अद्भुतरम्य टेनेरीफं – भाग ४ – रमणीय अनागा टेकड्या

पुढचा
दिवस ठरला होता अनागा टेकड्यांमधल्या भटकंतीसाठी. टेनेरीफं बेटाच्या ईशान्येकडचा डोंगराळ
भाग अनागा म्हणून ओळखला जातो. त्रिकोणी आकाराच्या बेटाचे हे एक निमुळते होत
भूशिरासारखे समुद्रात घुसले आहे. इथला भूप्रदेशही वैशिष्ट्यपूर्ण असून अनेक
प्रदेशनिष्ठ प्रजातींचे वसतीस्थान आहे. इथले प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे लॉरिसिल्वा
अरण्य (Laurisilva or Laurel forest). उपोष्ण कटिबंधातील दमट आणि स्थिर
तापमानाच्या प्रदेशात ही अरण्ये आढळतात. येथील वनस्पती रूंदपर्णी आणि सदाहरित
असतात. आपल्याकडे अशा प्रकारची अरण्ये केरळ मधील पश्चिम घाटाच्या परिसरात आणि
पूर्व हिमालयातील टेकड्यांमध्ये आढळतात. युरोपातील अशा प्रकारच्या अरण्यांपैकी
अनागा मध्ये असलेले अरण्य हे सर्वाधिक वनस्पतीवैविध्य असलेले अरण्य आहे. अशा या
अरण्यात पदभ्रमण करण्यासाठी मी फारच उत्सुक होतो.

लॉरिसिल्वा अरण्यातून जाणारी पायवाट 
तिथला नकाशा आणि बसचं
वेळापत्रक पाहून मी माझा मार्ग निश्चित केला आणि पेटपुजेची व्यवस्था करून मार्गस्थ
झालो. अनागा टेकड्यांमधील क्रुझ डेल कार्मेन (Cruz del Carmen) या साधारण ९०० मीटर
उंचीवरील गावापासून समुद्रकिनाऱ्यावरील पुंता डेल हिडाल्गो (Punta del Hidalgo) या
गावापर्यंत उतरत जाणारा मार्ग मी निवडला होता. बसमधल्या सहप्रवाशांशी बोलता बोलता कळलं
की या बसमधले बहुतांश पर्यटक याच मार्गानेच जाणार होते. इथे पुन्हा मस्का दरीसारखी
पर्यटकांची गर्दीही असेल की काय या विचाराने माझा जरा हिरमोड झाला. पण मस्का दरीतला
वाट शोधण्याचा प्रसंग आठवला आणि म्हटलं, थोडेफार लोक सोबतीला असलेले कधीही बरे!
शेवटी पदभ्रमण सुरु झाले. लॉरिसिल्वा अरण्यातून जाणारा मार्ग फारच विलक्षण होता. बाहेर
कडक उन असूनही अरण्यात ओलसर गारवा होता. हा मार्ग सह्याद्रीतल्या पावसाळी गड-वाटांची
आठवण करून देत होता.



अनागा टेकड्या आणि अटलांटिक महासागर

काही अंतरानंतर अरण्य विरळ होत गेले. ही वाट तशी चालायला सोपी
होती. पर्यटकांची वर्दळ असली तरी कलकलाट मात्र नव्हता. विरळ अरण्यातून ती वाट टेकड्यांच्या
माथ्यावरील पठारावर येऊन पोहोचली. हा भाग या वाटेवरचा सर्वांत नयनरम्य भाग होता.
हिरवे अरण्य पांघरलेला डोंगर निळ्याशार समुद्रात अलगद उतरत होता. शांत आणि
धीरगंभीर असा अटलांटिक महासागर त्या हिरव्या सौंदर्याला अलगद कवेत घेत होता. दुसऱ्या
बाजूला अनागा टेकड्यांमधल्या शिखरांचे दर्शन होत होते. इथून पुढे वाट तीव्र
उताराची होती. प्रत्येक वळणावर टेकड्यांचे आणि समुद्राचे वेगवेगळ्या कोनांतून रोमांचक
दृष्य दिसत होते. थोड्या अंतरानंतर पुंता डेल हिडाल्गो दिसू लागले. समुद्रकिनाऱ्यावरचे
ते टुमदार गाव आणि त्याच्या शेजारचा दीपस्तंभ जणू त्या अनवट निसर्गाची निगराणी करत
होते. त्या दृश्याला नजरेत सामावून घेत मी पुढे निघालो. आता हिरवेगार डोंगर मागे
पडले होते. मातकट राखाडी कडे खोल दरीत उतरत होते. कड्यांच्या बाजूने जाणारी ती
खडकाळ वाट आधीच्या नाजूक वाटेपेक्षा तशी रुक्षच होती. अखेरीस त्या गावी पोहोचलो. तिथल्या
किनाऱ्यावर थोडे छायाचित्रण करून मी परतीच्या वाटेने जाणारी बस पकडली. 

दूरवर दिसणारे पुंता डेल हिडाल्गो गाव 
हिरव्यागार अनागा टेकड्या

अधिक फोटोंसाठी क्लिक करा 
https://www.flickr.com/photos/vihang_8846photos/albums/72157647783438234

Leave a Reply