अंधारबन पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात येतं.
नावाप्रमाणेच हा ट्रेक घनदाट रानातून जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भारतातल्या अति-जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणांपैकी एक. त्यामुळे या परिसरात घनदाट वृक्षराजी आढळते. ही सदाहरित वने त्यांतील वैविध्यपूर्ण जीवसंपदेसाठी
प्रसिद्ध आहेत. अंधारबन चे अरण्य हे त्यातलेच एक संपन्न आणि अस्पर्शित अरण्य. पुण्याहून मुळशी जलाशयामार्गे कोकणात उतरणारा घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. याच रस्त्यावरून ताम्हिणी गाव सोडलं की उजवीकडे थेट लोणावळ्याकडे जाणारा फाटा फुटतो. याच रस्त्यावर लागतं पिंप्री गाव. अंधारबनचा ट्रेक याच गावापासून सुरु होतो.
वेळास कासव महोत्सव Velas Turtle Festival
कोकणातल्या अनेक किनाऱ्यांवर ओलिव्ह रिडले जातीची कासवे घरटी बनवतात. कासवाच्या नैसर्गिक भक्षकांपासून, तसेच कासवाच्या पिल्लांचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या लोकांकडून या पिल्लांना धोका होता. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या स्वयंसेवी संस्थेने या कासवपिल्लांचे रक्षण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यातूनच पुढे आली ‘कासव महोत्सव’ ही अभिनव कल्पना. या संस्थेचे स्वयंसेवक नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात किनाऱ्यावरची कासवांची घरटी शोधून त्यातली अंडी बाहेर काढून सुरक्षित जागी पुरून ठेवतात. पुरलेल्या जागेवर एक टोपली उलटी करून ठेवली जाते. अंड्यांची संख्या, तारीख, वेळ वगैरे तपशील नोंदले जातात. ती जागा कुंपणाने संरक्षित केली जाते. मग दोनेक महिन्यात अंडी फुटून पिल्ले बाहेर येऊ लागतात. या कालावधीत संस्थेचे स्वयंसेवक रोज सकाळी ७ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता टोपल्या वर करून घरटी तपासतात. अंड्यांतून बाहेर आलेल्या पिल्लांना किनाऱ्यावर सोडले जाते. मग ती इवलीशी पिल्ले आपल्या दुडूदुडू चालीने समुद्रात प्रवेश करतात. हा सारा सोहळा म्हणजेच ‘कासव महोत्सव’! पर्यटकांचा या कल्पनेला उदंड प्रतिसाद लाभतो आहे.