Serene Croatia Part 4 | नितांतसुंदर क्रोएशिया भाग ४ – चित्तवेधक डुब्रोवनिक

क्रोएशियाच्या दक्षिण टोकावरचे डुब्रोवनिक (Dubrovnik)
हे एक महत्त्वाचे
शहर. साधारण ४२००० लोकवस्ती असलेले हे शहर तेथील मध्ययुगीन स्थापत्यकलेसाठी
प्रसिद्ध आहे. झदारमधील थरारक गुहावलोकन आटोपून दुपारी दीड वाजता मी डुब्रोवनिक
कडे जाणारी बस पकडली. प्रवासाला एकूण १० तास लागणार होते. मी छानपैकी खिडकीची जागा
पकडून विसावलो. झदार शहर मागे पडले आणि समुद्र आणि पर्वतरांगा यांच्या मध्यातून जाणारा
प्रशस्त महामार्ग सुरु झाला. एव्हाना सकाळपासून ठिय्या देऊन राहिलेले पावसाळी ढग
पसार झाले होते. दुपारची प्रखर सूर्यकिरणे युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात मागे
राहिलेल्या ढगांना हाकलू पहात होती. उजव्या बाजूने निळाशार एड्रियाटिक समुद्र दुपारच्या
उन्हात चकाकत होता. तर डावीकडे निश्चल पर्वतरांगा त्यांच्या पायथ्याशी चाललेली
वाहनांची लगबग न्याहाळत होत्या. मधेच दिसणाऱ्या लहानशा सपाट भूभागावर कौलारू
छपरांची घरे दाटीवाटीने वसली होती. डोंगरांवर पाईन व ओक वृक्षांची गर्द वनराई दिसत
होती. ते गोंडस दृश्य पाहता पाहता काही तास कसे गेले कळलेच नाही.
 
समुद्रकिनाऱ्यावर वसलेले डुब्रोवनिक शहर
डुब्रोवनिक शहर क्रोएशियाच्या मुख्य भूमीपासून भू-राजकीय
दृष्ट्या वेगळे आहे. हा मधला दहा किलोमीटर एवढा भूभाग बोस्निया-हर्जेगोविना या
देशात येतो. हा देश शेंघेन समुदायाचा भाग नसल्याने येथे पासपोर्ट-व्हिसाची तपासणी होणार
होती. त्यासाठी आम्ही बसमधले सर्व प्रवासी खाली उतरलो. तपासणी नंतर मी जवळच्याच
कॅफेमध्ये शिरलो. कॅफेमधले लोक काहीशा वेगळ्याच नजरेने माझ्याकडे पाहत होते. जणू काही
माझ्या डोक्यावर शिंगं आली असावीत किंवा मी काही विचित्र वेश परिधान केला असावा.
मला हा प्रकार काही कळेनाच. मग लक्षात आलं, त्या बसमध्ये मी एकटाच भारतीय, किंबहुना
युरोपियनेतर वंशाचा होतो. या देशातल्या लोकांनी गोरा नसलेला माणूस कधी फारसा पहिला
नसावा. म्हणूनच सगळे टक लावून पाहत होते माझ्याकडे. आपल्या देशात गोऱ्या
पर्यटकांकडे लोक जेव्हा टक लावून पाहतात तेव्हा त्यांना कसं वाटत असेल याचा अनुभव मला
तेव्हा आला. मी नुसते स्मितहास्य केले आणि खाण्यासाठी काही शाकाहारी पदार्थ आहे का
असे विचारू लागलो. पण इथे इंग्रजीचे अवाक्षरही कोणाला काळात नव्हते. त्यात माझे
भारतीय अवरोहाचे इंग्रजी म्हणजे तर काही समजण्याची शक्यताच नाही. शेवटी हातवारे
करून मी एक केक विकत घेतला आणि बसमध्ये जाऊन बसलो. आत्तापर्यत युरोपात असा अनुभव
कधीच आला नव्हता. शामवर्णीयांच्या देशात गोरा माणूस
exotic असेल तर गोऱ्या लोकांच्या देशात शामवर्णीय exotic असणारच! असो.
 
अखेरीस रात्री अकरा वाजता डुब्रोवनिकला पोहोचलो.
शहराच्या जुन्या मध्यवर्ती भागात एक
bed and breakfast सुविधा असलेली खोली आरक्षित केली होती. तिथला
घरमालक अगदीच आगत्यशील होता. मोठ्या उत्साहाने त्याने त्याच्या बायकोची आणि मुलीची,
आणि शिवाय मांजराची ओळख करून दिली. शहराचे नकाशे व माहितीपुस्तिका तर दिलीच, शिवाय
स्वस्त आणि मस्त अशा उपहारगृहांची एक यादीसुद्धा दिली. आपल्या मोडक्या-तोडक्या
इंग्रजीतून तो त्याच्या घरातल्या सुविधांविषयी भरभरून सांगत होता. एरवी जेवढ्यास
तेवढं बोलणाऱ्या पश्चिम युरोपियन लोकांच्या तुलनेत इथले आदरातिथ्य फारच सुखावह
होते. एव्हाना फारच उशीर झाला होता. यजमानाला शुभरात्री म्हणून मी निद्राधीन झालो.
 
मध्यवर्ती मार्गिका आणि घड्याळी मनोरा
दुसरा दिवस उजाडला तो काळे ढग घेऊनच. मी आन्हिकं
आवरेपर्यंत पावसाला सुरुवातही झाली. तसा युरोपातला पाऊस म्हणजे नुसतीच रिमझिम. पण
इथला पाऊस अगदी मुंबईतल्या मान्सूनच्या पावसाची आठवण करून देत होता. आपण पश्चिम युरोपपासून
बरेच लांब आलो आहोत याची जाणीव पदोपदी होत होती. पावसाचा जोर ओसरेपर्यंत मी
खोलीवरच थांबायचं ठरवलं. बसल्या बसल्या उद्योग म्हणून यजमानाने दिलेली माहितीपुस्तिका
चाळू लागलो. डुब्रोवनिक शहराला फारच रंजक इतिहास लाभला आहे. या शहराची मुहूर्तमेढ
इसवी सनाच्या
सातव्या शतकात रोवली गेली. त्या वेळी क्रोएशियाचा
भूभाग रोमन समाज्र्याचा भाग होता. त्यातील एका शहरावर रानटी टोळ्यांचा हल्ला झाला
आणि हजारो नागरिकांना परागंदा व्हावे लागले. त्या निर्वासितांनी मुख्य भूमीपासून
जवळच असलेल्या एका लाउस नामक खडकाळ बेटावर आश्रय घेतला. पुढे त्याच्या शेजारील
बेटावर स्लाव वंशीय लोकांनी वस्ती केली. तत्कालीन क्रोट भाषेत डूब्रावा चा अर्थ
होता ओक वृक्षांची वनराई. त्या बेटाच्या आसपास दाटीने वाढलेल्या ओक वृक्षांमुळे शहराला
नाव पडले डुब्रोवनिक. कालांतराने या दोन बेटांच्या मधली पाणथळ जागा बुजवण्यात आली
व त्यावर शहरातली मध्यवर्ती मार्गिका उभारण्यात आली. हीच ती सुप्रसिद्ध स्त्रादन
मार्गिका
(Stradon street). क्रोएशियन साहित्यातील अनेक कलाकृतींमध्ये या
घटनेचा उल्लेख आहे. मध्ययुगीन व्यापार मार्गांच्या मधोमध असलेले भौगोलिक स्थान, ओक
वृक्षांच्या उत्तम लाकडाची उपलब्धता व त्यामुळे भरभराटीस आलेला जहाजबांधणी उद्योग,
आणि येथील राज्यकर्त्यांची मुत्सद्देगिरी यांमुळे १३ व्या शतकात डुब्रोवनिकचे रगुसा
प्रजासत्ताक (
Republic
of Ragusa)
एक
समृद्ध व्यापारी केंद्र बनले. या शहरात क्रोएशियन कला आणि साहित्य यांचाही विकास
झाला. पुढे अनेक सत्तांतरे झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर युगोस्लाव्हिया देश प्रस्थापित
झाला व डुब्रोवनिक त्यातील एक महत्त्वाचे शहर बनले. मात्र १९९९ मध्ये
युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन क्रोएशिया हा स्वतंत्र देश अस्तित्त्वात आला. सद्यस्थितीत
डुब्रोवनिक हे क्रोएशियाचे अत्यंत महत्त्वाचे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक
केंद्र आहे.
 
रेक्टरचा महाल (Rector’s palace)
दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला. तरीही रिमझिम सुरूच
होती. भले-थोरले काळे ढग आकाशात जणू दबा धरून बसले होते. थोडक्यात, बाहेर फिरण्यासाठी
आजची ग्रहस्थिती काही अनुकूल नव्हती. त्यामुळे आजचा दिवस मी वस्तुसंग्रहालय
पाहण्यासाठी ठरवला.
डुब्रोवनिक मधील रेक्टरचा महाल (Rector’s palace) बराच प्रसिद्ध आहे. डुब्रोवनिकच्या
प्रजासत्ताकाचा प्रशासक येथून आपला कारभार चालवत असे. मुळात गॉथिक
(Gothic) शैलीमध्ये बांधलेल्या या महालाच्या रचनेत
काही बारोक
(Baroque)
प्रबोधनकालीन
(Renaissance) शैलींचे बेमालूम मिश्रण केलेले आहे. या महालाचे सध्या
सांस्कृतिक वस्तुसंग्रहालय बनवले गेले आहे. नशिबाने तिकिटासाठी फारशी रांग नव्हती.
आतमधले मध्ययुगीन बांधकाम फारच सुंदर प्रकारे जतन केलेले होते. आतील दालनांमध्ये डुब्रोवनिकचा
इतिहास अतिशय कल्पकतेने मांडला होता. तिथून बाहेर पडलो आणि पावसाची पर्वा न करता
सरळ मुख्य चौकाकडे वळलो. इथला घड्याळी मनोरा
(Clock tower) डुब्रोवनिकचे एक प्रमुख आकर्षण आहे. मुख्य चौकाच्या
पश्चिम टोकावर दिमाखात उभा असलेला हा मनोरा १५५६ मध्ये बांधला गेला.
त्याच्यावरच्या घंटेशेजारी मारो आणि बारो नावाचे दोन घंटावादकांचे कांस्यपुतळे उभारण्यात
आले. कालांतराने समुद्रावरच्या खाऱ्या वाऱ्यामुळे हे पुतळे हिरवे पडले आणि त्यांना
झेलेंची (
Zelenci – green
twins)
असे
संबोधण्यात येऊ लागले.
काळाच्या ओघात या मनोऱ्याची बरीच पडझड
झाली. मात्र आज त्याचा पूर्ण जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्याच्यावरचे कांस्यपुतळे
वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवले आहेत.
ऐतिहासिक तटबंदी
 
दुपारनंतर पाऊस कमी झाल्याचे दिसताच मी डुब्रोवनिकची
सुप्रसिद्ध तटबंदी
(city wall) बघायला निघालो. ही तटबंदी इसवी सनाच्या नवव्या
शतकात बांधली गेली. उत्तरोत्तर त्यात सुधारणा करत ती अधिक भक्कम बनवण्यात आली.
तिचे आजचे स्वरूप हे सोळाव्या शतकात तुर्की आक्रमकांपासून संरक्षणासाठी केल्या
गेलेल्या योजनेचा भाग आहे. २ किमी परीघ आणि २५ मीटर पर्यंत उंच असलेल्या या
तटबंदीवरून फिरणे हे डुब्रोवनिक मधले सर्वात लोकप्रिय आकर्षण आहे. मी कॅमेरा
सरसावून तटबंदीवर चढलो. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरणात एक सुखद गारवा होता.
इतक्या उंचीवरून शहरातली घरे, रस्ते, चर्च, घड्याळी मनोरा वगैरे सारे फारच मोहक
दिसत होते. मी निर्देशित मार्गावरून पुढे जायला लागलो. काही अंतरावरच एक बुरुजवजा सज्जा
दिसला. तिथून संपूर्ण शहराचे, समुद्राचे आणि लोवरीयेनाक किल्ल्याचे
  (Lovrijenac fortress) अवर्णनीय दृश्य दिसत होते.
व्हेनिसच्या
आक्रमकांना प्रत्युत्तर देण्यासाठी बांधलेल्या या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व
वादातीत आहे. आज या किल्ल्याचा वापर नाट्यगृह म्हणून केला जातो. जगभरात प्रसिद्ध
असलेल्या
Game of
Thrones
या
मालिकेचे चित्रीकरण या किल्ल्याच्या आसपास झाले आहे. शहराचे आणि समुद्राचे वेगवेगळ्या
दृष्टिक्षेपातून फोटो काढत मी तटबंदीवरची प्रदक्षिणा पूर्ण केली.
 
टेकडीच्या माथ्यावरून दिसणारे
विहंगम दृश्य
तिथून जवळच डुब्रोवनिकच्या सुप्रसिद्ध रोप-वे चे स्थानक
होते. हा रोप-वे शहराला लागून असलेल्या एका टेकडीवर घेऊन जातो. उंचीवरच्या जागांचे
मुळातच आकर्षण असल्याने मी मोठ्या उत्साहात रोप-वे ने वर गेलो. संध्याकाळची वेळ
आणि पावसाची शक्यता यांमुळे वर जास्त गर्दी नव्हती. तिथे एक लहानसे उपहारगृह आणि
बसण्यासाठी एक सज्जा बांधला होता. मी एक कॉफी घेतली आणि सज्जावर बसून समोरच्या
नितांतसुंदर दृश्याचा आस्वाद घेऊ लागलो. शहराभोवतालची तटबंदी इथून एका बारीक
रेघेसारखी दिसत होती. त्या खडकाळ किनाऱ्यावर पिवळसर दगडात बांधलेले टुमदार डुब्रोवनिक
फारच सुंदर दिसत होते. किनाऱ्यालगतची इतर बेटे आणि लहानमोठी गावे डुब्रोवनिकचे
राजस रूप मोठ्या कौतुकाने पाहत होती. टेकडीमागचे डोंगर घनदाट वनराईने नटले होते.
आकाशात कृष्णमेघांची वर्दळ पुन्हा सुरु झाली होती. समुद्रावरचा वारा जणू काही त्या
ढगांना पुन्हा कामाला लागायची आज्ञा देत होता. आता थोड्याच वेळात पाऊस कोसळणार याचा
अंदाज बांधून मी रोप-वे ने खाली आलो.
 
एव्हाना अंधार पडत आला होता. माझ्या यजमानाने दिलेल्या
यादीतून एक छानसे भोजनालय मी निवडले आणि रात्रीचे जेवण उरकून खोलीवर परतलो.
दुसऱ्या दिवशी पहाटे परतीचे विमान होते. एक अनोखा अनुभव देणाऱ्या क्रोएशिया देशाला
मनोमन अलविदा करून मी निद्रधीन झालो. 
 
तटबंदीवरून दिसणारे रम्य दृश्य – लोवरीयेनाक किल्ला आणि फेसाळता समुद्र
अधिक फोटोंसाठी येथे क्लिक करा. 

Leave a Reply