पण उलूवातूचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिर नव्हतेच मुळी. ते होते त्या जागेचे सौंदर्य आणि तिथून दिसणारा सूर्यास्त. मंदिराच्या मागेच डोंगरकडा थेट समुद्रात कोसळत होता. जवळपास चार-पाचशे फूट असेल त्या डोंगरकडयाची उंची. खाली अथांग समुद्राच्या लाटा बेभान आदळत होत्या. मस्त वारा सुटला होता. आकाश सोनेरी-गुलाबी झाले होते. बालीच्या बेटाचा हा दक्षिणेतर भाग. हा तोच हिन्दी महासागर जो कधीतरी लहानपणी कन्याकुमारीला पाहिलेला. एखाद्या बालसवंगड्याची बर्याच वर्षांनी भेट व्हावी आणि ओळख पटल्यावर त्याच्याशी गळाभेट व्हावी तसं वाटत होतं.