कमरू नागच्या मंदिराकडे जाणारी ती वाट तशी फार काही अवघड नव्हती. पायवाटेवर चिखल होऊ नये म्हणून दगड पेरून ठेवलेले होते. कधी तीव्र चढण, कधी सपाट भाग, कधी दाट अरण्य, तर कधी मोकळा खडकाळ भाग अशा वैविध्यपूर्ण भूप्रदेशातून ट्रेकचा मार्ग जात होता. बायकांचा ग्रुप थोडा पुढे गेला होता. पण आता वाटेत अजून काही लोक दिसत होते. कदाचित यांनी माझ्या आधीच वर चढायला सुरुवात केली असावी. मी त्यांना गाठू शकलो म्हणजे माझा वेग चांगला होता. मी उगीच मनातल्या मनात खुश होत पुढे चालू लागलो. एव्हाना चांगलीच उंची गाठली होती. फोनचं नेटवर्क गायब झालं होतं. दूरवर हिमशिखरे दिसत होती. हवेतला गारवा वाढला होता. आधीच घामाघूम झाल्याने वरची गार हवा अंगाला झोंबत होती. जॅकेट घातलं तर उकडतंय आणि काढलं तर थंडी वाजतेय अशी विचित्र अवस्था झाली होती. शिवाय दमायलाही झालंच होतं. वाटेत ना कुठे पाणी होतं ना खाण्याची काही सोय. मी सोबत एक पाण्याची बाटली घेतली होती. तीही अर्ध्याहून अधिक संपली होती. दोन तास तर उलटून गेले होते. साडेपाच किमी अंतर अजून काही संपत नव्हते.
तेवढ्यात दोन तरुण वरुन खाली येताना दिसले. मग त्यांना विचारलं अजून किती बाकी आहे? उत्तर ऐकून धक्काच बसला. ते म्हणाले हे जेमतेम अर्धे अंतर आहे. आणि पुढे चढण अजून तीव्र होणार आहे. अरे देवा! म्हणजे साडेपाच किमीला अडीच तास हा माझा अंदाज साफ चुकला होता. मुळात ते अंतर साडेपाच किमी नाही तर आठ किमी होते. इथूनच मागे फिरावं का? उगीच मनात विचार येऊ लागले. माझा चेहरा बघून ते दोघे जण हसत होते. मग म्हणाले कुछ नही भैय्या, हर हर महादेव कहो और चलते जाओ. बडा देव की कृपासे सब हो जाएगा! त्यांच्या बोलण्याने मला जरा हुरूप आला. इथपर्यंत आलोच आहे तर कमरू नागाचे दर्शन घेऊनच जाऊ असं म्हणून मी पुन्हा चढायला सुरुवात केली. पुढे जाऊन बघतो तर भजनं गाणाऱ्या बायकांचा ग्रुप एका झाडाखाली थांबला होता. आणि तिथे तर त्यांनी भजनांवर नाचायला सुरुवात केली होती! त्यांचा उत्साह आणि ऊर्जा बघून मी अवाक झालो! इथे मला एकेक पाऊल टाकताना दमछाक होत असताना या बायका मात्र नाचत आणि गात वर चढत होत्या. आपण शहरी लोकांनी फिटनेसची व्याख्या पुन्हा एकदा तपासून बघायला हवी असं उगीच वाटून गेलं. शेवटी डोंगरदऱ्यांत जन्मलेली आणि वाढलेली ही लोकं. कमरू नाग चा ट्रेक म्हणजे यांच्यासाठी एक अंगणातला फेरफटका होता. आपली आणि त्यांची तुलनाच योग्य नाही. असो. त्यांच्या उत्साहाला सलाम करत मी पुढे निघालो.
आता तीव्र चढण सुरू झाली होती. प्रचंड मोठे देवदार वृक्ष आजूबाजूला दिसत होते. तेवढ्यात एक फाटक दिसले. त्यावर फलक लावला होता – कमरू नाग मंदिर परिसर में आपका स्वागत है. इथून पुढे देवस्थानाचा परिसर सुरू होत होता. कचरा करण्यास बंदी, मद्यपान व धूम्रपान करण्यास बंदी, मासिक पाळी चालू असणाऱ्या महिलांना बंदी वगैरे सूचना त्यावर लिहल्या होत्या. आता जेमतेम १०-१५ मिनिटांचे अंतर राहिले होते. मी पुनश्च हर हर महादेव म्हटले आणि पुढे निघालो. दोन-चार वळणे पार केली आणि कमरू नाग मंदिराचा प्रशस्त परिसर नजरेस पडला. हुश्श! पोहोचलो एकदाचा. डोंगर माथ्यावर एक सपाट प्रदेश होता. एका कोपऱ्यात मंदिर होते. तर त्याच्या समोरच एक तळे होते. तळ्याच्या बाजूने गोलाकार एक पायवाट बांधलेली होती. पलीकडच्या बाजूने आणखी एक वाट मंदिराकडे येताना दिसत होती. ही तीच वाट जी देवीधार आणि शिकारी देवीच्या मंदिराकडून येते. इथून बरेच लोक येताना दिसत होते. तळ्याच्या कडेने काही थोडीफार दुकाने आणि ढाबे होते. फारशी गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी लोकांचा राबता होता. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता. मी मंदिराच्या दिशेने निघालो. हेही मंदिर म्हणजे एक लहानसा चौथराच होता. देवाची मूर्ती म्हणजे एका चौकोनी दगडावर देवाची आकृती कोरलेली होती. चौथऱ्यावर छप्पर उभारले होते. सगळा अतिशय साधा प्रकार होता. पण तरीही फार छान वाटत होतं. मी दर्शन घेतलं आणि बाजूचे तळे निरखू लागलो. या तळ्यात लोकं पैसे, दागिने, वगैरे वस्तू टाकतात देवाला अर्पण करण्यासाठी. असं म्हणतात की या तळ्यात शेकडो करोडो रुपयांची संपत्ती आहे. मात्र त्याला कोणी हात लावत नाही. यातली संपत्ती कोणी बाहेर काढायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर अतिशय वाईट परिस्थिती ओढवते म्हणे. असो.
शिकारी देवीप्रमाणेच कमरू नागची आख्यायिकादेखील महाभारतकालीन आहे. असे म्हणतात की रत्नयक्ष नावाचा एक योद्धा इथल्या पर्वतांत वास करत असे. हा योद्धा विष्णुभक्त होता. भगवान विष्णूला गुरु मानून तो आपला सराव करत असे. जेव्हा महाभारताचे युद्ध होणार अशी माहिती त्याच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्याला वाटले या युद्धात आपण सहभागी व्हावे व जगाला आपले कौशल्य दाखवून द्यावे. त्याने असेही ठरवले की युद्धात जी बाजू कमजोर असेल त्या बाजूने आपण लढायचे. भगवान श्रीकृष्णाला ही गोष्ट समजली आणि त्याने एक क्लृप्ती योजली. कृष्णाला माहीत होते की युद्धात कधी ना कधी कौरवांची बाजू कमी पडणार आणि रत्नयक्ष जर खरेच कौरवांच्या बाजूने लढायला गेला तर पांडवांचे काही खरे नाही. श्रीकृष्ण एका सामान्य ब्राह्मणाच्या वेशात रत्नयक्षाकडे आला. त्याने रत्नयक्षास आव्हान दिले एका बाणाने समोरच्या झाडाच्या सगळ्या पानांना छेदून दाखव. मात्र असे करताना कृष्णाने काही पाने आपल्या पायाखाली दाबली. रत्नयक्षाचा बाण झाडांवरची सगळी पाने छेदून जेव्हा कृष्णाच्या पायाकडे झेपावला तेव्हा कृष्णाने प्रसन्न होऊन त्याला विचारले तुझा गुरु कोण? रत्नयक्षाने विष्णूचे नाव घेताच कृष्णाने आपले खरे रूप प्रकट केले. रत्नयक्ष स्तंभित झाला. साक्षात गुरुलाच समोर प्रकट झालेले बघून तो नतमस्तक झाला. मग कृष्णाने त्याच्याकडे गुरुदक्षिणा मागितली. कृष्ण म्हणाला तुझे शीर कापून दे. रत्नयक्ष लागलीच तयार झाला. मात्र तो म्हणाला की माझी एक इच्छा आहे, मला महाभारताचे युद्ध प्रत्यक्ष बघायचे आहे. कृष्णाने त्याची इच्छा मान्य केली. त्याचे कापलेले शीर त्याने हिमालयातल्या उंच जागी ठेवले जिथून महाभारताचे युद्ध दिसेल आणि असे वरदानही दिले की युद्ध संपेपर्यंत त्यात प्राण शिल्लक राहतील. रत्नयक्षाचे हे शीर म्हणजेच कमरू नाग. या कथेच्या बऱ्याच आवृत्त्या आहेत. एका कथेनुसार कृष्ण रत्नयक्षाचे शीर कुरुक्षेत्रावर घेऊन गेला व धड इथेच राहिले. हे धड म्हणजेच कमरू नाग. तर दुसऱ्या कथेनुसार कमरू नाग म्हणजे भीमाचा नातू आणि घटोत्काचाचा मुलगा बर्बरीक आहे. असो. कमरू नागाचे हे देवस्थान हिमाचल मधले अत्यंत जागरूक देवस्थान मानले जाते. इथे दरवर्षी जून महिन्यात यात्रा भरते. त्यात मोठ्या संख्येने लोक येतात. हजारो रुपयांची संपत्ती तळ्यात अर्पण केली जाते.
दर्शन करून मी मागे वळलो. आता माझा जीव मात्र पुरता गळला होता. डोकं ठणकायला लागलं होतं. अंगात चालायचे त्राण उरले नव्हते. भूकही लागली होती. तेवढ्यात एका बाजूला भंडारा लागल्याचे दिसले. मी लागलीच पंगतीला जाऊन बसलो. इथेही भात, राजमा, आणि कढी असा बेत होता. मनसोक्त जेवल्यावर जरा तरतरी आली. थोडा वेळ मंदिर परिसरात भटकून मग परतीच्या वाटेला लागलो. आता रस्ता उताराचा होता. पण भयानक डोकेदुखीमुळे तो उतारही जीवघेणा वाटत होता. एव्हाना दुपारचे बारा वाजत आले होते. ऊन चांगलेच तापले होते. मी डोळ्यांवर काळा चष्मा चढवला आणि खाली उतरु लागलो. रोहांडापर्यन्त यायला तरी दोन तास लागलेच. खाली आल्यावर एका ढाब्यावर लिंबू सरबत घेतले. समोरच एक शिवमंदिर होते. त्याच्या बाजूला एका प्रचंड दरडीवर हनुमानाचे चित्र रेखटलेले होते. याला हनुमान शिला म्हणतात. रोहांडा गावाची ही एक खूण समजली जाते. तिथे थोडा वेळ फोटोग्राफी करून होम स्टे वर परतलो.
थोडा वेळ विश्रांती घेतली. सोलन पर्यन्त पाच तासांचा रस्ता होता. आता निघून काही चालणार नव्हते. म्हटलं अर्धे अंतर तरी जाऊ. चारच्या सुमारास सामान बांधून निघालो. दोन तासांत तत्तापानी या ठिकाणी पोहोचलो. सतलज नदीच्या काठावर वसलेले हे गाव गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध आहे. तिथेच एका होम स्टे वर मुक्काम केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघून दुपारपर्यन्त सोलनला पोहोचलो. दोन अल्पपरिचित ठिकाणं बघितल्याचं वेगळंच समाधान वाटत होतं. दोन्ही देवस्थाने कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडली याचेही समाधान होतेच. आठवणींच्या शिदोरीत अजून एक पदार्थ बांधला गेला होता. पुढच्या जोडून सुट्ट्या येतील तेव्हा कुठे जायचे याची आखणी करत नेहमीच्या रहाटगाडग्यात गुंतलो.
समाप्त
अनेक धन्यवाद भावा!
भाऊ,तुझे अपरिचित हिमाचालचे चारही भाग वाचले. आलेल्या अनुभवांची खूप छान प्रकारे शब्दबध्द मांडणी केली आहेस.
खरेतर तुझा लेख वाचताना त्यातले शब्द अगदी आपलेच आहेत असे वाटतात आणि आपण स्वतःच त्या अपरिचित ठिकाणावर चालत आहे याची जाणीव होते.
शब्दांसोबत सुंदर छायाचित्रांची गुंफण देखील अप्रतिम आहे.
तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्या.
😊
अनेक धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद, आई!
खूप सुंदर वर्णन ! कितीही खडतर प्रवास असले तरी तू ते नेटाने पूर्ण करतोस आणि ते शब्दबद्ध करून आम्हाला त्याचा अनुभव मिळू देतोस.🙏
विहंग,
हिमाचल प्रदेशातील अनवट वाटा तुझ्या या ब्लॉग मुळे कळू लागल्या. तुझ्या लिखाणातील सहजतेने फेरफटका मारल्याचा आनंद मिळाला.
विहंग तुस्सी ग्रेट.!
अप्रतिम वर्णन अगदी तुझ्याबरोबर आता चालत आहे असेच वाटले. सिमला एकदिवसीय भेट आठवली. दुसऱ्या दिवशी जाता आले नाही याची हुरहूर लागून राहिली.
मनःपूर्वक धन्यवाद मित्रा! लवकरच हिमाचलची ट्रीप प्लॅन कर. 🙂
मस्त वर्णन…तुटत तुटत न वाचता चारही भाग एकत्र वाचण्याचा योग आला याचा आनंद आहे😀
प्रवास वर्णन वाचण्याचा आनंद च काही वेगळा असतो…thank you Vihang for such wonderful Blog… तुझ्या निमित्ताने अनेक दिवसांनी पुन्हा एकदा हिमाचल च अप्रतिम सौंदर्य डोळ्यासमोरून तरळून गेले 😍😍