Into the Desert of Jordan – Part 3 – Pompeii of the East : Jerash | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग ३ – पूर्वेकडचे पॉम्पेई : जेराश

जॉर्डनच्या भूमीला समृद्ध असा इतिहास लाभला आहे.
या देशाला जॉर्डन हे नाव जॉर्डन नदीवरून पडले. जॉर्डनच्या वायव्य सीमेवरील गॅलिली
समुद्रातून उगम पावणारी ही नदी दक्षिणेकडे वाहत मृत समुद्राला मिळते.
प्रागैतिहासिक काळापासून या नदीच्या खोऱ्यात मानवी संस्कृती नांदत होती. आज ही नदी
इस्रायल आणि जॉर्डन मधली सीमारेषा आहे. ईसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात या प्रदेशात
नबातिअन टोळ्यांचे राज्य होते. पेट्रा ही त्यांची राजधानी होती. सिकंदराच्या
स्वारीनंतर हा प्रदेश ग्रीक साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्याच दरम्यान येथे
अनेक नगरे बांधली गेली. अम्मानचे पूर्व स्वरूप – फिलाडेल्फिया आणि जेराश ही त्याच काळात
वसवली गेलेली शहरे. कालांतराने जॉर्डनची भूमी पूर्व रोमन साम्राज्याला जोडली गेली.
पूर्व रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर काही मुस्लीम सत्ताधीशांनी येथे राज्य केले.
कृसेड्स च्या काळात यांनीच मुस्लिमांचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ऑटोमन साम्राज्याचा
अंमल येथे काही दशके राहिला. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांच्या नेतृत्त्वाखाली
येथे ‘हशेमाईत किंग्डम ऑफ जॉर्डन’ ची स्थापना झाली. जॉर्डनचे हे आधुनिक रूप म्हणजे
संवैधानिक राजेशाही आहे.
जेराशमध्ये सापडलेले भग्नावशेष
इतिहासात नांदलेल्या विभिन्न संस्कृतींचा ठसा
जॉर्डनच्या संस्कृतीवर दिसतो. ग्रीक साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना जेराश हे
महत्वाचे व्यापारी केंद्र होते. ईसवी सन ७४९ मध्ये झालेल्या एका भूकंपात या शहराचा
बराचसा भाग उद्ध्वस्त झाला. त्यानंतरच्या छोट्या-मोठ्या भूकंपांत आणि परकीय
आक्रमणांत या शहराची मोठी हानी झाली. कालांतराने सारे शहर जमिनीखाली गाडले गेले.
ईसवी सन १८०६ मध्ये एका जर्मन इतिहासकाराला इथे काही अवशेष सापडले. त्यानंतर केल्या
गेलेल्या उत्खननात भग्नावस्थेतले संपूर्ण शहरच प्राप्त झाले. उत्खननाचे काम आजही
सुरु असून संशोधकांची उत्कंठा वाढवणारे अवशेष सतत प्राप्त होत आहेत. इथे
मिळालेल्या अवशेषांचे प्रमाण आणि स्वरूप इटलीमधील पॉम्पेई या शहरातील अवशेषांशी
मिळते-जुळते असल्याने जेराशला ‘पॉम्पेई ऑफ द ईस्ट’ असेही म्हटले जाते.
 
उत्खननात सापडलेले असंख्य खांब
जेराशचे हे प्राचीन शहर एका बाजूला तर आधुनिक शहर
दुसऱ्या बाजूला अशी आजची रचना आहे. प्राचीन शहराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो
तेव्हा दुपारचे चार वाजत आले होते. प्रवेश बंद होण्यास जेमतेम १५ मिनिटे बाकी
होती. वेळेत पोहोचवल्याबद्दल सालेहचे आभार मानले आणि आत शिरलो. सारे अवशेष बघायला
माझ्याकडे दीडेक तास होता. तिकीट काढून आत शिरतोय तेवढ्यात कानावर काही बंगाली
संवाद पडले. भारतीय पर्यटक? आणि इथे? वळून पाहिले तर नवरा-बायको आणि त्यांचा १२-१३
वर्षांचा मुलगा असे कुटुंब दृष्टीस पडले. ओळख-पाळख झाली. अमित व निलांजना दास आणि
त्यांचा मुलगा असे ते कोलकात्याचे कुटुंब होते. मात्र कामानिमित्त ते इजिप्तमध्ये
कैरो येथे स्थायिक होते. नाताळच्या सुट्टीनिमित्त सारे जॉर्डनच्या सहलीला आले
होते. नीलादी आणि अमितदा अशी खास बंगाली वळणाची संबोधनं मी त्यांच्यासाठी ठरवून टाकली.
माझं बंगाली भाषेचं (जुजबी का असेना) ज्ञान पाहून दोघेही चांगलेच प्रभावित झाले
होते. नीलादींनी नुकताच डिजिटल
SLR कॅमेरा विकत घेतला होता. पण त्याची सगळी functions काही त्यांना ठाऊक नव्हती. माझ्याकडे तसाच
कॅमेरा असल्याचे पाहून त्यांना फारच आनंद झाला. मग जेराशमधल्या ऐतिहासिक अवशेषांत आमचा
फोटोग्राफी क्रॅश कोर्स सुरु झाला. त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. मीही
जमेल तसं त्यांना सांगत होतो.
 
आर्च ऑफ हेड्रीयन
आर्च ऑफ हेड्रीयन वरील सुरेख कोरीवकाम
जेराशमधली प्राचीन शहराची ती जागा तशी बरीच मोठी
होती. आत शिरताच समोर दिसलेली वास्तू होती ‘आर्च ऑफ हेड्रीयन’. ईसवी सन १२९ मध्ये हेड्रीयन
नामक ग्रीक सम्राटाच्या स्वागतासाठी ही वास्तू बांधली गेली. ही वास्तू पाहून रोममधल्या
कोलोसियमच्या बाहेर स्थित असलेल्या प्रवेशद्वाराची आठवण झाली. एकंदरीत स्थापत्यशैलीमध्ये
बरेच साधर्म्य होते. पिवळसर वालुकाश्माने बांधलेली ती वास्तू फारच मोहक दिसत होती.
त्यावरचे बारीक कोरीवकामही अप्रतिम होते. इथून पुढे जाताच हिपोड्रोम चे विशाल
मैदान नजरेस पडले. हिपोड्रोम म्हणजे घोड्यांच्या शर्यतीसाठीचे मैदान. तिथली
वैशिष्ट्यपूर्ण आसनव्यवस्था पाहून आम्ही पुढे निघालो. शहराच्या मध्यवर्ती भागात एक
प्रचंड लंबवर्तुळाकृती मैदान होते. त्याच्या कडेने सुंदर कोरीवकाम केलेले खांब
होते. या जागेस ओवल फोरम म्हणतात. इथून पुढे शहरातला मुख्य रस्ता सुरु होत होता.
या मार्गाच्या दोन्ही बाजूंना जवळपास १० मीटर उंच असे खांब होते. खांबांच्या टोकांवर
पाना-फुलांची नक्षी कोरलेली होती. एकसारख्या उंचीचे व रचनेचे ते खांब त्या
मार्गिकेला राजेशाही साज चढवत होते. असे शेकडो खांब उत्खननात सापडले होते. कदाचित
शहरातली प्रत्येक इमारत अशा खांबांच्या आधाराने उभारलेली असावी. हजार वर्षांपूर्वी
हे शहर कसे दिसले असेल याचे कल्पनाचित्र रंगवण्यात मी दंग झालो होतो. कलत्या
उन्हाच्या सोनेरी प्रकाशात ते सारेच भूदृश्य विलक्षण सुंदर दिसत होते. माझ्या
कॅमेराला जराही उसंत नव्हती.
 
ओवल फोरम
त्या प्रशस्त मार्गिकेच्या डाव्या अंगाला ग्रीक
देवतांची मंदिरे होती. तर दक्षिणेकडच्या बाजूला एक सभागृह होते. अम्मानमध्ये
पाहिलेल्या सभागृहाचाच लहान अवतार इथे बघायला मिळाला. सभागृहाच्या व्यासपीठावर पारंपरिक
पोशाखातले काही तरुण वाद्यवादन करत होते. कोणत्याही ध्वनीक्षेपकाशिवाय त्या
सभागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांचा आवाज सुस्पष्ट ऐकू येत होता. प्राचीन
काळातील स्थापत्यविशारदांची आवाजाबद्दलची समज किती उत्तम असावी! अवशेषांच्या
बाजूने बरेच उत्खनन चालले होते. काही ठिकाणी इमारतींचे पुनरुज्जीवन सुरु होते. अवशेषांच्या
पलीकडच्या बाजूला आधुनिक जेराश दिसत होते. चिंचोळ्या रस्त्यांवरून गाड्या धावत
होत्या. कोणत्याही सौंदर्यदृष्टीचा अभाव असलेली घरे दाटीवाटीने उभी होती. शहरातले
लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यग्र होते. मोठ्या प्रमाणावर निर्वासितांनी वस्ती
केल्याने शहराला काहीसे बकाल स्वरूप आले होते. गेल्या हजार वर्षांतील मानवी
संस्कृतीचे संक्रमण या एका जागी अनुभवता येत होते. मानवी संस्कृतीचा हा प्रवाह नक्की
कोणत्या दिशेने चालला आहे असा प्रश्न मला क्षणभर पडला. तितक्यात तिथला सुरक्षारक्षक
बाहेर पडायची वेळ झाली म्हणून सांगायला आला. मी कॅमरा बंद केला आणि माघारी फिरलो.
 
शहरातली प्रशस्त मार्गिका व बाजूचे खांब
खांबांवरील पाना-फुलांची नक्षी
नीलादी आणि अमितदा यांच्यासोबत बोलताना जाणवलं की
त्यांचा आणि माझा पुढच्या काही दिवसांचा बेत सारखाच आहे. मग आम्ही सालेहची गाडी
घेऊन एकत्रच फिरायचे ठरवले. आपल्या मर्जीनुसार फिरता येणार आणि खर्चही वाटला जाणार
हे पाहून मला फारच आनंद झाला. पुढच्या दिवसाची रूपरेषा ठरवून आम्ही एकमेकांचा
निरोप घेतला.
 
प्राचीन शहराच्या पार्श्वभूमीवर दिसणारे आधुनिक शहर
 क्रमशः

0 thoughts on “Into the Desert of Jordan – Part 3 – Pompeii of the East : Jerash | जॉर्डनच्या वाळवंटात – भाग ३ – पूर्वेकडचे पॉम्पेई : जेराश

Leave a Reply