अनवट ईशान्य भारत – भाग ५ – जसवंतगड युद्धस्मारक

सेला पास मागे एक दंतकथा आहे. असे म्हणतात सेला नावाची एक स्थानिक मोनपा जमातीची मुलगी होती. तिचे भारतीय सैन्यातील रायफलमॅन जसवंत सिंह रावत यांच्यावर प्रेम होते. १९६२ च्या युद्धात जसवंत सिंह यांनी तीन दिवस ही खिंड लढवली. तेव्हा सेला आणि तिची बहीण नूरा यांनी त्यांना अन्न आणि इतर सामुग्री पुरवली. मात्र या युद्धात ते धारातीर्थी पडले. त्यांच्या बलिदानानंतर सेलाने दुःखाच्या आवेगात येथील एका डोंगरावरून उडी मारून जीव दिला. म्हणूनच या सरोवराला सेला सरोवर म्हणतात. अर्थात या कथेचे वेगवेगळे वर्जन्स आहेत. या व्यतिरिक्त या जागेचे सांस्कृतिक महत्वही आहे. सरोवराच्या आसपास बौद्ध स्तूप असून संपूर्ण परिसर तिबेटी प्रार्थना ध्वजांनी सजवलेला आहे. ही जागा जितकी सुंदर होती तितकीच धोकादायकही होती. अतिजास्त उंची असल्याने इथे AMS म्हणजेच acute mountain sickness होण्याचा धोका होता. आमच्या ग्रुपमधल्या काही जणांना आधीच डोकेदुखी सुरू झाली होती. तसेच वातावरण कधीही बदलण्याची शक्यता होती. एव्हाना दुपारचे जवळजवळ अडीच वाजले होते. पोटात कावळे ओरडायला लागले होते. जेवणाचा थांबा अजून दूर होता. त्याआधी जसवंतगड युद्धस्मारक पाहायचं होतं. आम्ही लवकरच तिथून निघालो.  

आता रस्ता उताराचा होता. काही अंतरावर जसवंतगड युद्धस्मारक दिसू लागलं. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या अनेक आठवणी या परिसरात विखुरलेल्या आहेत. जसवंतगड हे त्यांपैकी सर्वात महत्त्वाचं स्मारक. रायफलमन जसवंतसिंग रावत यांनी दाखवलेल्या अद्वितीय शौर्याच्या स्मरणार्थ उभारलेलं हे स्मारक आजही त्या युद्धाची साक्ष देत उभं आहे. १९६२ मध्ये इथे घडलेला संघर्ष Battle of Nuranang म्हणून प्रसिद्ध आहे. स्थानिक मोनपा समाजातील सेला आणि नुरा या दोन तरुणींच्या मदतीने जसवंत सिंग यांनी तब्बल बहात्तर तास विविध ठिकाणांहून गोळीबार करत चिनी सैन्यासमोर संपूर्ण भारतीय तुकडी लढत असल्याचा आभास निर्माण केला. आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत पुढे जाऊन एक चीनी मशीनगन हस्तगत केली. मात्र यात त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. ते सुद्धा जखमी झाले. त्यांच्या मृत्यूबाबत आजही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. काहींच्या मते त्यांनी अखेरची गोळी स्वतःवर झाडली, तर काहींच्या मते चिनी सैन्याने त्यांना पकडून ठार मारलं. पण त्यांच्या पराक्रमामुळे ते भारतीय लष्कराच्या इतिहासातील अमर वीर ठरले. ज्या बंकरच्या आधारे जसवंत सिंह यांनी ही खिंड लढवली त्याच परिसरात आज हे स्मारक उभे आहे. जसवंतसिंग यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या अनेक वस्तू स्मारकात ठेवलेल्या आहेत. बाईकस पार्क करून आम्ही आत गेलो. तिथे ठेवलेल्या वस्तू, छायाचित्रं, माहितीफलक आणि त्या लढाईची कहाणी वाचताना नकळत मन गंभीर होत गेलं. अशा प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जवानांनी दिलेला लढा आणि त्याग याची जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली. काहीसं सुन्न वाटत होतं.

तेवढ्यात तिथे एक पर्यटकांचा ग्रुप आला. सगळे हसत खिदळत फोटो काढताना दिसत होते. स्मारकाच्या बाजूने जिथे दरी होती तिथे सेल्फी काढणं सुरू होतं. ही जागा काही निव्वळ पर्यटनस्थळ नाही. आपल्या जवानांनी दिलेल्या बलिदानाची ती एक गाथा आहे. तिथे थोडीतरी संवेदनशीलता हवी. एखाद्याला युद्धाच्या कथा जाणून घेण्यात रस नसेल तर अशा ठिकाणी येऊ नये. पण तिथे येऊन त्या जागेला एखाद्या व्यू पॉइंट सारखे बघणे आणि आपला पार्टी मूड सगळ्यांना दाखवणे हे कितपत योग्य? आपल्याच देशात आपल्याच जवानांप्रती असा दुरादर दाखवणारे परदेशात जाऊन कसे वागत असतील? असो. तिथल्या कॅंटीन मध्ये एक चहा घेऊन आम्ही पुढे निघालो.   

जसवंतगडनंतर आमचा जेवणाचा थांबा डुमला गावात होता. घड्याळात जवळजवळ साडेतीन-चार वाजत आले होते. ईशान्य भारतात याचा अर्थ दिवस संपत आला होता. निवांत जेवण उरकलं आणि पुन्हा प्रवास सुरू केला. आता पुढचा रस्ता तुलनेने सोपा होता. डुमलाहून जंगपर्यंत बराचसा उतार होता. जंगजवळ नदी ओलांडली आणि त्यानंतर पुन्हा थोडासा चढ सुरू झाला. संध्याकाळचे रंग हळूहळू डोंगरांवर उतरू लागले होते. जसजसे तवांग जवळ येऊ लागले तसतशी आजूबाजूला घरे दिसू लागली. आम्ही शहरात प्रवेश करेपर्यन्त अंधार पडला होता. अंधारामुळे शहराचा फारसा अंदाज येत नव्हता. गुगल मॅपच्या मदतीने आम्ही आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचलो. इथलं हॉटेल लहानसंच होतं. आधीच्या दोन मुक्कामांच्या तुलनेत इथला मुक्काम तसा साधाच होता. मुळात तवांगमध्ये शिमला किंवा मसूरी सारखी मोठी हॉटेल्स नाहीत. इथे पर्यटनही गेल्या काही वर्षांतच वाढायला लागले आहे. त्यामुळे फार उच्च दर्जाच्या सुविधांची अपेक्षाही करणे रास्त नाही. लहान असले तरी हॉटेल स्वच्छ आणि टुमदार होते.  जेवायच्या वेळी आशिषने पुढच्या दिवसाचे ब्रीफिंग द्यायला सुरुवात केली. यापुढचे दोन दिवस आमचा मुक्काम तवांग मध्ये होता. एक दिवस बूमला आणि दुसरा दिवस तवांगचे स्थानिक स्थलदर्शन असा बेत होता. दिवसभराच्या प्रवासानंतर शरीर थकलं होतं. थोडावेळ गप्पाटप्पा करून जेवण आटोपून आम्ही झोपी गेलो.

Leave a Reply