अपरिचित हिमाचल – भाग ४ – कमरू नागचा खडतर ट्रेक

दोन-चार वळणे पार केली आणि कमरू नाग मंदिराचा प्रशस्त परिसर नजरेस पडला. हुश्श! पोहोचलो एकदाचा. डोंगर माथ्यावर एक सपाट प्रदेश होता. एका कोपऱ्यात मंदिर होते. तर त्याच्या समोरच एक तळे होते. तळ्याच्या बाजूने गोलाकार एक पायवाट बांधलेली होती. पलीकडच्या बाजूने आणखी एक वाट मंदिराकडे येताना दिसत होती. ही तीच वाट जी देवीधार आणि शिकारी देवीच्या मंदिराकडून येते. इथून बरेच लोक येताना दिसत होते. तळ्याच्या कडेने काही थोडीफार दुकाने आणि ढाबे होते. फारशी गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी लोकांचा राबता होता. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता. मी मंदिराच्या दिशेने निघालो. हेही मंदिर म्हणजे एक लहानसा चौथराच होता. देवाची मूर्ती म्हणजे एका चौकोनी दगडावर देवाची आकृती कोरलेली होती. चौथऱ्यावर छप्पर उभारले होते. सगळा अतिशय साधा प्रकार होता. पण तरीही फार छान वाटत होतं. मी दर्शन घेतलं आणि बाजूचे तळे निरखू लागलो. या तळ्यात लोकं पैसे, दागिने, वगैरे वस्तू टाकतात देवाला अर्पण करण्यासाठी. असं म्हणतात की या तळ्यात शेकडो करोडो रुपयांची संपत्ती आहे. मात्र त्याला कोणी हात लावत नाही. यातली संपत्ती कोणी बाहेर काढायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर अतिशय वाईट परिस्थिती ओढवते म्हणे. असो.

अपरिचित हिमाचल – भाग ३ – जंझेली ते रोहांडा

चैल-चौक वरून करसोगच्या दिशेने जाणारा आणखी एक फाटा फुटतो. रोहांडाला जायला हाच रस्ता घ्यायचा होता. जसे चैल-चौक सोडले तसा रस्ता पुन्हा डोंगरावर चढू लागला. हिमाचल मधल्या डोंगररांगा एकसलग नाहीत. सतलज, बियास, तीर्थन, अशा नद्यांनी प्रचंड दऱ्या निर्माण केल्या आहेत. तसेच अधे-मधे काही पठारी प्रदेशही आहेत. जशी उंची बदलते तशी भूदृश्ये, वातावरण, झाडांचे प्रकार, पिके सारे काही बदलते. फिरता फिरता हे सारे बदल पाहणे म्हणजे एक रोचक अनुभव असतो. एव्हाना उन्हं उतरणीला लागली होती. गर्द झाडीतून झिरपणारा सोनेरी प्रकाश मोहक वाटत होता. वाटेत प्रत्येक वळणाला भूदृश्य पालटत होते. किती ठिकाणी थांबू आणि किती फोटो काढू असं झालं होतं. वाटेतल्या सृष्टिसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत एकदाचा रोहांडाला पोहोचलो.