशास शोला ग्रासलँड असे संबोधतात. पावसाळ्यात हा गवताळ प्रदेश हिरव्यागार कुरणांनी बहरून जातो. पश्चिम घाटातली ही एकमेकाद्वितीय अशी परिसंस्था अनेक प्रदेशनिष्ठ सजीवांना आसरा देते. उदाहरणच द्यायचे झाले तर वान्दरू (Lion-tailed macaque; Macaca silenus) हे वानर केवळ केरळ आणि कर्नाटक राज्यांतील पर्जन्यवनांत आढळते. या वानराचा कुद्रेमुख म्हणजे सगळ्यात उत्तरेकडचा अधिवास. वानराची ही प्रजात संकटग्रस्त अवस्थेत आहे. त्यामुळेच हा सगळा प्रदेश राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेला आहे. याव्यतिरिक्त मलबार जायंट स्क्विरल, बायसन, अस्वल, बिबट्या असे असंख्य प्राणी आणि औषधी वनस्पती व रानफुले इथे आढळतात. अशा संपन्न प्रदेशात ट्रेकिंग करायला मी फारच उत्सुक होतो. 

यथावकाश ट्रेकचा दिवस उजाडला. शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधलं काम लवकर आटोपून मी निघालो. बेंगळूरूच्या ट्राफिक मधून वाट काढत वेळेत पोहोचणं हे एक मोठं आव्हान होतं. कसाबसा बस निघायच्या जेमतेम काही मिनिटं आधी मी पोहोचलो. २५ जणांचा ग्रुप होता. त्यात काही अनुभवी तर काही नवखे होते. ओळख-पाळख झाली आणि आमची बस निघाली. बेंगळूरू ते कुद्रेमुख साधारण ३०० किमी अंतर. रात्रभरचा प्रवास होता. वाटेत एका धाब्यावर जेवणासाठी थांबलो. पोट भरल्यावर गार हवेत छान झोप लागली. पण ही झोप मात्र अगदीच क्षणभंगुर ठरली. मुदिगेरे पर्यंत पोहोचलो आणि जोरदार पावसाच्या आवाजाने जाग आली. हसन-बेंगळूरूचा पठारी प्रदेश पार करून आही पश्चिम घाटाच्या सीमेवर येऊन पोहोचलो होतो. पावसाचा वाढलेला जोर ही त्याचीच खूण होती. त्यात आता घाटही सुरु झाला होता. त्या वाटवळणांत आणि पावसाच्या आवाजात झोपेचे तीन-तेरा वाजले. चारच्या सुमारास आम्ही कळसाला पोहोचलो. इथे वनविभागाचं चेक पोस्ट आहे. इथून कुद्रेमुखवर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. फक्त पहिल्या ५० जणांना परवानगी दिली जाते. जो हाजीर तो वजीर. आम्ही चार वाजताच पोहोचल्याने आम्हाला लगेचच परवानगी मिळाली. मग कुद्रेमुख-मुलोडी रस्त्याच्या जवळ आमची बस येऊन थांबली. अजून सूर्योदय व्हायला तासभर अवकाश होता. आम्ही तेवढीच जरा झोप काढून घेतली. पाऊस सुरूच होता. 

साडेसहाच्या सुमारास आम्ही बसमधून उतरलो. इथून मुलोडीपर्यंत जीपची सोय केली होती. हा रस्ता म्हणजे एक भयंकर प्रकरण होतं. अर्धा-एक किमी ठीक-ठाक असलेला रस्ता पुढे चिखलराड्यात कुठेतरी हरवून गेला होता. मध्येच पाण्याचे ओहोळ आडवे येत होते. त्यात अवघड वळणं आणि तीव्र चढ. चालकाची खरी परीक्षा होती. फोर-व्हील ड्राईव असल्याने तेवढाच काय तो दिलासा होता. पण जीप चालक तर जणू एक्स्प्रेस वे वर चालवत असल्यासारखा जीप हाकत होता. त्याच्यासाठी रोजचंच काम म्हणा. त्या वळणांनी आणि धक्क्यांनी आमचा जीव मात्र कसानुसा झाला होता. होते अंतर जेमतेम ६ किमी. पण तेवढे पार करायला आम्हाला जवळपास एक तास लागला. अखेरीस मुलोडी गावात पोहोचलो. हे गाव साधारण १००० मीटर उंचीवर होते. गाव कसले, वीसेक घरांचा पाडाच तो. इथल्या सगळ्या घरांत मुक्कामाची आणि जेवणाची सोय होते. आम्ही अशाच एका घरात उतरलो. चांगलं आठ-दहा खोल्यांचं ऐसपैस कौलारू घर होतं. ते घर बघून कोकणातल्या वेळासमधील निजसुरे काकांच्या घराची आठवण झाली. पडवीतच एका कोपऱ्यात चूल होती. त्यावर चहा उकळत होता. एवढ्या भयंकर प्रवासानंतर चहा आवश्यकच होता की. चहाचे दोन घोट घशाखाली गेले तेव्हा कुठे जरा तरतरी आली. त्या कुंद पावसाळी वातावरणात तो काहीसा पाणचट चहादेखील अमृततुल्य वाटत होता. लवकरच नाश्ता आला. सगळी आवरा-आवरी करून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो.                   

क्रमशः        

Leave a Reply