अनवट ईशान्य भारत – भाग ८ – जंग धबधबा आणि भर पावसातली राईड

आजचा दिवस उगवला तोच पावसाच्या आवाजाने. काळ्या ढगांनी सगळं आकाश व्यापलं होतं. पाऊस बघताच माझ्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटल्या. बाईक चालवणं कितीही मजेशीर असलं तरी ती पावसात चालवणं म्हणजे एक मोठी कसरत असते. निसरडे झालेले रस्ते, बुटात आणि कपड्यांत शिरणारे पाणी, आणि चष्म्यावर पाण्याचे थेंब जमा झाल्याने कमी झालेली दृश्यमानता या सगळ्यांतून काही शे किलोमीटर बाईक चालवणे म्हणजे दिव्यच. पण इथे काही पर्याय नव्हता. नाश्ता आटोपला तोवर पाऊस थोडा थांबला. मग आम्ही लगेचच आवराआवरी करून निघालो. अंगावर रेनकोट चढवला होताच.

जंग धबधबा

आज जंग धबधबा बघून बोमदिला गाठायचे होते. जंग धबधबा तवांगपासून जवळच होता. एका तासातच आम्ही तिथे पोहोचलो. लांबूनच वाहत्या पाण्याचा आवाज येत होता. बाईक्स पार्क करून आम्ही धबधब्याकडे निघालो. गच्च झाडीतून वाट काढत थोडं पुढे गेलो आणि शुभ्र प्रवाहाचा प्रचंड धबधबा दृष्टीस पडला. त्याचे ते प्रथम दर्शन अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे होते. साधारण १०० मीटर उंचीवरुन एका टप्प्यात खाली कोसळणारा हा धबधबा नुरानांग धबधबा म्हणूनही ओळखला जातो. याचे पाणी थेट सेला पास वरील हिमनद्यांतून येते म्हणे. आणि हाच प्रवाह पुढे वाहत जात भूतानमध्ये शिरतो. काल पाहिलेल्या ऐतिहासिक पुलाखालून हाच प्रवाह वाहत होता. धबधब्याच्या आजूबाजूला काहीसा खडकाळ भाग होता. तिथे ग्रुपमधले सगळे जण पांगले आणि पहतो काढू लागले. आम्ही धबधब्यापासून १०-२० मीटर दूर होतो तरी त्याचे थंडगार तुषार अंगावर आदळत होते. फोटोंसाठी फोन बाहेर काढायचे धाडस होत नव्हते. पण अशा दृश्याचे फोटो काढायचे नाहीत म्हणजे काय? प्रवाहापासून थोडा दूर जाऊन मी फोटो काढू लागलो आणि आजूबाजूचा परिसर निरखू लागलो.

धबधब्याचे खाली पडणारे पाणी मोठ्या आवेगाने बाजूच्या ओढ्यात मिसळत होते. ओढाही ते पाणी जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात आपल्यात सामावून घेत होता. आजूबाजूचे वृक्ष त्रयस्थपणे हे सारे नाट्य बघत होते. लाखो वर्षे उभे असलेले पर्वत, शेकडो वर्षांचे वय असलेले ओढ्याच्या पात्रातले खडक, काही दशकांपासून उभे असलेले वृक्ष, आणि अक्षरशः क्षणार्धात वाहून जाणारे पाण्याचे रेणू असे सारे प्रचंड फरकाचे आयुष्यमान असलेले सारे घटक त्या एका चौकटीत अगदी बेमालूम बसले होते. त्या एकाच चौकटीत अस्तित्त्वात असणाऱ्या त्या साऱ्या पात्रांना त्यांच्या कमालीच्या वेगळ्या आयुष्यकाळाची जाणीव होती का? लाखो वर्षांपूर्वी त्याच प्रपातातून पाण्याचे कोणते रेणू वाहत गेले होते हे आजच्या रेणुंना ते पर्वत सांगत असतील का? त्या खळखळ प्रवाहात आपले प्रतिबिंब पाहायचा प्रयत्न करणारी झाडे त्या प्रवाहाला थोडा संथ हो असे सांगत असतील का? त्या धीरगंभीर आवाजात माझी कुठेतरी तंद्री लागली होती. तेवढ्यात कोणीतरी हाक मारली आणि मी भानावर आलो. ग्रुप फोटो काढायला सगळ्यांना गोळा करणं चाललं होतं. तिथे फोटो-बिटो काढून आम्ही धबधब्याचा निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासाला लागलो.

जंगवरुन आम्ही बुम लाच्या दिशेने निघालो. राइड सुरू करतोय आणि अचानक पाऊस जोरात कोसळू लागला. कितीही रेनकोट वगैरे घातला तरी कुठून ना कुठून तरी पाणी आत शिरतंच. पावसाचा जोर वाढला तसे थंड पाण्याचे बारीक ओघोळ रेनकोटच्या आत शिरू लागले. बुटांतही पाणी शिरले. हुडहुडी भरू लागली. राइड मध्ये सगळ्यात वाईट के घडू शकतं ते आता घडत होतं. अजून तर प्रवास सुरूच झाला होता. पाऊस कधी थांबेल याची काहीच शाश्वती नव्हती. जंग गाव मागे पडले आणि सेला पासची खडी चढण सुरू झाली. जसजशी उंची वाढू लागली तशी हुडहुडीही वाढली. इथे तर ढग रस्त्यातच ठाण मांडून बसले होते. पाऊस आडवा-तिडवा कसाही कोसळत होता. एव्हाना मी नखशिखान्त भिजलो होतो. अंग अक्षरशः थरथरत होते. सेला पासच्या अलीकडे एका आर्मी कँटिनवर आम्ही थांबलो. तिथे चहा मागवला. त्या गरम चहाचे घोट घेतल्यावर थोडी तरतरी आली. पाऊस अजून थांबला नव्हताच. पान आम्हाला काही फार वेळ थांबता येणार नव्हतं. आम्ही पावसातच पुढे निघालो. या वेळी आम्ही सेला बोगदा मार्गे जाणार होतो. सेला लेकच्या आसपासचा भाग हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे बंद पडतो. मग काही महीने तवांगचा भारताच्या इतर भागांपासून संपर्क तुटतो. या भागाचे सामरीक महत्त्व लक्षात घेता असे होणे फार धोक्याचे आहे. हे ओळखून BRO ने इथे एक बारा महीने सुरू राहील असा बोगदा बांधला आहे. काहीसा मनालीजवळील अटल बोगद्यासारखा. हा बोगदा सेला पास आणि सेला लेकचा सर्वोच्च भाग बायपास करून थेट बैसाखीजवळ बाहेर पडतो. आम्ही सगळे बोगद्यात शिरलो आणि आरोळ्यांनी सगळा बोगदा दुमदुमला. अशा प्रतिकूल परिस्थितीत एवढा प्रचंड बोगदा बांधणे म्हणजे किती आव्हानात्मक असेल. मला लहानपणी वाचलेलं रारंग ढांग हे पुस्तक आठवत होतं. त्यातला नायक तिथे गस्त घालणाऱ्या जवानांत दिसत होता. आपल्या BRO च्या अभियंत्यांना मनोमन सलाम करून आम्ही तिथून बाहेर पडलो.  

सेला बोगदा

पाऊस सुरू होताच. इथे ढग तर अजूनच गडद वाटत होते. अंग थंडीने हादरत होतं. इथून पुढे रस्ता पुन्हा उताराचा होता. थोड्या वेळातच आम्ही बैसाखी कॅम्प पार केला. इथे जरा थंडी कमी झाली. मग एका ढाब्यावर जेवायला थांबलो. थोडं अन्न पोटात गेल्यावर बरं वाटलं. तरी हातपाय प्रचंड आखडले होते. सगळे कपडे भिजल्याने फारच कोंदट वाटत होतं. ग्रुपमधले काही लोक मात्र एकदम आरामात दिसत होते. उत्तम दर्जाचा riding suit आणि त्याच्यावरचे rain liner यामुळे इतक्या थंडी आणि पावसातही त्यांना काहीच फरक पडला नव्हता. इतकी महागडी उपकरणे लोक का खरेदी करतात ते आत्ता समजलं. अर्थात, तुम्ही वारंवार अशा थरारक सहली करत असाल तर इतका खर्च करणे नक्कीच व्यवहार्य आहे. वर्षातून एखादी सहल करणारा मी बाकीचे दिवस riding suit चे काय करणार? असो. पण पुढच्या वेळी निदान रेनकोट तरी चांगल्या दर्जाचा घ्यायचा असे मी मनोमन ठरवले. जेवण होईपर्यंत साडेतीन वाजले होते. अजून बरेच अंतर बाकी होते. अंधार पडत आला होता. असाच पाऊस सुरू राहिला तर अंधारात बाईक चालवणे अजूनच अवघड होऊन जाईल याची धास्ती वाटत होती. पण नशिबाने पाऊस थांबला. मग मात्र आम्ही सुसाट सुटलो. आता समोर फक्त दोन गोष्टी दिसत होत्या. बोमदिलाचे हॉटेल आणि आशिषच्या हेल्मेटवरचा लुकलुकणारा दिवा. यथावकाश बोमदिलाला पोहोचलो. आज रात्री जागायची कोणातच ताकद नव्हती. सगळे जण जेवण करून लगेचच झोपी गेलो.

Leave a Reply