शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत कायम एक प्रश्न असायचा – मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे, भौगोलिक कारणे द्या. तेव्हा नुसती घोकलेली ती भौगोलिक कारणे आज प्रत्यक्षात अनुभवास येत होती. पश्चिम आशियाच्या शुष्क वाळवंटी प्रदेशात, जॉर्डन
आणि इस्रायल यांच्या सीमारेषेवर मृत समुद्र स्थित आहे. या समुद्राला मिळणारा गोड्या पाण्याचा एकमेव मोठा स्रोत म्हणजे जॉर्डन नदी. त्याशिवाय आसपासचे अनेक लहान-मोठे झरे या समुद्रात मिसळतात. मात्र मुळातच पर्जन्यमान कमी असल्याने त्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा नगण्य असतो. जवळपास वर्षभर असणारे उष्ण हवामान व सूर्याची प्रखर किरणे यांमुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त. या सर्व कारणांमुळे मृत समुद्राची क्षारता सुमारे ३५% आहे. हे प्रमाण सरासरी समुद्रक्षारतेच्या ९ पट आहे! इतक्या
प्रचंड क्षारतेमुळे या समुद्रात कोणतेच जीव जगू शकत नाहीत. म्हणूनच यास मृत समुद्र असे म्हणतात.