तवांगमध्ये स्थानिक जागा पाहण्यासाठी आम्ही दोन दिवस राखून ठेवले होते. त्यापैकी आजचा दिवस होता बुम ला पाससाठी. बुम ला पास म्हणजे भारत – तिबेट सीमेवरचा बिंदू. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या अनेक आठवणी या जागेशी जोडल्या गेलेल्या आहेत. साधारण १५,२०० फूट उंचीवर असलेला हा परिसर म्हणजे रौद्र निसर्गाचं एक विलक्षण रूप. बर्फाच्छादित पर्वत, ओसाड खडकाळ भूभाग, बोचरी थंडी आणि विरळ ऑक्सिजन. संपूर्ण मार्ग भारतीय सैन्याच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे इथे स्वतःचं वाहन नेता येत नाही. स्थानिक परवानाधारक चारचाकी गाड्यांमधूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे आज आमच्या बाईक्सना सुट्टी मिळाली आणि आम्ही फोरबायफोर गाड्यांमध्ये बसून बुम लाकडे निघालो.

सकाळी वातावरण ढगाळ होतं. अशा उंच प्रदेशात स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर निसर्ग अधिक खुलून दिसतो. पण आज तसं नशीब नव्हतं. तवांगच्या आसपासची हिरवाई मागे पडत गेली आणि उंची वाढताच समोर उलगडू लागलं एक वेगळंच जग. मातकट, किरमिजी छटांचे डोंगर, लालसर झुडपं आणि त्यांच्यामध्ये लपलेली निळ्याशार अल्पाइन सरोवरांची माळ. इथे थोडीशी लदाख आणि स्पितीची आठवण येत होती. पण तरीही इथला निसर्ग काहीसा वेगळा होता. प्रत्येक वळणावर गाडी थांबवावी आणि कॅमेरा बाहेर काढावा असं वाटत होतं. शेवटी एका लहान सरोवराच्या बाजूला आम्ही गाडी थांबवलीच. खाली उतरलो तर थंड वाऱ्याचा एक झोत अंगावर आला. मळभ असल्याने थंडी थोडी जास्तच जाणवत होती. उंचीचा परिणामही जाणवत होता. काही सहप्रवाशांना मळमळ आणि चक्कर असे त्रास होऊ लागले होते. मी खबरदारी म्हणून दोन दिवसांपासून डायमॉक्स घेत असल्यामुळे मला काही त्रास झाला नाही. मात्र चालताना काही पावलं टाकल्यावरही दम लागत होता.

आमचा पहिला थांबा होता शुंगत्सेर सरोवर, ज्याला अनेक जण ‘माधुरी लेक’ म्हणून ओळखतात. इथे माधुरी दीक्षितच्या एका गाण्याचे चित्रीकरण झाले होते. इथे बऱ्यापैकी गर्दी होती. एक सैन्याचे उपहारगृह होते. तिथे एक चहा घेऊन आम्ही सरोवराच्या बाजूच्या पायवाटेने थोडे पुढे निघालो. सरोवर फारच मोहक दिसत होते. त्या शांत, नितळ पाण्यात आजूबाजूच्या उंच पर्वतांचे प्रतिबिंब उमटले होते. पाण्याला एक गडद निळसर हिरवी छटा होती. पायवाटेच्या बाजूने बांधलेले तिबेटन प्रार्थना ध्वज तिथल्या मंद हवेत फडफडत होते. गर्दीपासून थोडं दूर जाऊन मी एका दगडावर काही मिनिटं शांत बसलो. अशा ठिकाणी थोडा वेळ ध्यान करण्याची मला सवय आहे आणि प्रत्येक वेळी त्या शांततेचा अनुभव शब्दांपलीकडचा असतो. इथे आम्ही भरपूर फोटो काढले. तेवढ्यात आशिषची हाक ऐकू आलीच.



इथून पुढे बुम लाकडे जाणारा रस्ता अधिकच खडतर होता. भुसभुशीत खडी, मध्येच चिखल, तीव्र चढ, आणि बाजूने खोल दऱ्या यांमधून आमचा चालक अविश्वसनीय कौशल्याने गाडी पुढे नेत होता. मध्ये एका लष्करी तळावर थोडा विसावा घेतला आणि अखेर आम्ही सीमेवर पोहोचलो. येथून पुढे छायाचित्रणाला निर्बंध होते. सर्व तपासण्या पार करून आम्ही सीमारेषेजवळ गेलो. वातावरणात एक वेगळीच गंभीरता होती. तिथे एक लष्करी अधिकारी एका पर्यटकांच्या ग्रुपला १९६२ च्या युद्धातील प्रसंग आणि तिथल्या सैनिकांचं आयुष्य यावर काही गोष्टी सांगत होता. त्याचं प्रत्येक वाक्य ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येत होते. समोरच काही अंतरावर चिनी चौकी आणि सैनिकही दिसत होते. आम्ही सहज विचारलं, “तुमचा त्यांच्याशी कधी संवाद होतो का?” अधिकारी हसत म्हणाला, “नियमित. सीमा राखायची असते, तणाव वाढवायचा नसतो.” सीमेवर फोटो काढण्याची परवानगी नव्हती. मात्र भारतीय सैन्याने स्वतःच्या कॅमेऱ्याने फोटो काढून तत्काळ प्रिंट देण्याची व्यवस्था केली होती. त्या स्मृतीचित्रापेक्षा मौल्यवान आठवण दुसरी कोणती असणार? आम्ही सगळ्यांनी तिथे फोटो काढून घेतले.

एव्हाना तीन वाजत आले होते. थोडक्यात दिवस संपत आला होता. थंडी वाढली होती. बोचरा वारा हाडांत शिरत होता. भूकही लागली होती. आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पण आता मात्र निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दिवसभर ठाण मांडून बसलेले ढग पश्चिम क्षितिजावरून काहीसे पांगू लागले आणि तिथून कलत्या सूर्याची किरणे अवघ्या आसमंतात झेपावली. १५२०० फूट उंचीवरुन दिसणारा तो नजारा विलक्षण असाच होता. हिरव्यागार टेकड्या हळूहळू तपकिरी पर्वतरांगांमध्ये विरघळत होत्या. मध्येच निळी सरोवरं चमकत होती. वारीतून वारकरी नाचत डुलत जावेत तसे ढग एका लयीत सरकत होते. त्याच लयीत आमच्या गाड्यांचा जथ्था त्या धुळीने भरलेल्या रस्त्यावरून धुरळा उडवीत चालला होता. काश आत्ता आम्ही बाईकवर असतो. ते सगळे दृश्य कमालीचे दिसले असते. इथे गाडीच्या काचेतून त्या अवर्णनीय दृश्याचा एक लहानसा तुकडाच काय तो दिसत होता. म्हणतात ना गाडी चालवणे म्हणजे सिनेमा बघण्यासारखे असते तर बाईक चालवणे म्हणजे सिनेमात नायक म्हणून वावरण्यासारखे असते. असो. आम्ही सारखे चालकाला गाडी थांबवायला सांगत होतो. पण इथे सैन्याचे क्षेत्र असल्याने गाडी थांबवायला परवानगी नव्हती.


मग आमचा चालक म्हणाला मी तुम्हाला एक जागा दाखवतो. माझी उत्सुकता अजूनच ताणली गेली. थोडं खाली येऊन एका वळणावर आमच्या चालकाने गाडी थांबवली. बाजूला एक टेकडीवजा उंचवटा होता. त्यावर एक लहानसे तळे होते. आजूबाजूला प्रार्थना ध्वज फडफडत होते. बाजूने एक पायवाट होती. त्या पायवाटेने पुढे गेलो आणि समोर एक थक्क करणारं दृश्य उलगडलं. खाली दरीत संपूर्ण तवांग शहर दिसत होतं. तिथला मठ, बुद्धमूर्ती, घरं, फुटबॉल मैदान, आणि रस्ते अक्षरशः खेळण्यातले असावेत तसे वाटत होते. शहरामागे उभ्या असेलल्या असलेल्या पर्वतरांगा स्थितप्रज्ञ मुनीसारख्या शहराचे निरीक्षण करत होत्या. बाजूने वाहणारे ढग आणि त्यातून लपंडाव खेळणारा सूर्यप्रकाश तर त्या दृश्यावर जणू फिरता स्पॉटलाइट टाकत होते. तिथून अक्षरशः पाय निघत नव्हता. आम्ही तिथे असंख्य फोटो काढले. तवांगला हॉटेल वर परतलो तेव्हा पाच वाजले होते. अर्थातच अंधार पडला होता. मात्र अजून एक अनुभव बाकी होता. तो म्हणजे भारतीय सैन्याने सादर केलेला ‘लाईट अँड साउंड शो’. या कार्यक्रमात तवांगच्या स्थापनेची कथा, १९६२ च्या युद्धाचा इतिहास, सैनिकांचं शौर्य इत्यादि गोष्टी अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडल्या होत्या. आपल्या सैनिकांच्या वीरगाथा ऐकून आम्हा सगळ्यांचे डोळे पाणावले.



कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही तवांगच्या बाजारात फेरफटका मारला. एका छोट्याशा कॅफेमध्ये गरम जेवणाचा आस्वाद घेतला आणि गप्पा टप्पा करत झोपी गेलो. ईशान्य भारतातला उत्तुंग हिमालय आज अगदी जवळून अनुभवला होता.

