अनवट ईशान्य भारत – भाग ३ – नामेरी ते दिरांग

सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. डोळे किलकिले करून खिडकीकडे पाहिलं आणि लख्ख सूर्यप्रकाशाने क्षणभर डोळे दिपून गेले. क्षणभर आपण कुठे आहोत हेच समजेना. एवढा तेजस्वी सूर्यप्रकाश एवढ्या सकाळी कसा? घड्याळात पाहिलं तर जेमतेम पावणेपाच वाजले होते. आणि एकदम आठवलं. आपण ईशान्य भारतात आहोत. बाईक ट्रिपवर आलो आहोत. कालच्या रात्रीची झोप तर अक्षरशः बेशुद्धीच होती. आदल्या दिवशीची अडीचशे किलोमीटरची बाईक राईड, त्यातला बराचसा प्रवास अंधारात, आणि त्यानंतरचा थकवा. नेहमीच्या घर ते ऑफिस या राईडच्या तुलनेत ही राईड फारच मोठी आणि थकवणारी होती. उठलो तेव्हा डोकं थोडंसं ठणकत होतं. तेवढ्यात आशिषचा वेक अप कॉल आला. “सहा वाजता सगळे तयार व्हा. आपण रिव्हर राफ्टिंगला जाणार आहोत.”

नामेरी नॅशनल पार्क मधील रिसॉर्ट

आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो, त्यापासून कामेंग नदी अक्षरशः हाकेच्या अंतरावर होती. अरुणाचल प्रदेशातील पर्वतरांगांमधून फेसाळत वाहत येणारी ही नदी आसामच्या मैदानी प्रदेशात पोहोचते तेव्हा तिचा वेग काहीसा मंदावतो.  तिच्या पात्रातल्या मोठाल्या खडकांमुळे छोटेमोठे रॅपिड्स तयार होतात. निळसर-हिरव्या रंगाचं तिचं पाणी फेसाळत खडकांमधून वाट काढत पुढे जात असतं. राफ्टिंगसाठी असा प्रवाह उत्तम. क्षणभर राफ्टिंगला जावंसं वाटलं. पण पुढे पूर्ण दिवस बाईक चालवायची होती. डोकंही थोडं जड वाटत होतं. शेवटी आता विश्रांती घेऊ असं ठरवलं आणि एक गोळी घेऊन दोन-अडीच तास मस्त झोप काढली. बाकीची मंडळी राफ्टिंगला गेली. साधारण नऊ-सव्वानऊच्या सुमारास उठून निवांत नाश्ता करायला गेलो. तोपर्यंत राफ्टिंगला गेलेले सगळे परत आले. त्यांच्या राफ्टिंगबद्दलच्या प्रतिक्रिया मात्र मिश्र होत्या. काही जण म्हणाले, “हे कुठलं राफ्टिंग? नुसती बोट राईड होती.” तर काही जण अक्षरशः भारावून गेले होते. “अरे, काय सुंदर जंगल होतं! इतकं स्वच्छ पाणी, आजूबाजूचे डोंगर आणि निळंभोर आकाश…” त्यांचं बोलणं ऐकून क्षणभर वाटलं की आपण एका छान अनुभवाला मुकलो. पण लगेच मनाची समजूत घातली. ईशान्य भारताची ही काही शेवटची भेट नव्हती. तोपर्यंत आशिषची शिट्टी वाजली होती. सगळ्यांनी नाश्ता आटोपला, सामान आवरलं, आणि पुढच्या राईडसाठी सज्ज झालो.

रिसॉर्टच्या कच्च्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताच काल रात्री ज्या जंगलातून आम्ही अंधारात आलो होतो त्याचा खरा आवाका लक्षात यायला लागला. काल गूढ आणि थोडंसं भीतीदायक वाटलेलं ते अरण्य सकाळच्या प्रकाशात मात्र अत्यंत शांत आणि प्रसन्न दिसत होतं. रस्ता तसा साधा दोन लेनचा होता. दोन्ही बाजूंनी उभे असलेले महाकाय वृक्ष त्यावर हिरवी कमान धरून होते. त्यांच्या खोडांचा आकार इतका एकसारखा होता की वाटत होतं एखाद्या कारखान्यातून बाहेर पडलेले महाकाय ओंडकेच रस्त्याच्या बाजूने कोणी रोवले आहेत. त्यांच्यावर वेलींची जाळी चढलेली होती. खाली झुडपं, रानफुलं आणि दाट हिरवळ. त्या सगळ्यातून सूर्यप्रकाशाचे कवडसे हळूहळू झिरपत होते. मध्येच एखादं गाव दिसत होतं. भाताची शेती दिसत होती. दूरवर निळसर-हिरव्या टेकड्या ढगांमध्ये हरवलेल्या दिसत होत्या. उजव्या हाताला कामेंग नदीचा प्रवाह दिसत होता. कधी तो अगदी हाताशी तर कधी रानात हरवून जात होता.

नामेरीच्या अरण्यातले महाकाय वृक्ष आणि त्यातून जाणारा रस्ता

म्हणता म्हणता आम्ही भालुकपोंगला पोहोचलो. भालुकपोंग हे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या सीमेवरचं गाव. इथे आमच्या परमिट्सची तपासणी झाली. चहा घेतला. थोडा वेळ पाय मोकळे केले. आशिष आणि टीमने सगळी कागदपत्रं तपासून घेतली आणि काही वेळातच आम्ही अरुणाचल प्रदेशात प्रवेश केला. सीमा ओलांडली आणि रस्त्याने लगेचच चढ धरला. एका मागोमाग एक वळणं सुरू झाली. कामेंग नदी आता आमच्या खांद्याला खांदा लावून वाहत नव्हती. ती खाली खोल दरीत उतरली होती. दूरवर दरीत तिची फेसाळती दुधाळ रेषा दिसत होती. समोरचा काळाभोर रस्ता नागमोडी वळणे घेत डोंगरांच्या माथ्यावर चढत होता. आजूबाजूचे महाकाय वृक्ष आता मागे पडले होते. त्यांची जागा माध्यम आकाराच्या गच्च झाडीने घेतली होती. रस्ते थोडे ओलसर होते. कदाचित रात्री पाऊस पडून गेला असावा. डोंगराच्या उतारांवरून अनेक लहान झरे वाहताना दिसत होते.

धुक्यात हरवलेला सेसा धबधबा

तेवढ्यात कुठूनतरी ढगांचा प्रचंड लोट आला आणि आम्ही एका क्षणात त्या अस्पष्ट दुनियेत गुरफटून गेलो. समोर अक्षरशः दहा-पंधरा फुटांपलीकडे काही दिसत नव्हतं. आशिषची बाईक पुढे होती. त्याच्या हेल्मेटवरील दिवा अधूनमधून लुकलुकताना दिसत होता. बाकी सगळ्यांनीही ब्लिंकर्स सुरू केले होते. आम्ही अगदी सावकाश, रस्त्याच्या कडेला धरून पुढे सरकत होतो. अशाच वातावरणात आम्ही सेसा धबधब्याजवळ पोहोचलो. धबधब्याच्या नावाखाली प्रत्यक्षात काही दिसत नव्हतं. फक्त त्याचा आवाज ऐकू येत होता. कुठेतरी जवळच प्रचंड पाणी कोसळत होतं, पण धुक्याच्या पडद्यामागे सगळं अदृश्य झालं होतं. तिथे थोडं वेळ थांबून चहा घेतला. थोडेफार फोटो काढायचा प्रयत्न केला आणि पुढे निघालो.

मनात मात्र थोडीशी खंत होती. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा मुद्दाम निवडला होता. मॉन्सून संपलेला असतो, आकाश स्वच्छ असतं, भूदृश्यं स्पष्ट दिसतात म्हणून. पण इथे तर निसर्गाने वेगळाच बेत आखला होता. त्यात डोंगराळ प्रदेशात वातावरणाचे काही सांगता येत नाही. थोड्याच वेळात एक मोठा बोगदा लागला. तीन किलोमीटरचा तो बोगदा पार करून आम्ही दुसऱ्या बाजूला आलो आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरशः थबकलो. स्वच्छ मोकळं वातावरण. ढग नाहीत नि धुकं नाही. मन एकदम आनंदून गेलं. डोंगर दऱ्या आपलं स्वतःचं एक हवामान निर्माण करतात याचं हे एक ठळक उदाहरण होतं. बोगदा पार केला आणि रस्ता परत उताराला लागला. वळणं घेत घेत आम्ही पुन्हा नदीच्या दिशेने खाली उतरत होतो. काही वेळाने एक नदी समोर आली. ही तेंगा नदी. ही पूर्वेकडे वाहत पुढे कामेंगला जाऊन मिळते. तिच्यावरचा पूल ओलांडून आम्ही एका जामरी नावाच्या एका छोट्याशा गावात दुपारच्या जेवणासाठी थांबलो.

जामरी गाव
तेंगा नदीच्या काठाशी

घड्याळात जवळजवळ साडेतीन वाजत आले होते. ईशान्य भारतात याचा अर्थ संध्याकाळ जवळ आली होती. आजचा मुक्काम दिरांगला होता. अजून बरंच अंतर बाकी होतं. त्यात बोमदिलाचा डोंगर चढायचा होता. जेवण उरकून आम्ही पुन्हा बाईक्स सुरू केल्या. बोमदिला जवळ येऊ लागलं तसा घाट अधिक तीव्र होत गेला. प्रत्येक वळणागणिक उंची वाढत होती आणि थंडीही. आत्तापर्यंत सुखद वाटणारा गारवा आता मात्र बोचऱ्या थंडीत बदलला होता. थोड्याच वेळात हातमोज्यांच्या आतही बोटं थंड पडायला लागली. हेलमेटचे वायझर थोडे घट्ट केले, जॅकेटची चेन थोडीशी वर केली आणि बाइक पुढे दामटू लागलो.

बोमदिला पास

बोमदिलाच्या सर्वोच्च भागात आम्ही पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता. इथली उंची साधारण २२०० मीटरच्या आसपास होती. जोरदार वारा सुटला होता आणि तापमान झपाट्याने खाली उतरत होतं. तेव्हा पहिल्यांदाच जाणवलं की आपण खऱ्या अर्थाने हिमालयात प्रवेश करतो आहोत. एका टपरीवर थांबून गरम चहाचे घोट घेतले. मॅगी खाल्ली. हातांना थोडी ऊब मिळाली. आणि पुन्हा एकदा “हर हर महादेव” म्हणत आम्ही पुढे निघालो. इथून पुढे रस्ता उताराचा होता. थोडं खाली येताच थंडीची तीव्रता कमी झाली. तरीही अंधारात अजून जवळजवळ दीड तास गाडी चालवायची होती. म्हणता म्हणता आम्ही दिरांगला पोहोचलो.

दिरांग येथील रिसॉर्ट

दिरांग हे छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं गाव. आसपास लष्कराच्या अनेक आस्थापना आहेत. आमचा मुक्काम इथेही एका रिसॉर्टवर होता. अत्यंत सुंदर असे दोन-दोन खोल्यांचे बंगले बांधलेले होते. आम्ही लगेचच रात्रीचं जेवण उरकलं आणि जरा वेळ गप्पा मारत बसलो. आता ग्रुप मधल्या सगळ्यांशी बऱ्यापैकी ओळखी झाल्या होत्या. थोडा वेळ गप्पाटप्पा करून आम्ही झोपेच्या अधीन झालो.

Leave a Reply