Serene Croatia Part 4 | नितांतसुंदर क्रोएशिया भाग ४ – चित्तवेधक डुब्रोवनिक

दुपारनंतर पाऊस कमी झाल्याचे दिसताच मी डुब्रोवनिकची सुप्रसिद्ध तटबंदी (city wall) बघायला निघालो. ही तटबंदी इसवी सनाच्या नवव्या शतकात बांधली गेली. उत्तरोत्तर त्यात सुधारणा करत ती अधिक भक्कम बनवण्यात आली. तिचे आजचे स्वरूप हे सोळाव्या शतकात तुर्की आक्रमकांपासून संरक्षणासाठी केल्या गेलेल्या योजनेचा भाग आहे. २ किमी परीघ आणि २५ मीटर पर्यंत उंच असलेल्या या
तटबंदीवरून फिरणे हे डुब्रोवनिक मधले सर्वात लोकप्रिय आकर्षण आहे. मी कॅमेरा सरसावून तटबंदीवर चढलो. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरणात एक सुखद गारवा होता. इतक्या उंचीवरून शहरातली घरे, रस्ते, चर्च, घड्याळी मनोरा वगैरे सारे फारच मोहक दिसत होते.