वेळास कासव महोत्सव Velas Turtle Festival

कासव म्हटलं की लहानपणी ऐकलेली ससा-कासवाच्या शर्यतीची गोष्ट आणि काही बडबडगीतं याच्यापलीकडे आपल्या डोळ्यांपुढे फारसं काही येत नाही. त्यात कासव महोत्सव म्हटल्यावर कासवांचे फिरते प्राणीसंग्रहालय असावे अशी जर आपली समजूत झाली असेल तर त्यात आपला काहीच दोष नाही. मीही मोठ्या औत्सुक्याने फेसबुकवरची ती पोस्ट वाचत होतो. हा कासव महोत्सव म्हणजे कोकणातील अनेक किनाऱ्यांवर अंडी घालायला येणाऱ्या सागरी कासवांचा संवर्धन प्रकल्प होता. अंड्यातून बाहेर पडणारी इवलीशी कासवपिल्ले समुद्राकडे मार्गक्रमण करतानाचे मोहक दृष्य पाहण्यासाठी वेळास मधले पर्यावरण अभ्यासक आणि गावकरी सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण करत होते. मुळातच जीवशास्त्राचा विद्यार्थी असल्याने एखादा संवर्धन प्रकल्प बघण्यासाठी मी फारच उत्सुक होतो. त्यात कोकणातल्या एखाद्या निवांत गावी दोन दिवस घालवायला मिळणार या कल्पनेने मी अधिकच सुखावलो होतो. मित्रमंडळींमध्ये विचारणा केली आणि कधी नव्हे ते दोन मैत्रिणी सोबत यायला तयार झाल्या. मुंबईतले २-४ ट्रेकिंग ग्रुप वेळास कासव महोत्सव सहल आयोजित करत होते. त्यांपैकी ट्रेक मेट्स इंडिया (TrekmatesIndia) या ग्रुपचा पूर्वानुभव चांगला असल्याने त्यांच्या सोबत जायचे ठरवले. सहलीचा दिवस उजाडण्याची वाट बघता बघता मी एकीकडे या संवर्धन प्रकल्पाविषयी अधिक माहिती शोधू लागलो.

कासवपिल्लांना किनाऱ्यावर सोडताना 

भारताच्या एकूण ८००० किमी लांबीच्या किनाऱ्यावर सागरी कासवांच्या ४ प्रजाती आढळतात. त्यांपैकी ओलिव्ह रिडले (Olive Ridley) या जातीची सागरी कासवे महाराष्ट्रातल्या किनाऱ्यावर घरटी बनवताना आढळून आली आहेत. या कासवांची मादी विणीच्या हंगामात समुद्रकिनाऱ्यावर येते. तिथे सुरक्षित जागी वाळूत खड्डा खणून १०० ते १५० अंडी घालते. यथावकाश त्यातून पिल्ले बाहेर पडतात. समुद्राकडे जायचे याचे ज्ञान त्यांना उपजतच असते. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्याची कंपने यांवरून कोणत्या दिशेला समुद्र आहे हेही त्यांना समजते. ओल्या वाळूवर सुंदर ठसे उमटवत ही पिल्ले समुद्रात जातात. त्यांतील मादी पिल्ले परिपक्व झाल्यावर परत त्याच किनाऱ्यावर अंडी घालायला येतात हे विशेष. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर वाळूवरून चालत समुद्रात जाणे ही कासवाच्या जीवनक्रमातली महत्त्वाची घटना असते. याच दरम्यान तो किनारा कासवाच्या नैसर्गिक GPS मध्ये नोंदला जातो. पिल्लांना किनाऱ्यावरून न चालवता थेट समुद्रात सोडले तर ती पिल्ले पुन्हा किनाऱ्याकडे कधी येउच शकत नाहीत. मात्र याच घटनेमध्ये त्यांच्या जिवाला सर्वाधिक धोका असतो. किनाऱ्यावरचे खेकडे, घारी, समुद्रपक्षी, कोल्हे, कुत्री, तरस इत्यादी प्राणी या पिल्लांवर नजर ठेऊन असतात. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने बाहेर पडणारी पिल्ले म्हणजे या भक्षकांसाठी मेजवानीच. या शत्रूंपासून जीव वाचवून समुद्रात गेलेल्या पिल्लांपुढेही आव्हाने काही कमी नसतात. मोठे मासे आणि इतर सागरी भक्षकांचा धोका असतोच. त्यातून वाचलेली पिल्ले परिपक्व होतात. त्यांचे नैसर्गिक आयुष्यमान साधारण ८० ते १०० वर्षांचे असते. आजच्या काळात कोणत्याही प्राण्याचा सर्वात मोठा शत्रू हा माणूस आहे. माणसांची वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण यांमुळे अनेक प्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. सागरी कासवही त्यास अपवाद नाही. अनकेदा ही कासवे मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यांमध्ये अडकून किंवा बोटीच्या धडकेने मृत्युमुखी पडतात. सागरी कासवाच्या जीवनचक्रात किनारा हा महत्त्वाचा घटक आहे. आजकाल किनाऱ्यावर चालणारे जलक्रीडा वगैरे उपक्रम, सतत चालू असणारी माणसांची वर्दळ, गोंगाट, रोषणाई इत्यादी गोष्टींमुळे कासवांना अंडी घालायला सुरक्षित किनारे मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो आहे. सागरी परीसंस्थेच्या संतुलनासाठी ही चिंतेची बाब आहे.

कासवपिल्ले पाण्याकडे जाताना 

कोकणातल्या अनेक किनाऱ्यांवर ओलिव्ह रिडले जातीची कासवे घरटी बनवतात. कासवाच्या नैसर्गिक भक्षकांपासून, तसेच कासवाच्या पिल्लांचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या लोकांकडून या पिल्लांना धोका होता. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या स्वयंसेवी संस्थेने या कासवपिल्लांचे रक्षण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यातूनच पुढे आली ‘कासव महोत्सव’ ही अभिनव कल्पना. या संस्थेचे स्वयंसेवक नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात किनाऱ्यावरची कासवांची घरटी शोधून त्यातली अंडी बाहेर काढून सुरक्षित जागी पुरून ठेवतात. पुरलेल्या जागेवर एक टोपली उलटी करून ठेवली जाते. अंड्यांची संख्या, तारीख, वेळ वगैरे तपशील नोंदले जातात. ती जागा कुंपणाने संरक्षित केली जाते. मग दोनेक महिन्यात अंडी फुटून पिल्ले बाहेर येऊ लागतात. या कालावधीत संस्थेचे स्वयंसेवक रोज सकाळी ७ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता टोपल्या वर करून घरटी तपासतात. अंड्यांतून बाहेर आलेल्या पिल्लांना किनाऱ्यावर सोडले जाते. मग ती इवलीशी पिल्ले आपल्या दुडूदुडू चालीने समुद्रात प्रवेश करतात. हा सारा सोहळा म्हणजेच ‘कासव महोत्सव’! पर्यटकांचा या कल्पनेला उदंड प्रतिसाद लाभतो आहे.

वेळास हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक लहानसे गाव. दुर्गम स्थान आणि वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा असूनही कासव महोत्सवामुळे हे गाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले आहे. आम्ही मुंबईहून रात्री बसने निघालो. सकाळी सहाच्या सुमारास वेळासला पोहोचलो. सकाळी सातची कासवपिल्लांना समुद्रात सोडण्याची वेळ जवळ आली होती. बसमधून उतरून अर्धवट झोपेत तसेच किनाऱ्यावर पोहोचलो. ट्रेक मेट्स इंडियाचे आमचे आयोजक सांगत होते की त्यांच्या याआधीच्या सहलीत एकही पिल्लू दिसले नाही. तेव्हा पाऊस पडल्याने वाळूचे तापमान घसरले आणि अंडी फुटण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला. या वेळी तसा काही प्रकार घडण्याची संभावना नव्हती. मात्र तरीही कासवपिल्ले दिसतील की नाही याबद्दल खात्रीने कोणीच सांगू शकत नव्हते. पिल्लांचे दर्शन होईल अशा आशेने आम्ही सारे घरट्याभोवतीच्या कुंपणाबाहेर गोळा झालो.

इतरही बरेच पर्यटक होते. आज किती पिल्ले दिसतील याची उत्सुकता सर्वांनाच होती. एकूण चार घरटी होती. त्यावर टोपल्या उलट्या करून ठेवलेल्या होत्या. सातच्या सुमारास श्री उपाध्याय आणि इतर काही स्वयंसेवक आले. पहिली टोपली उचलली गेली. इथे एकही पिल्लू नव्हते. पर्यटकांमधून निराशेचा सूर उमटला. दुसऱ्या टोपलीखाली मात्र दोन इवलीशी पिल्ले त्यांच्या आयुष्यातला पहिला दिवस अनुभवत होती. पिल्लं पाहताच पर्यटकांनी एकच जल्लोष केला. तिसऱ्या टोपलीखाली अजून दोन तर चौथ्या टोपलीखाली चार पिल्ले सापडली. तळहातापेक्षाही लहान अशी ती गोंडस पिल्ले चोहीकडे टकामका बघत होती. मनुष्याजातीशी एवढा जवळचा संपर्क त्यांच्या पूर्वजांचा कधी आला नसेल. ती सारी पिल्ले स्वयंसेवकांनी एका टोपलीत घातली आणि सारे जण समुद्राकडे जाऊ लागले. पाण्यापासून १०-१२ मीटर अंतरावर एक चौकोनी जागा दोरखंड लावून बंदिस्त केली गेली. मग त्याच्या आतमध्ये पिल्लांना अलगद ओल्या वाळूवर सोडण्यात आले. लाटांच्या आवाजाने समुद्राचा अंदाज घेऊन ती पिल्ले हळूहळू समुद्राकडे चालू लागली. त्यांच्या हालचालीचे सुंदर ठसे ओल्या वाळूवर उमटत होते. मधेच एखादे पिल्लू उलट्या दिशेने जात होते व गोल फिरून योग्य मार्गाला लागत होते. पर्यटक मोठ्या उत्साहने पिल्लांची ती लगबग पाहत होते. छायाचित्रकारांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. अखेरीस सगळ्या पिल्लांना समुद्राने आपल्या पोटात सामावून घेतले. पिल्लांना मनोमन आयुष्यमान भव असे शुभ चिंतन करून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघालो.

कासव महोत्सवात नुसते कासव दर्शन नव्हे तर स्थानिक लोकांना पर्यटनामुळे मिळणारा रोजगारही अंतर्भूत आहे. वेळास गावातले अनेक गावकरी आपल्या प्रशस्त घरांत पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची सोय करतात. आमचा मुक्काम श्री निजसुरे यांच्याकडे होता. भलेमोठे शेणाने सावरलेले अंगण, कौलारू छप्पर, परसात एक विहीर आणि मागे नारळी-पोफळीच्या बागा असे अस्सल कोकणी घर होते त्यांचे. वातावरणात उष्मा असला तरी पडवीत बसल्या बसल्या शांत आणि प्रसन्न वाटत होतं. तसा मुंबईच्या आणि इथल्या वातावरणात फारसा फरक नव्हता. तरी निसर्गाच्या सहवासात इथे एक वेगळीच मनःशांती अनुभवास येत होती. तितक्यात निजसुरे काका पोह्यांनी भरलेली थाळी आणि गरमागरम चहा घेऊन आले. कोकणातल्या त्या रम्य सकाळचे चित्र पूर्ण करायला अजून काय हवे? भरपेट नाश्ता करून आम्ही आजूबाजूच्या परिसरात भटकायला बाहेर पडलो. गाव तसे लहानच होते. लाल मातीचा अरुंद रस्ता दाटीवाटीने वसलेल्या घरांमधून जात होता. समुद्राचा धीरगंभीर आवाज वातावरणात भरून राहिला होता. नारळी-पोफळीच्या गर्द झाडीतून डोकावणारे कोवळ्या उन्हाचे तिरपे कवडसे इथे-तिथे लपंडाव खेळत होते. मधूनच सुक्या मासळीचा अस्वस्थ करणारा वास नाकात शिरत होता. असे अस्सल कोकणी वातावरण अनुभवत आम्ही गावात फिरत होतो.

वेळास गावाजवळच बाणकोट किल्ला आहे. तशी चढण खडी असल्याने आम्ही बसनेच किल्ल्यावर पोहोचलो. किल्ला म्हणजे डोंगर माथ्यावर बांधलेली एक छोटीशी गढीच. चार टोकांना चार बुरुज, भक्कम तटबंदी, एक मंदिर आणि धान्य साठवण्याची कोठारे एवढेच काय ते किल्ल्याचे अंग. मात्र समुद्राकडच्या बुरुजावरून दिसणारे दृश्य अवर्णनीय म्हणावे असे होते. पश्चिमेकडे अथांग रत्नाकर पहुडला होता. पावसासाठी असुसलेल्या धरणीला लवकरच कृष्णमेघांचा नजराणा पेश करण्याच्या तयारीत गुंतला असावा बहुतेक. उत्तरेकडून सावित्री नदी समुद्रात विलीन होत होती. हीच बाणकोटची खाडी. खाडीवरून पूल बांधायचे काम जोरात सुरु होते. हा पूल झाला कि वेळास ते हरिहरेश्वर असा थेट रस्ता उपलब्ध होईल. वेळास सारख्या दुर्गम गावासाठी ही सोय फारच महत्त्वाची ठरणार आहे. किल्ल्यावर थोडा फेरफटका मारून आम्ही गावात परत जायला निघालो. किल्ल्यावरून एक पायवाट थेट वेळास गावात उतरते. बसने फिरून जाण्यापेक्षा सगळ्यांनी पायवाटेने जाण्याचा निर्णय घेतला. पायवाट कोणाच्या तरी आमराईतून जात होती. झाडावर लगडलेल्या कैऱ्या बघून तोंडाला पाणी सुटत होतं. मात्र आमच्या सहल संयोजकांनी कैऱ्या तोडण्यास सक्त मनाई केल्याने आम्ही मोह आवरला.

किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा 

पायवाट उतरते त्या ठिकाणी समुद्रकिनारी काहीशा उंच खडकावर एक लहानसा दीपस्तंभ दिसला. आम्ही लगेच तिथे धाव घेतली. भरतीची वेळ असल्याने फेसाळणाऱ्या लाटा खडकावर आदळत होत्या. त्यांचे तुषार अंगावर उडत होते. तिथे थोडेफार छायाचित्रण करून आम्ही गावाकडे परतलो. सुग्रास जेवण तयारच होते. त्यावर सोलकढी! सगळ्यांनी आडवा हात मारला. जेवणानंतर थोडी वामकुक्षी घेऊन संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर जायला निघालो. कासवपिल्ले समुद्रात सोडण्याची संध्याकाळी ६ ची वेळ गाठायची होती. संध्याकाळी किनाऱ्यावर कासव महोत्सव पहायला बरीच गर्दी जमली होती. या वेळी एकूण १२ पिल्लांनी जन्म घेतला होता. पिल्लांचा तो समुद्रापर्यंतचा प्रवास आम्ही पुन्हा एकदा अनुभवला. त्यानंतर रम्य सूर्यास्त पाहून गावाकडे परतलो. कासव महोत्सव बघायला येणाऱ्या पर्यटकांना ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ चे स्वयंसेवक एक माहितीपट दाखवतात. संस्थेने कोकणातल्या विविध प्राणी-पक्ष्यांच्या संवर्धनासाठी केलेले काम या माहितीपटात दाखवले आहे. कार्यक्रम पाहून आही निजसुरे काकांच्या घरी परतलो. त्यानंतर रात्रीचे जेवण, आकाश निरीक्षण, गप्पा-गोष्टी वगैरे करण्यात वेळ घालवला आणि निद्राधीन झालो.

वेळासचा रम्य सूर्यास्त 

दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पुन्हा एकदा कासवपिल्ले पाहण्याची संधी मिळणार होती. आता तिसऱ्यांदा परत तोच समारंभ पाहण्यास बरेच जण अनुत्सुक होते. आम्ही मात्र कदाचित यंदा बरे फोटो मिळतील अशा आशेने किनाऱ्यावर पोहोचलो. पहिल्या टोपलीखाली काहीच नव्हते. दुसरी टोपली उचलताच त्याखाली वळवळ करणाऱ्या पिल्लांचा एक ढीगच दिसला! एक, दोन, दहा, नव्हे तब्बल ४२ पिल्ले! एकदम लॉटरी लागावी तशा आनंदात सगळे होते. पहिल्यांदाच कासव पिल्ले पाहणाऱ्यांसाठी तर ही फारच उत्साहाची गोष्ट होती. मग त्या पिल्लांना समुद्रात सोडण्याचा कार्यक्रम यथावकाश पार पडला. अपेक्षेपेक्षा जास्तच पिल्ले दिसल्याने आम्ही खुशीत होतो. ही सहल यथार्थ पार पडल्याचे समाधान मनात होते. अखेरीस नाश्ता आणि आन्हिके आवरून आम्ही निजसुरे काकांचा निरोप घेतला. वाटेत हरिहरेश्वरच्या मंदिराचे दर्शन घेऊन मुंबईकडे मार्गस्थ झालो.

समाप्त

0 thoughts on “वेळास कासव महोत्सव Velas Turtle Festival

  1. पिल्लांना किनाऱ्यावर न चालवता थेट पायात नेऊन सोडले तर त्यातल्या माद्या परत किनाऱ्यावर अंडी घालायला येऊ शकत नाहीत. त्यामुळे पिल्लांनी किनाऱ्यावरील वाळूत चालणे आवश्यक असते. या ठिकाणी त्याची योग्य खबरदारी घेतलेली आहे. वेळासमधले निसर्गप्रेमी प्रशिक्षित आहेत. ते पर्यटकांना पिल्लांना हातही लावू देत नाहीत. तसेच फोटो काढण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले जाते. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे एक in-situ conservation चे एक यशस्वी उदाहरण ठरला आहे. आपल्याला आणखी काही शंका असल्यास "सह्याद्री निसर्ग मित्र" शी जरूर संपर्क साधावा.

  2. पिल्लांना उचलून समुद्राजवळ नेलं, तर त्यातल्या माद्या परत किनाऱ्यावर अंडी घालायला येऊ शकत नाहीत असं वर म्हटलं असतांना त्या पिल्लांना कुत्री वगैरे शत्रूंपासून हाताने किनाऱ्यावर नेणं चुकीचं नाही का? त्यापेक्षा ते शत्रू जवळ येऊ नयेत याची खबरदारी घेणं सयुक्तिक नाही का? ही निसर्गाच्या कामामधे ढवळाढवळ की अतिउत्साही निसर्गप्रेमींना चमकोची संधी?

Leave a Reply