नयनरम्य बाली – भाग ९ – किंतामानीची अंधारवाट Beautiful Bali – Part 9 – The dark road to Kintamani

सेकंपूलचा धबधबा बघून जेवण आटोपून मी लगबगीने किंतामानीकडे निघालो. अजून साधारण ६० किमी अंतर होते. साडेचार वाजत आले होते. अंधार व्हायच्या आत पोहोचेन की नाही याची धाकधूक वाटत होती. अंधारापेक्षा जास्त भीती मला फोनची बॅटरी संपायची वाटत होती. पॉवर बँक होती म्हणा. पण फोन बाइकवर लावलेला असताना चार्ज कसा करायचा ही अडचण होती. आजूबाजूच्या निसर्गाकडे मुश्किलीने दुर्लक्ष करत मी निघालो. रस्ता वळणा-वळणाचाच होता. बालीच्या मध्य भागातून मी आता उत्तर भागात चाललो होतो. बालीचा उत्तर भाग तसा पर्यटनापासून दूर आहे. इथली गावं त्यामानाने गरीब दिसत होती आणि रस्त्यांची अवस्था देखील यथातथाच होती. डोंगर उतरून मी उत्तर किनार्‍यावर असलेल्या एका गावात पोहोचलो. गावाच्या मध्यवर्ती भागात एक मोठा मासळी बाजार होता. बाजार बंद व्हायची वेळ झाली असावी. सगळीकडे एकच लगबग सुरू होती. मासळीचा वास सगळीकडे भरून राहिला होता. अगदी वर्सोव्याच्या कोळीवाड्यात असावं तसं वातावरण होतं. मी त्या गर्दीतून हळहळू वाट काढत पुढे जात होतो. आणि तिथले लोक हा कोण प्राणी इथे आला आहे अशा नजरेने माझ्याकडे बघत होते. परदेशी पर्यटक बालीच्या या भागात किती दुर्मिळ असावेत याची कल्पना मला आली. आपण नक्की बरोबर रस्त्यावर आहोत की नाही याची शंकाही येऊ लागली. मग एका ठिकाणी थांबलो आणि रस्त्यावरच्या एका माणसाला किंतामानीचा रस्ता विचारला. पण इथे लोकांना इंग्रजीचा काहीएक गंध नव्हता. मग आणखी चार जण माझ्याभोवती गोळा झाले. मी हरवलो आहे असा त्यांचा समज झाला आणि मग ते मला तोडक्या मोडक्या इंग्रजीत ऊबुद आणि कुटाचा रस्ता सांगू लागले. मग मी फोनवर किंतामानी टाइप करून दाखवले. मग त्यांच्या लक्षात आले मला कुठे जायचे आहे. तेवढ्यात एक तरुण कुठून तरी उगवला आणि त्याने समजेल अशा इंग्रजीत किंतामानीचा रस्ता सांगितला. खरं तर मी रस्ता चुकलोच होतो. वीसेक किमीचा फटका पडणार होता. आधीच उशीर झालेला. माझे टेंशन अजूनच वाढले. 

पुन्हा एकदा झाडीत वळलेला रस्ता 

मी योग्य रस्त्यावर स्कूटर वळवली आणि वेग वाढवला. हा रस्ता उत्तर किनार्‍याला  स्पर्शून  पुन्हा मध्य भागातल्या डोंगराळ भागात वळत होता. हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावं तसं झालं होतं. आधीच अंधार पडत आला होता आणि रस्ता अजून डोंगराळ आणि गर्द झाडीच्या भागात शिरत होता. शेवटी मी अंधाराची चिंता सोडून दिली. जे होईल ते होईल. Adventure नाही तर ट्रीप ची मजा कशी? बाप्पा मोरया म्हणत समोरच्या चढावर गाडी दामटली. रस्ता सुंदर होताच. मध्येच शेती, मध्येच जंगल, मध्येच तीव्र  उताराच्या  टेकड्या, आणि त्यात वसलेली चिमुकली गावं असे भूदृश्य होते. मी इकडेतिकडे बघत चाललो होतो. सूर्यास्त व्हायला थोडा वेळ होता. पण ऊन लाल-केशरी झाले होते. मध्येच एका गावात एक प्रशस्त आणि रेखीव मंदिर दिसलं. त्यातल्या उतरत्या  छपरांच्या मनोर्‍यांवर लाल-केशरी ऊन सांडलं होतं. मला थांबून फोटो काढायचा मोह आवरेना. तसंही अंग जरा आखडलंच होतं. मग तिथे थांबलो आणि एक-दोन फोटो काढले. थोडं स्ट्रेचिंग केलं. डोंगरमाथ्यावरच्या त्या गावात थंड हवेचे सुखद झोत येत होते. तो क्षण असाच फ्रीज व्हावा असं वाटत होतं. काहीतरी वेगळीच जादू होती त्या जागेत. फार वेळ रमलो तर इथेच अंधार व्हायचा असं म्हणून मी पुढे निघालो.

रस्त्यात दिसलेले सुरेख मंदिर 

आता रस्ता अजूनच गर्द रानात शिरला. उंच आणि महाकाय असे पाईन वृक्ष दिसत होते. मध्येच ढगांचे लोट वाहताना दिसत होते. हवा अजूनच थंड झाली होती. आपण अजून उंचीवर चढत आहोत हे जाणवत होतं. एक वळण घेतलं आणि समोरचं दृश्य बघून मी हबकलोच. स्कूटर बाजूला लावली आणि रस्त्याच्या कडेला आलो. समोर विशाल दरी दिसत होती. आणि त्यात तीन त्रिकोणी डोंगर दिमाखात उभे दिसत होते. हेच ते तीन ज्वालामुखी – अगुंग, अबांग, आणि बतूर. अस्ताला जाणार्‍या सूर्याची प्रभा अवघ्या आसमंतात फोफावली होती. निळा, केशरी, लाल, राखाडी अशा काहीशा रंगांचे मिश्रण असावे तसे आकाश दिसत होते. थंड हवेचे लोट दरीतून उसळून वर झेपावत होते. समोरची दरी म्हणजे बतूर ज्वालामुखीचा caldera होता. उद्या याच ज्वालामुखीवर चढाई करायला जायचं होतं. इथे उभा राहून मी जणू काही त्या डोंगराला नमन करत होतो. चुकलेल्या रस्त्याने मला त्या अद्भुत जागी आणून ठेवलं होतं. आणि त्या डोंगरांचे मला दर्शन घडावे म्हणूनच जणू काही सूर्य क्षितिजावर रेंगाळला होता. माझ्या अंगावर शहारे उमटले. दिव्यत्वाची अनुभूती ती हीच का? ती कोणाला कशी आणि कोणत्या क्षणी येईल ते सांगता येत नाही म्हणतात. हे तसंच काहीतरी होतं बहुतेक. काही क्षण तर मला काय करावे सुचेना. तसाच डोळे मिटून शांत उभा राहिलो. ते दृश्य मनाच्या कॅमेरावर व्यवस्थित कोरून घेतलं. बाजूला एक लहानसे दुकान होते. तेही बंद होत आले होते. मी चटकन एक कॉफी घेतली आणि समोरचे दृश्य बघत पिऊ लागलो. एवढ्या प्रवासानंतर गरम कॉफी सुखद वाटत होती. तेवढ्यात अंधार झालाच.  

तीन ज्वालामुखींचे अद्भुत दर्शन 

अजून शेवटचे १५ किमी बाकी होते. आता थोडेच अंतर उरले आहे. अर्ध्या तासात हॉस्टेलवर पोहोचूच अशा विचारात मी स्कूटर चालू केली. रस्ता उताराचा होता. थोडीफार वस्ती दिसत होती. हवेतला गारठा वाढला होता. फोनची बॅटरी केवळ १०%  शिल्लक होती. एक वळण आले आणि अचानक तीव्र वळणांचा घाट सुरू झाला. मधूनच कुठे पुन्हा घाट सुरू झाला हे मला समजेना. मग लक्षात आले की आपण caldera मध्ये उतरत आहोत. किंतामानी हे गाव मुळात त्या caldera मध्येच वसलेलं होतं. बाईक बरीच वर्षं चालवत असलो तरी अंधारात चालवायचा तेवढा अनुभव नव्हता. शिवाय स्कूटरचा दिवा म्हणजे असून नसल्यासारखा. रस्त्याची अवस्था चांगली असली तरी वळणे तीव्र होती. पुढचे वळण कसे येणार आहे याचा अंदाज धड येत नव्हता. त्यात माझी बॅग स्कूटरवर दोन पायांच्या मध्ये ठेवलेली. ती पडेल की काय याचीही भीती वाटत होती. कधी एकदा हा घाट संपतोय आणि मी हॉस्टेलवर पोहोचतोय असं झालं होतं. नशिबाने थोड्या वेळात तो घाट संपला. अजूनही रस्ता सरळ नव्हताच. पण किमान तीव्र वळणे आणि उतार तरी संपले होते. हुश करून पुढे जाऊ लागलो. पुढून एक गाडी जात होती. तिच्याच मागे-मागे जात राहिलो. सगळा परिसर  निर्मनुष्य होता. वस्तीची कुठलीच चिन्हं  दिसत नव्हती. अशा परिसरात हॉस्टेल बांधले असेल? आपण बरोबर जातो आहोत ना? फोनची बॅटरी संपली तर काय करायचे? असे हजारो प्रश्न मनात पिंगा घालत होते. 

पाईन वृक्षांच्या रानात शिरलेला रस्ता 

थोड्या वेळात आजूबाजूला काही घरं दिसू लागली. तसं सामसूमच होतं सगळं पण आजूबाजूला वस्ती आहे हे बघून जरा हायसं वाटलं. तेवढ्यात हॉस्टेलच्या नावाची पाटी दिसली. मुख्य रस्त्यावरून डावीकडे एक अरुंद वाट डोंगरावर चढत होती. मी स्कूटर आत दामटली. हा रस्ता कच्चा होता. नुसते दगड-धोंडे पसरवून ठेवले होते आणि त्यावर बारीक खडी टाकली होती. आपल्याकडे खड्डे बुजवण्याच्या नावाखाली करतात तसला जुगाड इथेही केलेला दिसत होता. त्यातून वाट काढत मी चढावावर गाडी रेटत होतो. आणि नेमकं एका वळणावर स्कूटरचं पुढचं चाक दोन दगडांच्या मध्ये अडकलं! कितीही जोर लावला तरी बाहेर निघेना! शेवटी उतरून गाडी नुसती बाहेर ओढायचा प्रयत्न करू लागलो. पण तेही जमेना. आधीच दिवसभराच्या दगदगीने दमलो होतो. आणि आता हॉस्टेल ढेंगभर अंतरावर असताना ही स्कूटर अशी अडकलेली. काय करावं काही सुचत नव्हतं. तेवढ्यात समोरून एक बाईक येताना दिसली. मला बघून बाईकवाला थांबला. मला मदतीची गरज आहे त्याच्या लक्षात आलं असावं. त्याने थांबून विचारपूस केली. इथे एक तरुण बर्‍यापैकी इंग्रजीत बोलतोय हे बघून मला हायसं वाटलं. मग आम्ही दोघांनी मिळून स्कूटरचं अडकलेलं चाक बाहेर काढलं. मी तर घामाघूम झालो होतो. आता पुढचं एवढसं अंतरही मी चालवू शकेन असं वाटत नव्हतं. मी त्याला  मला हॉस्टेल पर्यन्त सोडायची विनंती केली. मग मी मागे बसलो आणि त्याने त्या भयानक रस्त्यावरून मोठ्या शिताफीने मार्ग काढत मला हॉस्टेलवर आणून सोडलं. त्याचे किती आभार मानू किती नाही असं झालं होतं. तो तरुण माझ्या हॉस्टेलच्या समोरच असलेल्या एका होमस्टेचा मालक होता. उद्या सकाळी कॉफीला होमस्टे वर नक्की ये असं आग्रहाचं निमंत्रण देऊन तो निघून गेला.  

हिरव्या रंगाची काही परिसीमाच नाही!

एकदाचं मी हॉस्टेलवर चेक इन केलं. इथे भाडं कमी असल्याने मी हॉस्टेल असलं तरी स्वतंत्र खोली बूक केली होती. सगळा परिसर अतिशय रम्य होता. मी खोलीत शिरलो, आंघोळ केली आणि बेडवर आडवा झालो. कसला adventurous दिवस होता याची उजळणी करता करता डोळा कधी लागला ते कळलंच नाही.  

क्रमशः

Leave a Reply