ओरछातला दिवस उजाडला तो मंदिरातल्या आरतीच्या आवाजाने. शहरातल्या राम राजा मंदिराच्या मागेच तर होतं गेस्ट हाउस. गेस्ट हाउस कसलं, घरच ते. घरातल्याच काही खोल्या हॉटेलच्या रूमसारख्या तयार केल्या होत्या. सुविधा तशा यथातथाच होत्या. पण घरमालक आणि त्याचे कुटुंबीय अगदी उत्तम पाहुणचार करत होते. उठायला तसा उशीरच झाला होता. पटकन आन्हिकं उरकली आणि नाश्ता करायला जवळच्या उपहारगृहावर गेलो. आलू पराठ्याची ऑर्डर दिली आणि बाहेर मांडलेल्या खुर्चीवर येऊन सुस्तावलो. सकाळची आरती करून बाहेर पडलेल्या भाविकांची रस्त्यावर वर्दळ दिसत होती. छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचा बोहनीसाठी कोलाहल चालला होता. उन्हं वर आली होती तरी हवेत बऱ्यापैकी गारठा होता. अमूल बटरवर खरपूस भाजल्या जाणाऱ्या पराठ्याचा खमंग वास दरवळत होता. आता चांगलीच भूक लागली होती.
|
गजबजलेला मंदिराचा परिसर |
तेवढ्यात कानावर काही मराठी शब्द पडले. समोरच बसलेला एक तरुण फोनवर मराठीतून बोलत होता. ओरछा मध्ये मराठी पर्यटक बघून जरा आश्चर्यच वाटले. तसा मराठी माणूस बराच फिरणारा असला तरी अशा ऑफ-बीट ठिकाणी तो सहसा दृष्टीस पडत नाही. असो. मी कुतूहलापोटी त्याच्याशी संवाद साधला. ओळख-पाळख झाली. तर हा तरुण, प्रियांक, होता मुळचा डोंबिवलीचा पण सध्या कॅनडामध्ये स्थायिक. इथे जवळच्या एका शहरात कुणाच्या लग्नाला आला होता. बरेच देश फिरलेला होता. प्रवासाची आवड, गळ्यात कॅमेरा, आणि मराठी कनेक्शन. त्यामुळे आमची लगेच गट्टी जमली. मग ओरछाची भटकंती एकत्रच करायची ठरवलं. समविचारी सहप्रवासी भेटल्याने मी खुश होतो. तेवढ्यात गरमागरम आलू पराठा हजर झाला. गप्पा मारता मारता नाश्ता उरकला आणि तिथल्या किल्ल्याकडे रवाना झालो.
|
जहांगीर महालाचे प्रवेशद्वार |
ओरछा हे एक बेतवा नदीच्या काठावरचं एक लहानसं शहर. स्थानिक भाषेत त्याचा अर्थ होतो लपलेले. आणि खरंच हे एक लपलेलं स्थापत्यरत्न आहे. सोळाव्या शतकात रुद्रप्रताप या राजपूत राजाने हे शहर वसवले. तीन बाजूंनी विळखा घालणारी बेतवा नदी आणि एका बाजूने घनदाट अरण्य असे नैसर्गिक संरक्षण या शहराला होते. रुद्रप्रताप आणि त्याच्या वंशजांनी पुढची दोनेक शतके इथून बुंदेलखंडावर राज्य केले. त्यांना बुंदेला राजपूत असे संबोधतात. त्यांचे मुघलांशी संबंध कधी सलोख्याचे तर कधी शत्रुत्वाचे होते. दरम्यान त्यांनी या शहरात अनेक उत्तुंग इमारती बांधल्या. जहांगीर महाल, चतुर्भुज मंदिर, लक्ष्मी-नारायण मंदिर, आणि बेतवा नदीकाठावरच्या छत्र्या या त्यांपैकी काही महत्वाच्या इमारती होत. इथली स्थापत्यशैली म्हणजे मूळ भारतीय आणि मुघल शैलींचा मिलाफ समजली जाते. बुंदेला राजांच्या राजवटीत स्थानिक चित्रकलाही नावारूपास आली. त्याचे काही नमुने इथल्या महालांच्या भिंतींवर बघायला मिळतात.
मोठ्या उत्सुकतेने आम्ही किल्ल्याच्या आवारात शिरलो. गर्दी फारशी नव्हतीच. तेवढ्यात एक जण गाईड हवा का म्हणून विचारायला आला. अशा फारशा परिचित नसलेल्या ठिकाणी माहितगार असावा म्हणून आम्ही त्याला सोबत घेतले. किल्ल्याचा आवार प्रशस्त होता. त्याची रचना थोडीफार फतेहपुर सिक्री येथील महालाशी मिळती-जुळती होती. इथे आनंद महाल, परवीन महाल, जहांगीर महाल, असे अनेक महाल आहेत. त्यांपैकी जहांगीर महाल हा त्याच्या स्थापत्यसौंदर्यासाठी सुप्रसिद्ध आहे. बुंदेला राजा बीर सिंग देव याचे मुघलांशी मैत्रीचे संबंध होते. विशेषतः जहांगीरशी त्याची खास मैत्री होती. जहांगीरच्या ओरछा भेटीसाठी त्याने हा खास महाल बांधला. पाच माजले आणि आठ सज्जे असलेला हा महाल म्हणजे खरोखरच एक आश्चर्य आहे.
|
जहांगीर महालातली भित्तीचित्रे |
आमच्या गाईडने त्याची माहिती पूर्ण करून आम्हाला जहांगीर महालाच्या प्रवेशद्वाराशी आणून सोडले. मग मी आणि प्रियांक गप्पा मारता मारता महाल फिरू लागलो. महालाची प्रत्येक भिंत नक्षीकामाने सजवलेली होती. सज्ज्यांवरच्या कोपऱ्यांत छत्र्या बांधलेल्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर मुख्य दरबार होता. इथे छतावर सुरेख चित्रे साकारलेली होती. एका सज्ज्यावरून दुसऱ्या साज्ज्यावर जायला बांधेलेले चिंचोळे जिने चक्रावून टाकत होते. आम्ही अक्षरशः प्रत्येक मजल्यावर आणि प्रत्येक सज्ज्यावर जाऊन फोटो काढत होतो. सगळ्यात उंच जागेवरून संपूर्ण शहराचा वेधक नजारा दिसत होता. सगळे माजले बघून झाल्यावर आम्ही महालाच्या मध्यवर्ती भागात आलो. महालाचा संपूर्ण आवाका इथून लक्षात येत होता. प्रत्येक सज्ज्याच्या खालच्या बाजूने हत्तींच्या शिल्पाकृती घडवलेल्या होत्या. लाकडी दरवाजेही उत्तमोत्तम चित्रांनी सजवलेले होते. भारतीय आणि मुघल शैलीचं मिश्रण इथे प्रत्येक शिल्पाकृतीत दिसत होतं. दुपारचं प्रखर उन महालाच्या खिडक्यांतून झिरपत आत येत होतं. त्या कवडशांनी तिथल्या शिल्पाकृती अजूनच उठून दिसत होत्या. किती फोटो काढू किती नको असं झालं होतं. तासभर तिथे घालवून आम्ही तिथून बाहेर पडलो.
|
सज्ज्याखाली घडवलेल्या गजमूर्ती |
|
जहांगीर महालाची मागची बाजू |
|
महालाचा मध्यवर्ती भाग |
|
सर्वोच्च सज्ज्यावरून दिसणारे दृश्य |
|
रामराजा मंदिराचे प्रवेशद्वार |
किल्ल्याच्या बाहेरच होतं राम राजा मंदिर. हे मंदिर म्हणजे ओरछाचा मध्यवर्ती भाग. शहरातले जीवन या मंदिराच्या आसपास फिरते. असं म्हणतात की, ओरछाची राजकन्या गणेशा कुंवारी हिने अयोध्येहून रामाची मूर्ती इथे आणली. मोठे मंदिर बांधायची तिची इच्छा होती. मंदिर पूर्ण होतंय तोपर्यंत तिने तिच्या राहत्या महालातच मूर्ती स्थापित केली. एकदाचे मंदिर बांधून झाले, आणि मूर्तीची स्थापना तिथे करायचे ठरले. पण मूर्ती काही जागची हलेना! मग शेवटी त्या राहत्या महालालाच मंदिर घोषित करण्यात आले. त्यामुळे या मंदिराला ना कळस ना गाभारा. एखाद्या महालाचे असते तसे प्रवेशद्वार आणि अंतःपुरात रामाची मूर्ती. विशेष म्हणजे इथे रामाला गावाचा राजा म्हणून पुजले जाते. म्हणून नाव रामराजा. मंदिरात कसलासा उत्सव सुरु होता. त्यामुळे भाविकांची बरीच गर्दी होती. आम्ही नंतर सावकाश दर्शन घेऊ असा विचार करून चतुर्भुज मंदिराकडे वळलो.
क्रमशः
Good narration