नितांतसुंदर क्रोएशिया भाग १ – झाग्रेब आणि प्लिटवित्से नॅशनल पार्क

दक्षिण पूर्व युरोपात भूमध्य समुद्राच्या किनारी
वसलेला क्रोएशिया हा एक लहानसा देश. पूर्वाश्रमीच्या युगोस्लाव्हिया या देशाचे
विभाजन होऊन निर्माण झालेल्या ३ देशांपैकी एक. इथले हवामान मुख्यत्वे समशीतोष्ण खंडीय
आणि भूमध्य सागरी प्रकारचे. ४२ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाच्या आर्थिक
उत्पन्नाचा २०% स्रोत पर्यटन आहे
. जवळपास ७०० किमी समुद्रकिनारा या देशाला लाभला
आहे. पश्चिम युरोपपेक्षा स्वस्त सागरी पर्यटन असल्याने ऑस्ट्रिया, हंगेरी, सर्बिया
यांसारख्या भूबंदिस्त देशांतून इथे पर्यटकांचा कायम ओघ असतो. उन्हाळ्याच्या
दिवसांत तर किनाऱ्याजवळची सगळी शहरे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. त्यामुळे क्रोएशियाला
जाण्याकरता मी एप्रिल मधली ईस्टरची सुट्टी निवडली. नशीबाने विमानाची तिकिटे फार
महाग नव्हती. सहलीची रूपरेषा ठरवून आणि हॉस्टेल बुकिंग वगैरे सोपस्कार करून मी
सहलीच्या दिवसाची वाट पाहू लागलो.

झाग्रेब येथील सेंट स्टीफन कॅथेड्रल 
अखेरीस तो दिवस उजाडला. स्टूटगार्ट हून थेट
झाग्रेब (
Zagreb) मध्ये उतरलो.
झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी. हे शहर किनाऱ्यापासून सुमारे २०० किमी दूर, अंतर्गत
भागात आहे. इथे वातावरण थंड, ढगाळ आणि पावसाळी, म्हणजे थोडक्यात पश्चिम युरोपीय
देशांसारखे होते. हॉस्टेल वर थोडी विश्रांती घेऊन मी संध्याकाळी शहर बघायला बाहेर
पडलो. राजाधानीचं शहर असलं तरी आजूबाजूला तसं शांतच वाटत होतं. शहराच्या मध्यवर्ती
भागातही फारशी गर्दी नव्हती. गुड फ्रायडेची पूर्व संध्या असल्याने बहुतांश दुकाने
बंद होती. जवळच्या चर्च मध्ये प्रार्थना सुरु होती. जणू काही सारे शहरच तिथे
गुंतले असावे. आसपास थोडा फेरफटका मारून मी हॉस्टेलवर परतलो. झाग्रेब मध्ये
पाहण्यासारखं विशेष काहीच नव्हतं. इथे येण्यामागचं कारण होतं प्लिटवित्से नॅशनल पार्क

(Plitvice National Park).

हे पार्क त्यातल्या तलावांच्या आणि धबधब्यांचा
स्वर्गीय सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. झाग्रेबपासून साधारण १४० किमी दक्षिणेकडे वेलेबीट
नामक डोंगराळ भागात हे पार्क वसले आहे आहे. इथे एकूण १६ लहानमोठे तलाव असून ते
एकमेकांशी जोडले गेले आहेत. आसपासच्या पर्वतराजींमधून वाहत येणारे पाणी या तलावांत
जमा होते व अखेरीस कोराना नदीस जाऊन मिळते. वाटेत या पाण्याचे असंख्य प्रवाह आणि
धबधबे बनतात. त्याचे फार रमणीय दृश्य येथे पहावयास मिळते. प्रत्येक ऋतूत या जागेचे सौंदर्य वेगळे असते. हिवाळ्यात बर्फाची शुभ्रशाल पांघरलेले डोंगर आणि गोठलेले
धबधबे तर उन्हाळ्यात हिरवेगार डोंगर आणि त्यातून वाहणारे निळेशार पाणी पर्यटकांना
मंत्रमुग्ध करते.

झाग्रेबहून सकाळी साडेसातची बस घेऊन मी साडेदहाच्या
सुमारास पार्कच्या प्रवेशद्वारापाशी उतरलो. तिकीट वगैरे सोपस्कार पूर्ण करून आतमध्ये
शिरलो. ईस्टरची सुट्टी असल्याने पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ होती. पार्कात
फिरण्यासाठी बऱ्याच पायवाटा आहेत. तिकीटासोबत त्याचा एक नकाशा दिला होता.
त्यातल्या त्यात जास्तीत जास्त तलाव पाहता येतील अशी ८ किमी लांबीची पायवाट मी
निवडली. संपूर्ण दिवस हाताशी असल्याने वेळेची चिंता नव्हती. त्यात ही पायवाट
संपूर्ण तलाव क्षेत्राला प्रदक्षिणा घालून पुन्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी येत
होती. मी कॅमेरा सरसावून मार्गस्थ झालो. आत शिरताच घनदाट वनराई दिसू लागली. वसंत
ऋतूची नुकतीच सुरुवात झाली होती. गर्द पोपटी रंगाची पर्णबाळे फांद्यांमधून डोकावू
लागली होती. मधूनच एखादे झाड फुलांनी बहरलेले दिसत होते. आकाशात ढगांचा सूर्यकिरणांशी
लपंडाव सुरु होता. इतक्यात पहिला तलाव दृष्टीस पडला. आजूबाजूचे डोंगर त्या निश्चल
सरोवरात आपले वसंत ऋतूतले राजस रूप न्याहाळत होते. हा तलाव पार्कमधला सर्वाधिक
उंचीवरचा तलाव होता. इथून पाणी खळाळत उताराच्या दिशेने वाहत इतर तलावांत उतरत
होते. निर्देशित मार्गाने मी पुढे जाऊ लागलो. आत्तापर्यंत शांत वाटणारे पाणी आता खळखळ
करू लागले होते. वाटेच्या दोन्ही बाजूंनी असंख्य ओहोळ वाहत होते. परिक्षेचा शेवटचा
पेपर देऊन सुट्टीची स्वप्नं बघत बागडत घरी निघालेल्या शाळकरी पोरांसारखे ते
पाण्याचे प्रवाह इथेतिथे नाचत होते. इतक्यात पुढचा तलाव दृष्टीस पडला. वाटेत
दिसलेले सारे प्रवाह या तलावाच्या पोटात गुडूप होत होते. तलावाच्या काठाकाठाने वाट
पुढे जात होती. आजूबाजूच्या डोंगरांवरून असंख्य प्रवाहांना हा तलाव आपल्यात
सामावून घेत होता. माझ्या कॅमेराला तर क्षणाचीही उसंत मिळत नव्हती. 

गर्द झाडीत दडलेला धबधबा 
इतक्यात पाण्याचा प्रचंड आवाज ऐकू येऊ लागला.
एखादा प्रचंड जलप्रपात असावा. पण गर्द झाडीत काही दिसत नव्हते. पायवाट तर उताराच्या
दिशेने जात होती. मी खाली उतरू लागलो. जवळपास वीसेक मिनिटे चालल्यावर दाट पर्णराजींतून
कोसळणारा तो जलप्रपात दिसू लागला. मी क्षणभर थबकलोच. जवळपास ५० मीटर उंचीवरून पाणी
रोरावत खाली येत होते. त्याचे तुषार सर्वत्र उडत होते. गर्द हिरव्या रानात हा
शुभ्र प्रवाह फारच विलक्षण दिसत होता. धबधब्याच्या खाली पाण्याचे अगणित ओहोळ
इतस्ततः वाहत होते. पुढच्या तलावात विसावा आधी कोणाला मिळतो याची चढाओढच लागली असावी.
निर्देशित मार्गावरून मी पुढे चालू लागलो. तेवढ्यात ती पायवाट एका अर्धवर्तुळाकृती
लाकडी पुलावर येऊन पोहोचली. पुलाच्या एका बाजूला एक अंतर्वक्र आकाराची टेकडी दिसत
होती. या टेकडीच्या कड्यावरून पाण्याचे लहानमोठे प्रवाह मंद गतीने खाली झेपावत
होते. एखाद्या वाद्यवृन्दातल्या सर्व वादकांनी एकाच लयीत ठेका धरावा तसे ते प्रवाह
एकाच लयीत खळाळत होते. ही जागा अक्षरशः एखाद्या परीकथेतली वाटत होती. इथे मनसोक्त
छायाचित्रण करून मी पुढे निघालो.

शेवटचा महाकाय धबधबा आणि
त्यावरचे इंद्रधनुष्य 
पुढचा एक तलाव बोटीने पार करून मी पायवाटेच्या अंतिम
टप्प्यात दाखल झालो. ही वाट एका अरुंद घळईतून जात होती. वाटेच्या बाजूने
निळे-हिरवे पाणी फेसाळत पुढे जात होते. पार्कमधील मुख्य आकर्षण असलेला सर्वात उंच
धबधबा आता हाकेच्या अंतरावर होता. त्याचा ध्रोंकार कानात घुमत होता. इतक्यात
आकाशातले ढग बाजूला जाऊन स्वच्छ उन पडले. त्या उन्हात तलावांचे पाणी पाचुसारखे
चमकत होते. थोड्या वेळातच धबधब्याजवळ पोहोचलो. इथे पर्यटकांची बरीच गर्दी होती.
निसरड्या खडकांवर बांधलेल्या डुगडुगणाऱ्या लाकडी पुलावर मी उभा होतो. उजव्या बाजूला
खोल दरीत पाणी धबाबत होते. नुकतीच ढगांच्या दुलईतून जागी झालेली सूर्यकिरणे नव्या
उत्साहात त्या जलप्रपाताभोवती सप्तरंगी फेर धरत होती. आजूबाजूचे चुनखडी डोंगरकडे
आणि त्यावरचे वसंतपालवी ल्यालेले लतावृक्ष तो तुषार-किरणांचा खेळ मोठ्या कौतुकाने
पाहत होते. ते दृश्य डोळ्यांत भरून घ्यावे तितके कमी होते. आजूबाजूच्या कोलाहलातही
माझ्यातला निसर्गपूजक त्या रमणीय सोहळ्यात दंग झाला होता. तितक्यात पार्कमधल्या
सुरक्षारक्षकाने शिटी वाजवली आणि पर्यटकांना तिथून हाकलायला सुरुवात केली. त्या डुगडुगणाऱ्या
पुलाची भारवहन क्षमता संपत आली असावी बहुतेक. युरोपात हा असा अनुभव जरा नवीनच
होता. आपण पूर्व युरोपात आलो आहोत याची जाणीव इथे पहिल्यांदा झाली. सगळी गर्दी
मागे वळायच्या आत मी झटपट फोटो काढले आणि तिथून मागे वळलो.



यापुढचा मार्ग म्हणजे पार्कच्या प्रवेशद्वाराकडे
जाणारा परतीचा मार्ग होता. धबधब्याची जागा म्हणजे पार्कमधल्या तलावांचा नीचतम
बिंदू होता. अर्थातच उरलेला मार्ग चढणीचा होता. जवळपास अर्ध्या तासाची चढण चढून
वाट सपाट झाली. इथे दरीच्या दिशेने एक सज्जा बांधलेला दिसला. सहज म्हणून तिथे आत
शिरलो. इथून खालच्या घळईतले प्रवाह एका दृष्टीक्षेपात दिसत होते. सूर्यप्रकाशात
चकाकणारे निळे-हिरवे पाणी उताराच्या दिशेने बेभानपणे झेपावत होते. मार्गातले खडक जणू
पाण्याला थोपवू पाहत होते. पण नदीशी एकरूप होण्याच्या ओढीने निघालेले ते प्रवाह कधी
खडकांवरून तर कधी त्यांच्या फटींतून वेगाने पुढे वाहत होते. दिवसभर दंगामस्ती करून
रात्री आईच्या कुशीत शांतपणे झोपणाऱ्या बालकासारखे ते प्रवाह धबधब्यातून वाहत नदीत
सामावून जात होते. त्या प्रवाहांच्या बाजूने वेटोळे घेत जाणारी लाकडी पायवाट भरल्या
डोळ्यांनी त्या प्रवाहांना अलविदा करत होती. त्या सोहळ्याचे हे शेवटचे दर्शन
डोळ्यांत भरून आणि कॅमेरात बंदिस्त करून मी परतीच्या वाटेला लागलो. एक स्वप्नवत
वाटणारी जागा याचि देही याचि डोळा पाहिल्याचे समाधान मनात होते.

अर्धवर्तुळाकृती पायवाट आणि वाद्यवृंद भासणारे प्रवाह  

सज्ज्यावरून दिसलेले अवर्णनीय दृश्य 
अधिक फोटोंसाठी येथे क्लिक करा. 

0 thoughts on “नितांतसुंदर क्रोएशिया भाग १ – झाग्रेब आणि प्लिटवित्से नॅशनल पार्क

Leave a Reply