सकाळी साधारण सात-सव्वासातच्या सुमारास जाग आली. बाहेर पडलो तर स्वच्छ ऊन पडलं होतं. दिरांगमधलं ते रिसॉर्ट सकाळच्या कोवळ्या उन्हात आणखीच देखणं दिसत होतं. रिसॉर्टमधले कर्मचारी नाश्त्याची तयारी करत होते. बाकीचं पथक अजून झोपेतच असावं. मी बाहेर फेरफटका मारायला आणि फोटो काढायला निघालो. हवेत हलकासा गारवा होता. ऊन पडलं असलं तरी डोंगरांमधून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक वाटत होतं. थोड्याच वेळात सगळे जण नाश्त्यासाठी जमले आणि आशिषने आजच्या राईडचं ब्रीफिंग सुरू केलं. आजचा दिवस संपूर्ण ट्रिपमधला सर्वात महत्त्वाचा दिवस होता. आम्ही दिरांगहून तवांगकडे निघणार होतो आणि वाटेत सेला पास ओलांडणार होतो. दिरांगची उंची साधारण सोळाशे मीटर, तर सेला पास तब्बल चार हजार दोनशे मीटर. म्हणजे काही तासांत जवळपास अडीच हजार मीटरची उंची गाठायची होती. त्यानंतर पुन्हा दरीत उतरून तवांगच्या दिशेने प्रवास सुरू राहणार होता. आशिषने सगळ्यांना उंचीमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सूचना दिल्या. पुरेसं पाणी प्या, गरज वाटली तर मध्येच थांबा, हवामान क्षणाक्षणाला बदलू शकतं, गरम कपडे आणि हातमोजे सहज मिळतील अशा ठिकाणी ठेवा, इत्यादि.

मी मात्र मोबाईलवर गुगल मॅप उघडून पुढचा रस्ता पाहत बसलो होतो. स्क्रीनवर दिसणारी नागमोडी वळणं पाहून मला थोडी धडकीच भरली. लदाखच्या आठवणी जाग्या झाल्या. पण भीतीइतकीच उत्सुकताही होती. उंची वाढत गेली की भूगोल बदलणार, वनस्पती बदलणार, हवामान बदलणार. पूर्व हिमालयाचं खरं रूप आज दिसणार होतं. नाश्ता आटोपला. सामान आवरलं आणि बाईकस्वार होऊन सज्ज झालो. रिसॉर्टच्या मालकाने स्थानिक बौद्ध परंपरेनुसार आमच्या गळ्यात रंगीबेरंगी खादा घातले आणि सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आम्ही त्यांचा निरोप घेतला, हेल्मेट चढवलं आणि नेहमीप्रमाणे “हर हर महादेव!” म्हणत तवांगच्या दिशेने निघालो.

दिरांगपासून पुढचा संपूर्ण प्रदेश पश्चिम कामेंग आणि तवांग जिल्ह्यात मोडतो. हा भाग भारताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर लष्कराचं मजबूत अस्तित्व जाणवत राहतं. दर काही किलोमीटरवर एखादी लष्करी छावणी दिसतेच. १९६२ च्या युद्धाच्या आठवणी या प्रदेशात अजूनही जिवंत आहेत आणि त्याची जाणीव प्रवासभर होत राहते. दिरांग मागे पडताच रस्ता अपेक्षेप्रमाणे चढू लागला. सुरुवातीला आजूबाजूचा परिसर विरळ झाडांनी व्यापलेला होता. पण काही वळणं पार होताच दृश्य बदलू लागलं. सूचीपर्णी वृक्ष दिसू लागले. खोल दऱ्या दिसू लागल्या. दूरवर हिमशिखरांची पहिली झलक दिसली आणि लक्षात आलं की आपण वेगाने उंची गाठत आहोत. हवेतला गारवा आता थंडीत बदलू लागला होता. प्रत्येक वळणागणिक तापमान कमी होत होतं. काही वेळाने आम्ही बैसाखीजवळ पोहोचलो. इथं मोठी लष्करी आस्थापना आहे. आमचा पहिला थांबा इथेच होता. तिथे लष्कराच्या कॅंटीनमध्ये चहा घेतला. फोटो काढले. इथून थोडी वरच्या बाजूला नजर टाकली तर सगळे डोंगर ढगात हरवलेले दिसत होते. वर पाऊस नसावा अशी मनोमन प्रार्थना केली आणि निघालो. आता उंची झपाट्याने वाढत होती. प्रत्येक वळणागणिक रस्ता आणखी अरुंद होत होता. डांबरी रस्त्याची गुणवत्ता थोडी खालावली होती आणि चढणही अधिक तीव्र होत चालली होती.
आजूबाजूचा निसर्गही बदलत होता. थोड्याच वेळापूर्वी दिसणारे सूचीपर्णी वृक्ष आता विरळ होत गेले आणि त्यांची जागा उघड्या, बोडक्या डोंगरांनी घेतली. हिरवीगार वनराई मागे पडत होती. क्षितिजावर आता केवळ तपकिरी, राखाडी आणि किरमिजी छटा असलेले पर्वत दिसत होते. मनालीहून अटल बोगदा पार करून लाहौलमध्ये प्रवेश करताना जसा निसर्ग अचानक बदलतो तसंच काहीसं इथेही जाणवत होतं. आम्ही अजून काही वळणं पार केली आणि अचानक पुन्हा एकदा ढगांच्या साम्राज्यात प्रवेश केला. काल बोमदिलाकडे जातानाही धुक्याचा अनुभव आला होता, पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता आम्ही चार हजार मीटरच्या आसपास होतो. ढग अक्षरशः रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी समोर दहा-पंधरा फुटांपलीकडे काहीच दिसत नव्हतं. सगळ्यांनी पुन्हा ब्लिंकर्स सुरू केले आणि सावकाश पुढे सरकायला सुरुवात केली.
काही मिनिटांनी समोर एक भव्य कमान दिसू लागली. ते होतं तवांग जिल्ह्याचं प्रवेशद्वार. त्या कमानीतून पुढे जाताच लक्षात आलं की आपण सेला पासच्या परिसरात पोहोचलो आहोत. हा आमच्या संपूर्ण प्रवासातील सर्वोच्च बिंदू. उंची जवळपास चार हजार दोनशे मीटर. आणि त्या क्षणी जणू निसर्गाने आमच्यावर प्रसन्न होण्याचं ठरवलं. ढग बाजूला सरकले. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला आणि समोर शांतपणे विसावलेलं सेला सरोवर दिसू लागलं. क्षणभर आम्ही सगळे स्तब्ध झालो. समोर शांत निळं सरोवर पहुडलं होतं. आजूबाजूचे बोडके डोंगर त्यात आपलं रुपडं न्याहाळत होते. त्यांच्या उतारांवर लहान लहान झुडपांचे लालसर आणि पिवळसर रंग उठून दिसत होते. कदाचित शरद ऋतूची चाहूल लागली असावी. त्या परिसरात एक विलक्षण शांतता होती. थंड वारा अंगावर झोंबत होता, पण त्या दृश्याकडून नजर हटत नव्हती. बाईक्स बाजूला लावून आम्ही बराच वेळ तिथेच फिरत राहिलो. वरच्या छोट्या व्ह्यू पॉइंटपर्यंत चालत गेलो. तिथून बरेच फोटो काढले.





