गुवाहाटी. ईशान्य भारताचं प्रवेशद्वार. आसाममधलं सगळ्यात मोठं शहर. आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आणि शहराच्या ट्रॅफिकमधून वाट काढत पुढे निघालो. शनिवारची दुपार असल्यामुळे रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी होती. आमची एक छोटीशी वरातच निघाली होती. एका मागोमाग वीस-बावीस बाईक्स रस्त्यावरून पुढे सरकत होत्या. लोक वळून वळून आमच्याकडे बघत होते. “हे कुठे चाललेत?” असा प्रश्न बहुतेक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मला एक गोष्ट मात्र लगेच जाणवली. अशा प्रकारच्या बाइकिंग ट्रिप्सचा ट्रेंड हिमाचल, स्पिती, लडाख या भागांमध्ये आता खूपच सामान्य झाला आहे. पण ईशान्य भारतात अजूनही ही संस्कृती तितकीशी रुळलेली नसावी. तरीही आता परिस्थिती झपाट्याने बदलताना दिसते आहे. नॉर्थ ईस्टची कनेक्टिव्हिटी सुधारते आहे. पर्यटन वाढतंय. अनेक वर्षे असलेली राजकीय अस्थिरता आणि हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण प्रदेशाकडे लोकांचं आकर्षण वाढत चाललं आहे.

हळूहळू आम्ही शहराच्या बाहेर पडलो. रस्ता आसाम आणि मेघालयाच्या सीमेच्या जवळून जात होता. छोट्या टेकड्या, मधूनमधून वळणं आणि दोन्ही बाजूंना हिरवाई. रस्त्यांची स्थिती खूपच चांगली होती. दुपार सरत होती आणि संध्याकाळ जवळ येत होती. एकंदरीत दिवसाची सुरुवात थोडी गडबडीतच झाली होती. साडेबाराच्या सुमारास आम्ही एअरपोर्टजवळच्या हॉटेलमधून निघालो होतो. त्यानंतर पिकअप व्हेईकल, बाईक्स अलॉट होणं, पेपरवर्क, ओळखीपाळखी आणि मग थेट राईडची सुरुवात. या सगळ्या गडबडीत दुपारचं जेवणच राहून गेलं होतं. आता चार-साडेचार वाजत आले होते आणि प्रचंड भूक लागली होती. मग एका छोट्याशा ढाब्यावर आम्ही थांबलो. आत शिरलो आणि मिळेल ते काहीतरी मागवलं. तशी ती विचित्र वेळ होती. जेवणाची थाली मागवावी की चहा आणि मॅगी हेच कळत नव्हतं. त्यात त्या हॉटेलमध्ये फारसे पर्यायही नव्हते. शेवटी मॅगी आणि चहा मागवला आणि बाहेर आलो. बाहेर येऊन बघितलं तर काळोख पडलेला. घड्याळात पावणेपाच वाजले होते. एका क्षणात जाणीव झाली की आपण देशाच्या किती पूर्वेला आलो आहोत. मुंबईत याच वेळी अजून लख्ख दुपार असती आणि इथे मात्र संध्याकाळ संपून अंधार पडला होता. त्या क्षणी भारत किती प्रचंड मोठा देश आहे याची जाणीव अक्षरशः अंगावर आली. ईशान्य भारतात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतात हे वाचून माहिती होतं. पण टेक प्रत्यक्षात अनुभवणं म्हणजे वेगळाच प्रकार होता. नकाशावर दिसणारं अंतर आणि प्रत्यक्ष जगलेलं अंतर यात किती मोठा फरक असतो हे अशा वेळी समजतं.

आम्ही अजून तेजपूरच्याही अलीकडे होतो. निम्म्याहून अधिक अंतर बाकी होतं आणि पूर्ण अंधार पडला होता. मला खरंतर रात्री गाडी चालवायला फारसं आवडत नाही. एकतर आजूबाजूचं काही दिसत नाही. सतत रस्त्यावर लक्ष ठेवावं लागतं. अचानक स्पीड ब्रेकर, खड्डा किंवा एखादा वळण समोर येतं. कायम सावध राहावं लागतं. त्यामुळे त्या राईडची मजा थोडी कमी होते. पण आता पर्याय नव्हता. आजचं डेस्टिनेशन होतं नामेरी नॅशनल पार्क. अजून शंभरपेक्षा जास्त किलोमीटर अंतर बाकी होतं. शेवटी पुन्हा एकदा बाईक स्टार्ट केली. “हर हर महादेव”, “गणपती बाप्पा मोरया”, “जय बजरंगबली” म्हणत आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरलो.
इथून पुढचा रस्ता पूर्ण फोर लेन हायवे होता. घाट नाहीत, फारशी वळणं नाहीत. आमचा ग्रुप कॅप्टन आशिष सगळ्यात पुढे चालला होता. त्याच्या हेल्मेटवर एक लुकलुकणारा दिवा होता आणि गाडीचे ब्लिंकर्स सुरू होते. त्या अंधारात दूरवरूनसुद्धा आशिष सहज दिसत होता. खरंच, ती खूप उपयोगाची गोष्ट होती. असं करत करत आम्ही पुढे जात होतो आणि मग अचानक ब्रह्मपुत्रेवरचा विशाल पूल समोर आला. “अरे बापरे, आपण ब्रह्मपुत्रा ओलांडतोय!” ती प्रचंड नदी आणि तिच्यावरचा तीन-साडेतीन किलोमीटर लांबीचा पूल. पण दुर्दैवाने सगळं अंधारात हरवलं होतं. मला मोठमोठ्या नद्यांचं नेहमीच एक वेगळं आकर्षण वाटत आलं आहे. जगातल्या किंवा भारतातल्या एखाद्या महान नदीला प्रत्यक्ष पाहणं म्हणजे माझ्यासाठी जणू एखादं भौगोलिक आश्चर्य अनुभवणं असतं. त्यामुळे ब्रह्मपुत्रा अनुभवणं ही या ट्रिपमधली एक खास गोष्ट होती. पण ती पहिली भेट अंधारातच झाली. क्षणभर थोडंसं वाईट वाटलं. मग स्वतःलाच समजावलं. “हरकत नाही, परतीच्या प्रवासात पुन्हा भेटेलच.” शिवाय गुवाहाटीमध्ये परत येताना दोन दिवस मुक्कामही होता. त्यामुळे ब्रह्मपुत्रेला पुन्हा निवांत भेटण्याची संधी मिळणारच होती. तरीसुद्धा त्या अंधारातून जाताना मी एक व्हिडिओ काढलाच.

तेजपूर मागे पडलं आणि हळूहळू परिसर बदलायला लागला. आतापर्यंत आजूबाजूला मोकळी मैदानं आणि विरळ झाडी दिसत होती. पण आता अचानक वातावरण बदललं. दोन्ही बाजूंना घनदाट जंगल सुरू झालं. एक विचित्र नीरव शांतता जाणवायला लागली. आम्ही हळूहळू ब्रह्मपुत्रेच्या मैदानी प्रदेशातून हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलांकडे प्रवेश करत होतो. नामेरी नॅशनल पार्क याच भागात वसलं आहे. अंधारामुळे फारसं काही दिसत नव्हतं, पण वातावरण पूर्ण बदललं होतं. रस्त्याचा माग काढत काढत शेवटी रात्री जवळजवळ पावणे दहाच्या सुमारास आम्ही नामेरी नॅशनल पार्कमधल्या रिसॉर्टवर पोहोचलो. रिसॉर्ट खूप सुंदर होतं. मंद पिवळे दिवे, शांत वातावरण आणि सभोवताली काळोखात हरवलेलं जंगल. आम्ही सगळेजण जेवणाच्या जागी जमलो. प्रचंड थकलो होतो. एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर एकदम दोनशे ते अडीचशे किलोमीटर बाईक चालवली होती. पाय अक्षरशः आखडून गेले होते आणि भूक तर प्रचंड लागली होती. जेवण उरकलं. मग आशिषने सगळ्यांची व्यवस्थित ओळख करून दिली. ग्रुपमधले लोक आता हळूहळू ओळखीचे वाटायला लागले होते. पण सगळ्यांनाच झोपेची ओढ लागली होती. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा राईड होतीच आणि खरी ट्रिप आता सुरू होणार होती. मग सगळ्यांना गुड नाईट म्हटलं आणि मी शांतपणे झोपायला गेलो.
क्रमशः