अद्भुतरम्य टेनेरीफं – भाग २ – मस्का दरीतली थरारक पायवाट

आज
टेनेरीफंमधला दुसरा दिवस. आजचा दिवस मस्का व्हॅली (Masca valley) मध्ये पदभ्रमण
करण्यासाठी निश्चित केला होता. मस्का हे बेटाच्या वायव्य भागातील जेमतेम १००
लोकवस्तीचे एक छोटेसे गाव. बेटाचा हा वायव्य भाग टेनो टेकड्यांचा (Teno mountains)
प्रदेश म्हणून ओळखला जातो. याच टेकड्यांमध्ये साधारण ६०० मीटर उंचीवर मस्का गाव
आहे. टेनो टेकड्यांचा हा प्रदेश निम्न-शुष्क प्रकारचा असून हवामानाच्या आणि जैवविविधतेच्या
दृष्टीने हा प्रदेश बेटाच्या इतर भागांपेक्षा निराळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मस्का
गावातून एक पायवाट खाली उतरत समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाते. या वाटेवरचा भूप्रदेश
पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. मी अगदी रामप्रहरी हॉस्टेलवरून निघालो. ३-४ वेळा बस
बदलून ४ तासांनी मस्का गावात पोहोचलो. 
 
 
मस्का गाव
स्वतःचे वाहन असते तर हा प्रवास दीडेक तासात सहज करता आला असता. पण तेवढा खर्च करायची तयारी नव्हती. शिवाय युरोपात चालणारा परवाना आणि गाडी चालवण्याचा आवश्यक अनुभव या दोन महत्त्वाच्या गोष्टीही नसल्याने गाडी भाड्याने घेणे हा पर्यायच उपलब्ध नव्हता. असो. मजल दरमजल करत शेवटी मस्का गावात पोहोचलो. इथे पर्यटकांची गर्दी होतीच. तहानलाडू-भूकलाडू यांची तजवीज करून मी पायवाटेने खाली उतरायला सुरुवात केली. उतरण सुरु होताच समोर आला भलामोठा धोक्याची खूण असलेला फलक. या पायवाटेने जाण्यात असलेले संभाव्य धोके तिथे स्पष्टपणे नमूद केले होते. काही क्षण मनात धाकधूक झाली. पण इतके सारे लोक तिथून खाली उतरताना पाहून मी बिनधास्त पुढे जायचा निर्णय घेतला.
मस्का गावातून खाली उतरणारी पायवाट
या
पायवाटेच्या बाजूने पाण्याचा एक ओहोळ वाहत होता. हाच तो मस्का झरा. हा झरा कधी
नुसताच अवखळपणे बाजूने वाहत राही, तर कधी पाषाणांतून धबधब्यासारखा कोसळत खाली येई.
हा झरा पायवाटेला असंख्य वेळा छेद देत होता. त्यामुळे अनेकदा पाण्याच्या डबक्यांतून
चालावे लागत होते. पाण्याच्या प्रवाहाने निसरडे झालेले खडक आपल्या तोल
सांभाळण्याच्या कौशल्याची परीक्षा घेत होते. जसजशी पायावाट खाली उतरत होती तसतशी बाजूच्या
कड्यांची उंची वाढत होती. एका टप्प्यावर पायवाट एका खोल घळाईत उतरली. झऱ्याची सोबत
होतीच. दरीमध्ये घुमणारा झऱ्याचा खुळखुळ आवाज, काहीशी थंड हवा, बाजूचे रौद्र कडे, आणि
विलक्षण शांतता पाहून वाटलं, इथेच जरा वेळ बसावं आणि ध्यानमग्न व्हावं. समर्थ रामदासांनी
त्यांच्या साधनेसाठी शिवथर घळ का निवडली असावी याचा प्रत्यय तिथे आला. मात्र तेवढ्यात
एक ट्रेकर्सचा समूह तिथे अवतरला. त्यांचा कलकलाट बघून ध्यानाबिनाचा विचार सोडून मी
मार्गस्थ झालो. 


घळईत उतरणारी पायवाट
मस्का झरा













































थोडं
पुढे जाताच पायवाट झऱ्यामध्ये, आणि झरा एका प्रचंड दरडीखाली लुप्त झालेला दिसला.
अरे बापरे! आता पुढे जायचं कसं? वाट चुकली बिकली तर नाही ना? मी जरां वेळ परिसर
न्याहाळत उभा राहिलो. तेवढ्यात मागून येणारा ट्रेकर्सचा समूह तिथे पोहोचला. तेही
सारे पहिल्यांदाच तिथे आले होते. आता वाट कुठून असेल याची चर्चा आम्ही चर्चा करू
लागलो. त्या दरडीच्या बाजूने कड्यावरून कोणत्याही साधनाशिवाय चढत जाणे अशक्य होते.
तेवढ्यात एका साहसी वीराने दरडीखाली डोकावून बघुयात असा विचार मांडला. त्या
परिस्थितीत दुसरा कोणता पर्यायही दिसत नव्हता. शेवटी आम्ही दोन-तीन जण गुडघाभर
पाण्यातून चालत दरडीखाली गेलो. थोडं पुढे जाताच पलीकडच्या बाजूने येणारा प्रकाश दिसला
आणि पुढे चालणारे काही ट्रेकर्सही दिसले. थोडक्यात हीच योग्य वाट होती. पाण्याचा
प्रवाह थोडा जास्त असता तर या वाटेने जाणे शक्यच नव्हते. पायवाटेच्या सुरुवातीला
लिहलेल्या इशाऱ्याचं गांभीर्य आता लक्षात आलं.



पुढची
वाट तशी सोपी होती. अखेरीस समुद्रावरचा खारा वारा जाणवू लागला. पायवाट तुलनेने
सपाट झाली आणि चालताना वाळूही बुटात जायला लागली. समुद्रकिनारा जवळ आल्याची
लक्षणं होती. पण समुद्र काही दिसत नव्हता. सहज मागे वळून पाहिलं तर त्या अजस्त्र टेनो
पर्वत रांगा दृष्टीस पडल्या. त्यांच्या कुशीत इवलेसे मस्का गाव उठून दिसत होते.
आपण एवढे अंतर उतरत आलो आहोत यावर क्षणभर विश्वासच बसेना. इथे थोडेफार छायाचित्रण
केले आणि पुढे निघालो. समोरच्या कड्याला वळसा घालून पुढे जातोच तर काय, निळाभोर
समुद्र समोर स्वागताला हजर! एक प्रकारची विजयी भावना मनात दाटली. किनारा तसा खडकाळच
होता. समुद्राच्या फेसाळत्या लाटा त्या खडकांवर आदळत होत्या. आजूबाजूच्या
टेकड्यांचे कडे सरळ पाण्यात उतरत होते आणि लाटांना अंगा-खांद्यावर खेळवत होते. एव्हाना
पश्चिमेकडे कललेल्या सूर्याच्या प्रकाशात ते दृश्य फारच विलोभनीय दिसत होते.
तेवढ्यात बोट आली. मस्का किनाऱ्यापासून लोस जीगान्तेस (Los Gigantes) या
शहरापर्यन्तचा प्रवास आधीच आरक्षित करून ठेवला होता. शहरात पोहोचल्यावर पेटपूजा
केली आणि हॉस्टेलवर परतलो. दिवसभराच्या साहसाने प्रचंड थकवा आला होता. पडल्या पडल्या
झोप कधी लागली ते कळलेच नाही. 
 
 
Los Gigantes कडे जाताना
अधिक फोटोंसाठी क्लिक करा 

Leave a Reply