अनवट ईशान्य भारत – भाग ६ – बुम ला पास

इथून पुढे बुम लाकडे जाणारा रस्ता अधिकच खडतर होता. भुसभुशीत खडी, मध्येच चिखल, तीव्र चढ, आणि बाजूने खोल दऱ्या यांमधून आमचा चालक अविश्वसनीय कौशल्याने गाडी पुढे नेत होता. मध्ये एका लष्करी तळावर थोडा विसावा घेतला आणि अखेर आम्ही सीमेवर पोहोचलो. येथून पुढे छायाचित्रणाला निर्बंध होते. सर्व तपासण्या पार करून आम्ही सीमारेषेजवळ गेलो. वातावरणात एक वेगळीच गंभीरता होती. तिथे एक लष्करी अधिकारी एका पर्यटकांच्या ग्रुपला १९६२ च्या युद्धातील प्रसंग आणि तिथल्या सैनिकांचं आयुष्य यावर काही गोष्टी सांगत होता. त्याचं प्रत्येक वाक्य ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येत होते. समोरच काही अंतरावर चिनी चौकी आणि सैनिकही दिसत होते. आम्ही सहज विचारलं, “तुमचा त्यांच्याशी कधी संवाद होतो का?” अधिकारी हसत म्हणाला, “नियमित. सीमा राखायची असते, तणाव वाढवायचा नसतो.”

अनवट ईशान्य भारत – भाग ५ – जसवंतगड युद्धस्मारक

रायफलमन जसवंतसिंग रावत यांनी दाखवलेल्या अद्वितीय शौर्याच्या स्मरणार्थ उभारलेलं हे स्मारक आजही त्या युद्धाची साक्ष देत उभं आहे. १९६२ मध्ये इथे घडलेला संघर्ष Battle of Nuranang म्हणून प्रसिद्ध आहे. स्थानिक मोनपा समाजातील सेला आणि नुरा या दोन तरुणींच्या मदतीने जसवंत सिंग यांनी तब्बल बहात्तर तास विविध ठिकाणांहून गोळीबार करत चिनी सैन्यासमोर संपूर्ण भारतीय तुकडी लढत असल्याचा आभास निर्माण केला. आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत पुढे जाऊन एक चीनी मशीनगन हस्तगत केली. मात्र यात त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. ते सुद्धा जखमी झाले. त्यांच्या मृत्यूबाबत आजही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. काहींच्या मते त्यांनी अखेरची गोळी स्वतःवर झाडली, तर काहींच्या मते चिनी सैन्याने त्यांना पकडून ठार मारलं. पण त्यांच्या पराक्रमामुळे ते भारतीय लष्कराच्या इतिहासातील अमर वीर ठरले. ज्या बंकरच्या आधारे जसवंत सिंह यांनी ही खिंड लढवली त्याच परिसरात आज हे स्मारक उभे आहे.

अनवट ईशान्य भारत – भाग ४ – दिरांग ते तवांग मार्गे सेला पास

काही मिनिटांनी समोर एक भव्य कमान दिसू लागली. ते होतं तवांग जिल्ह्याचं प्रवेशद्वार. त्या कमानीतून पुढे जाताच लक्षात आलं की आपण सेला पासच्या परिसरात पोहोचलो आहोत. हा आमच्या संपूर्ण प्रवासातील सर्वोच्च बिंदू. उंची जवळपास चार हजार दोनशे मीटर. आणि त्या क्षणी जणू निसर्गाने आमच्यावर प्रसन्न होण्याचं ठरवलं. ढग बाजूला सरकले. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला आणि समोर शांतपणे विसावलेलं सेला सरोवर दिसू लागलं. क्षणभर आम्ही सगळे स्तब्ध झालो. समोर शांत निळं सरोवर पहुडलं होतं. आजूबाजूचे बोडके डोंगर त्यात आपलं रुपडं न्याहाळत होते. त्यांच्या उतारांवर लहान लहान झुडपांचे लालसर आणि पिवळसर रंग उठून दिसत होते. कदाचित शरद ऋतूची चाहूल लागली असावी. त्या परिसरात एक विलक्षण शांतता होती. थंड वारा अंगावर झोंबत होता, पण त्या दृश्याकडून नजर हटत नव्हती.

अनवट ईशान्य भारत – भाग ३ – नामेरी ते दिरांग

रिसॉर्टच्या कच्च्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताच काल रात्री ज्या जंगलातून आम्ही अंधारात आलो होतो त्याचा खरा आवाका लक्षात यायला लागला. काल गूढ आणि थोडंसं भीतीदायक वाटलेलं ते अरण्य सकाळच्या प्रकाशात मात्र अत्यंत शांत आणि प्रसन्न दिसत होतं. रस्ता तसा साधा दोन लेनचा होता. दोन्ही बाजूंनी उभे असलेले महाकाय वृक्ष त्यावर हिरवी कमान धरून होते. त्यांच्या खोडांचा आकार इतका एकसारखा होता की वाटत होतं एखाद्या कारखान्यातून बाहेर पडलेले महाकाय ओंडकेच रस्त्याच्या बाजूने कोणी रोवले आहेत. त्यांच्यावर वेलींची जाळी चढलेली होती. खाली झुडपं, रानफुलं आणि दाट हिरवळ. त्या सगळ्यातून सूर्यप्रकाशाचे कवडसे हळूहळू झिरपत होते. मध्येच एखादं गाव दिसत होतं. भाताची शेती दिसत होती. दूरवर निळसर-हिरव्या टेकड्या ढगांमध्ये हरवलेल्या दिसत होत्या. उजव्या हाताला कामेंग नदीचा प्रवाह दिसत होता. कधी तो अगदी हाताशी तर कधी रानात हरवून जात होता.

अनवट ईशान्य भारत – भाग २ – गुवाहाटी ते नामेरी नॅशनल पार्क

ळूहळू आम्ही शहराच्या बाहेर पडलो. रस्ता आसाम आणि मेघालयाच्या सीमेच्या जवळून जात होता. छोट्या टेकड्या, मधूनमधून वळणं आणि दोन्ही बाजूंना हिरवाई. रस्त्यांची स्थिती खूपच चांगली होती. दुपार सरत होती आणि संध्याकाळ जवळ येत होती. एकंदरीत दिवसाची सुरुवात थोडी गडबडीतच झाली होती. साडेबाराच्या सुमारास आम्ही एअरपोर्टजवळच्या हॉटेलमधून निघालो होतो. त्यानंतर पिकअप व्हेईकल, बाईक्स अलॉट होणं, पेपरवर्क, ओळखीपाळखी आणि मग थेट राईडची सुरुवात. या सगळ्या गडबडीत दुपारचं जेवणच राहून गेलं होतं. आता चार-साडेचार वाजत आले होते आणि प्रचंड भूक लागली होती. मग एका छोट्याशा ढाब्यावर आम्ही थांबलो. आत शिरलो आणि मिळेल ते काहीतरी मागवलं. तशी ती विचित्र वेळ होती. जेवणाची थाली मागवावी की चहा आणि मॅगी हेच कळत नव्हतं. त्यात त्या हॉटेलमध्ये फारसे पर्यायही नव्हते. शेवटी मॅगी आणि चहा मागवला आणि बाहेर आलो. बाहेर येऊन बघितलं तर काळोख पडलेला. घड्याळात पावणेपाच वाजले होते. एका क्षणात जाणीव झाली की आपण देशाच्या किती पूर्वेला आलो आहोत. मुंबईत याच वेळी अजून लख्ख दुपार असती आणि इथे मात्र संध्याकाळ संपून अंधार पडला होता. त्या क्षणी भारत किती प्रचंड मोठा देश आहे याची जाणीव अक्षरशः अंगावर आली. ईशान्य भारतात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतात हे वाचून माहिती होतं. पण टेक प्रत्यक्षात अनुभवणं म्हणजे वेगळाच प्रकार होता. नकाशावर दिसणारं अंतर आणि प्रत्यक्ष जगलेलं अंतर यात किती मोठा फरक असतो हे अशा वेळी समजतं.

अनवट ईशान्य भारत – भाग १ – गुवाहाटी

ईशान्य भारत. भारताच्या नकाशात फुलपाखराच्या पंखासारखा दिसणारा हा प्रदेश मला लहानपणापासूनच खुणावत आला होता. इथली घनदाट अरण्यं, धुक्याने वेढलेले डोंगर, प्रचंड नद्या, उंच धबधबे, हिरवागार निसर्ग आणि उत्तरेला उभ्या असलेल्या हिमशिखरांच्या कथा अनेकदा वाचनातून भेटल्या होत्या. टीव्हीवरील माहितीपट, युट्यूबवरील ट्रॅव्हल व्लॉग्स आणि अलीकडच्या काळात इंस्टाग्रामवरील रील्समधून हा प्रदेश वारंवार समोर येत राहिला. पण प्रत्यक्ष तिथे जाण्याची संधी मात्र काही मिळत नव्हती.