अनवट ईशान्य भारत – भाग ७ – तवांग स्थलदर्शन

आम्ही बाईक्सवर टांग मारली आणि निघालो तवांग मठाकडे. या शहराची आणि येथील मठाची स्थापना मेराक लामा लोडरे ग्यातसो यांनी पाचवे दलाई लामा यांच्या आज्ञेवरून १६८०-८१ साली केली. ते जेव्हा मठाच्या स्थापनेसाठी उत्तम जागेच्या शोधात होते तेव्हा त्यांना बरेच दिवस उत्तम जागा सापडत नव्हती. एकदा ते एका गुहेत ध्यान करत असताना त्यांचा घोडा हरवला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांना तो घोडा ताना मांदेखांग नावाच्या एका डोंगराच्या माथ्यावर शांतपणे चरताना दिसला. हा एक दैवी इशारा समजून त्यांनी त्याच डोंगरावर मठाची स्थापना करायचा निर्णय घेतला. स्थानिक भाषेत त म्हणजे घोडा आणि वांग म्हणजे निवडलेली जागा अशा अर्थाने या जागेला तवांग हे नाव प्राप्त झाले. हा मठ स्थानिक भाषेत गाडेन नामगयाल ल्हातसे म्हणजेच संपूर्ण विजयाची स्वर्गीय जागा अशा नावाने ओळखला जातो. साधारण ३००० मीटर उंचीवर वसलेला हा मठ आजतागायत कार्यरत असून तिबेटन बौद्ध धर्माचे ल्हासानंतरचे दुसरे महत्त्वाचे केंद्र आहे. इथे एकूण ६५ निवासी इमारती असून येथील ग्रंथालयात अनेक प्राचीन हस्तलिखिते आहेत.