अद्भुतरम्य टेनेरीफं – भाग ३ – टेईडं शिखर आरोहण

पुढच्या
दिवशी टेईडं या सुप्त ज्वालामुखीवर जायचं ठरवलं. टेनेरीफं बेटाच्या मधोमध स्थित असलेला
हा ज्वालामुखी म्हणजे भूगर्भशास्त्राच्या आणि जैवविविधतेच्या अभ्यासकांसाठी
पर्वणीच!
टेनेरीफंच्या
दक्षिण किनाऱ्यावरील लोस क्रीस्तीयानोस (Los Christianos) या शहरातून बस पकडून मी टेईडं
च्या दिशेने निघालो. दक्षिण किनाऱ्यावरून येणारा रस्ता म्हणजे सतत बदलणाऱ्या
रोमांचक भूदृष्यांचा खजिनाच! कधी विविधरंगी खडक आणि खुरटी झुडुपे, तर कधी घनदाट
पाईन वृक्षांचे अरण्य आणि त्यातून उतरलेले धुके! तेवढ्यात बसने एक दोन पहाडांच्या
मधून खोदलेल्या खिंडीत प्रवेश केला. खिंडीतून बाहेर पडताच टेईडं चे मुख्य शिखर समोर
दिसू लागले. 
टेईडं शिखराकडे जाणारा रस्ता 
उद्रेकाच्या अंतिम टप्प्यात मुख्य शिखराच्या आसपासचा प्रदेश भूस्खलनामुळे खाली दाबला गेला आणि त्यामुळे जवळपास १६ किमी X ९ किमी आकाराचे प्रचंड विवर निर्माण झाले. या विवरात मोठे वृक्ष उगवू शकत नाहीत. मात्र शुष्क प्रदेशात आढळतात
तशा वनस्पती मात्र चिक्कार उगवतात. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमुळे अनेक प्रदेशनिष्ठ
वनस्पतींचे हे वसतीस्थान आहे. Teide White Broom, Teide Daisy, Teide Violet या
इथल्या काही प्रदेशनिष्ठ वनस्पती. वसंत ऋतूत या वनस्पतींना बहर येतो. ते दृश्य
बघण्यासाठी असंख्य पर्यटक इथे गर्दी करतात. अनेक टप्प्यांमध्ये झालेल्या उद्रेकामुळे
या प्रचंड विवरात अनेक विलोभनीय भूदृश्ये निर्माण झाली आहेत. काही भाग तर
चंद्रावरच्या किंवा मंगळावरच्या भूभागाचा आभास निर्माण करतो. हा सारा परिसर स्पेनच्या
सरकारने राष्ट्रीय उद्यान म्हणून संरक्षित केला आहे. शिवाय जागतिक वारसास्थळ
म्हणून याची नोंद आहेच.
 
टेईडं शिखराच्या सभोवतीचे भूदृष्य
टेईडं शिखराचा पायथा
 
अशा
अद्भुत परिसरातून वळणे घेत घेत बस अखेरीस ज्वालामुखीच्या पायथ्याशी पोहोचली. हा
पायथा मुळातच २३५० मीटर उंचीवर आहे. इथून माथ्यावर जायला केबल कारची सोय आहे. मात्र
केबल कारही ज्वालामुखीच्या सर्वोच्च जागी जात नाही. शेवटचे २०० मीटर चढतच जावे लागते.
हे आरोहण मात्र सरकारनियुक्त मार्गदर्शकासोबत आगाऊ नोंदणी करूनच करता येते. अति-संवेदनशील
पर्यावरणामुळे ज्वालामुखीच्या सर्वोच्च जागी जाण्यावर मर्यादा आहेत. डिसेंबर
महिन्यात हा अति उंचीवरचा भाग बर्फाच्छादित असतो. त्यामुळे माथ्यावरील केबल कार
स्थानकाच्या पुढे चढाई करण्याचा मार्ग बंदच होता. मात्र स्थानकाच्या आसपास फिरता
येत होते. इथून एका दृष्टीक्षेपात संपूर्ण टेनेरीफं बेट, आजूबाजूचा निळाशार
समुद्र, आणि कॅनरी द्वीपसमूहातली इतर बेटे इतका विस्तृत परिसर न्याहाळता येत होता.
नशिबाने वातावरण स्वच्छ होते. इथे थोडे छायाचित्रण करून मी खाली उतरलो.
 
 
टेईडं शिखरावरून दिसणारा विस्तृत प्रदेश- दूरवर ला पाल्मा आणि ला गोमेरा बेटे दिसत आहेत 
  
पुढच्या
दिवशी हॉस्टेल बदलायचे होते. त्यामुळे संध्याकाळचा वेळ एल् मेदानो मध्ये घालावला
आणि सामानाची बांधाबांध करून ठेवली.
पुढचे २
दिवस बेटाच्या उत्तर भागात भटकायचे ठरवले होते. त्यानुसार सांताक्रूझ दे टेनेरीफं
(Santa Cruz de Tenerife) या शहराकडे प्रस्थान केले. हे बेटावरचे सर्वात मोठे आणि
राजधानीचे शहर. त्यामुळे इथे शॉपिंग मॉल्स, नाट्यगृहे, विस्तीर्ण उद्याने, जगभरचे
खाद्यपदार्थ मिळतील अशी उपहारगृहे वगैरे आधुनिक सुविधांची रेलचेल आहे. इथले
समुद्रकिनाऱ्यावर असलेले नाट्यगृह त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेसाठी
प्रसिद्ध आहे. (http://auditoriodetenerife.com/) त्याची रचना सिडनीमधल्या ऑपेरा हाउसचा आभास निर्माण करते. इथे
संध्याकाळचा एक फेरफटका मारला आणि हॉस्टेल वर परतलो. 
 
अधिक फोटोंसाठी क्लिक करा 
 

Leave a Reply