आजचा दिवस तवांगमधील आसपासच्या जागा पाहण्यासाठी होता. मुक्काम हलवायचा नसल्याने पॅकिंगची घाई नव्हती. त्यामुळे आजचा दिवस जरा निवांत होता. आम्ही थोडे उशीरानेच उठलो. नाश्ता करेपर्यंत दहा वाजत आले होते. आशीष म्हणाला बाइक ट्रीप अकराला सुरू होईल. तोपर्यंत हॉटेलच्या मागच्याच बाजूला असलेली बुद्धमूर्ती बघून घ्या. मग आम्ही कॅमेरे घेऊन निघालो. ग्रुपमधले २-४ जण सोबत होते. हॉटेलपासून साधारण अर्धा किमी अंतरावर एक विशाल बुद्धमूर्ती होती. ही तीच मूर्ती जी काल डोंगरमाथ्यावरून दिसली होती. ही मूर्ती म्हणजे तवांगच्या भूदृश्याचा एक ठळक भाग आहे. आम्ही मजल दरमजल करत तिथपर्यंत पोहोचलो. हवा कालच्यासारखी ढगाळच होती. फिरत्या ढगांच्या पार्श्वभूमीवर ती मूर्ती अधिकच शांत आणि प्रसन्न वाटत होती. मूर्तीच्या पायाशी एक ध्यानमंदिर होते. आजूबाजूला तिबेटन प्रार्थनाध्वज आणि प्रार्थनाचक्रे होती. अनेक स्थानिक लोक तिथे दर्शनाला येत होते. इतर काही पर्यटकही होते. मूर्तीच्या दोन बाजूंना दोन मोठी प्रार्थनाचक्रे होती. त्यांच्यावर बांधलेले उतरत्या छपरांचे आडोसे अत्यंत सुंदर दिसत होते. ही जागा थोडी उंचावर होती, त्यामुळे इथून बाकीचे शहरही छान दिसत होते. काल ज्या बाजूने बुम ला पासला गेलो होतो तिथले पर्वत ढगांच्या दुलईत गुडुप झाले होते. इतक्यात आमच्या हॉटेलला मुक्कामाला असलेले काही मराठी पर्यटक दिसले. त्यांचा आज बुम ला चा बेत होता. पण तिथे वर पाऊस आणि हिमवृष्टी सुरू झाली होती. त्यामुळे सैन्याने तो रस्ता पर्यटकांसाठी बंद केला होता. आम्हाला उगाच हायसे वाटले. हिमालयातला लहरी निसर्ग कधी स्वर्गीय नजराणे पेश करेल तर कधी सगळ्या बेतावर पाणी ओतेल. चालायचेच. इतक्यात आशिषचा फोन आला आणि आम्ही सगळे हॉटेलवर परतलो.




आशिष आणि कबीर तयार होतेच. आम्ही बाईक्सवर टांग मारली आणि निघालो तवांग मठाकडे. या शहराची आणि येथील मठाची स्थापना मेराक लामा लोडरे ग्यातसो यांनी पाचवे दलाई लामा यांच्या आज्ञेवरून १६८०-८१ साली केली. ते जेव्हा मठाच्या स्थापनेसाठी उत्तम जागेच्या शोधात होते तेव्हा त्यांना बरेच दिवस उत्तम जागा सापडत नव्हती. एकदा ते एका गुहेत ध्यान करत असताना त्यांचा घोडा हरवला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांना तो घोडा ताना मांदेखांग नावाच्या एका डोंगराच्या माथ्यावर शांतपणे चरताना दिसला. हा एक दैवी इशारा समजून त्यांनी त्याच डोंगरावर मठाची स्थापना करायचा निर्णय घेतला. स्थानिक भाषेत त म्हणजे घोडा आणि वांग म्हणजे निवडलेली जागा अशा अर्थाने या जागेला तवांग हे नाव प्राप्त झाले. हा मठ स्थानिक भाषेत गाडेन नामगयाल ल्हातसे म्हणजेच संपूर्ण विजयाची स्वर्गीय जागा अशा नावाने ओळखला जातो. साधारण ३००० मीटर उंचीवर वसलेला हा मठ आजतागायत कार्यरत असून तिबेटन बौद्ध धर्माचे ल्हासानंतरचे दुसरे महत्त्वाचे केंद्र आहे. इथे एकूण ६५ निवासी इमारती असून येथील ग्रंथालयात अनेक प्राचीन हस्तलिखिते आहेत.

दहा मिनिटांतच आम्ही मठाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. बाईक्स पार्क करून आत शिरलो. मठाचा परिसर बराच मोठा होता. सगळ्या इमारती एकसारख्या रंगसंगतीत सजलेल्या दिसत होत्या. गडद लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेले बौद्ध भिक्षू आसपास दिसत होते. एका अरुंद आणि खड्या चढणीच्या रस्त्यावरून आम्ही मठाच्या मुख्य भागात पोहोचलो. एका बाजूला ग्रंथालय होते तर समोर प्रार्थनागृह होते. आत एक विशाल बुद्धमूर्ती होती. मूर्ती अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटत होती. मूर्तीच्या समोरच्या भागात काही आसने ओळीने मांडलेली होती. ही मठातील लोकांची ध्यानधारणा आणि प्रार्थना करायची जागा. आत्ता प्रार्थना सुरू नसल्याने आम्हाला आतमधून सगळं पाहता येत होतं. मुख्य मूर्तीच्या बाजूने काही इतर देवता आणि संतांच्या मूर्ती होत्या. आम्ही तिथे एक फेरफटका मारून बाहेरच्या प्रांगणात आलो. शेजारीच एक संग्रहालय होते. तिथे मठाचा इतिहास कल्पकतेने मांडलेला होता. आम्ही मठाच्या प्रांगणात फोटो काढत असताना एक लहान भिक्षू मुलामुलींचा ग्रुप तिथे आला. सगळी मुले आमचे कॅमेरे आणि पेहराव निरखून बघत होते. मग आम्ही त्यांच्यासोबतही काही फोटो काढले. समोरच त्यांचे वसतिगृह होते. तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्या इमारतीच्या गच्चीवर जाण्याचे सुचवले. मग आम्ही लगेचच तिथे गेलो. तिथून संपूर्ण तवांग शहराचा सुंदर देखावा दिसत होता. आजही हवा ढगाळ होती. बारीक बारीक पावसाचे थेंब पडत होते. गारठा वाढल्यासारखा वाटत होता. आम्ही तिथून भरपूर फोटो काढले आणि खाली उतरलो.





पुढचं ठिकाण होतं मोगतो गावातील चक-झम पूल. हा एक लोखंडाच्या तारांनी बांधलेला एका ओढयावरचा पूल. हा पूल Druopthop Thangston Gyalpo यांनी चौदाव्या शतकात बांधला. कित्येक शतके हा पूल ऊन, वारा, पाऊस झेलत उभा आहे. १९६२ च्या युद्धात चिनी सैन्याने हा पूल उडवून लावायचे बरेच प्रयत्न केले. मात्र त्यातूनही हा पूल बचवला. त्या आघाताच्या खुणा आजही दिसतात. अगदी ८० च्या दशकापर्यंत हा पूल तवांगला आसाम आणि भारताच्या इतर भागांशी जोडणारा एकमेव दुवा होता. आता मात्र वाहने जाता येतील असा मोठा पूल पलीकडच्या बाजूने झालेला आहे. पण अजूनही स्थानिक लोक पायी ये-जा करायला हा पूल वापरतात. आम्ही मोगतो गावात पोहोचलो. तिथे बाईक्स पार्क केल्या आणि एका दगडी पायवाटेने खाली उतरू लागलो. थोड्याच वेळात हा ऐतिहासिक पूल समोर दिसू लागला. ओढ्याच्या दोन काठांवर दोन मनोरे बांधलेले होते. त्यातून भक्कम अशा एकमेकांत गुंतलेल्या तारा आरपार जाताना दिसत होत्या. त्याच तारांच्या आधारावर हा पूल उभारलेला होता. पुलाच्या दोन्ही बाजूंना तिबेटन प्रार्थनाध्वज लावलेले होते. जेमतेम एका वेळी एक माणूस जाऊ शकेल एवढीच त्याची रुंदी होती. पाय टाकताच सगळा पूल झुलत होता. एका वेळी दोन किंवा तीन जणांनाच पुलावर जायला परवानगी होती. आम्ही एक-एक करून पुलावर जाऊन फोटो काढून आलो. मग पलीकडच्या बाजूला जाऊन पुलाचेही फोटो काढले. स्थानिक लोकांच्या प्राचीन तंत्रज्ञानाचा हा पूल म्हणजे एक उत्तम नमुना होता. एव्हाना दुपारचे चार वाजत आले होते. हलका पाऊसही सुरू झाला होता. आम्ही फोटोसेशन आटोपते घेत तिथून निघालो.




हॉटेलवर परत येऊन मार्केटमध्ये फिरायला बाहेर पडलो. तवांगमध्ये इतरही अनेक मठ आहेत. तसेच एक युद्ध स्मारकही आहे. सगळे काही बघणे शक्य नव्हते. पण या महत्त्वाच्या जागा बघून इथल्या संस्कृतीचा एक आस्वाद आला होता. आपला देश किती प्रचंड मोठा आणि विविधतेने नटलेला आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली होती. मार्केटमध्ये थोडा वेळ फिरून आणि रात्रीचे जेवण उरकून आम्ही हॉटेलवर परतलो. आजची रात्र तवांगमधली शेवटची रात्र होती. एव्हाना ग्रुपमधल्या सगळ्यांची चांगलीच गट्टी जमली होती. आम्ही सगळे उशिरापर्यन्त गप्पा मारत बसलो. अगदी रात्रीचे दोन वाजत आले तरी गप्पा काही संपत नव्हत्या. अगदी कॉलेजमध्ये परत आल्यासारखं वाटत होतं. शेवटी हॉटेलच्या स्टाफने आवाज बंद करा म्हणून तंबी दिल्यावर आम्ही सगळे मुकाट्याने झोपायला गेलो.