Beach trail of Karnataka: Kumta to Gokarna – Part 4 – Pristine beaches of Gokarna | कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग ४ – गोकर्णचे नयनरम्य किनारे

लाटांच्या जोरदार आवाजाने जाग आली. तसा तो आवाज रात्रभर चालूच होता. पण पहाटे कदाचित भरती आली असावी. तशी उठायची घाई नव्हती. कालच्या पायपिटीने पाय ठणकत होते. अजून थोडा वेळ झोपावं वाटत होतं. पण एकदा लख्ख सूर्यप्रकाश बघितला की परत झोप येत नाही. मग एकदाचा उठलो. काही जण उठून सूर्योदय बघायला गेले होते ते परत येत होते. काहीशा ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय काही पाहता आला नव्हता. ते नुसतेच पहाटेच्या मंद प्रकाशात फोटोग्राफी करून परत फिरले होते. तेवढ्यात नाश्ता आला. सगळ्यांचं खाऊन होतंय तोवर नऊ वाजले. मग आवरून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. 
तीव्र उताराची वाट
आजची वाट कालच्यापेक्षा कमी अंतराची होती. पण चढ-उतार जास्त होते. वेलेकन बीचला समांतर वाटेने आम्ही गोकर्णच्या दिशेने चालू लागलो. काल सूर्यास्ताच्या वेळी सूर्य ज्या टेकडीने झाकला होता ती आता समोर उभी ठाकली होती. आतापर्यंतच्या टेकड्यांच्या तुलनेत ही टेकडी बरीच उंच होती. वाटेने गच्च झाडी होती. त्यामुळे वातावरणात दमट उष्मा जाणवत होता. समुद्रावरचा वारा दूर कुठेतरी अडकून पडला होता. कपाळावर जमा होणारे घामाचे थेंब पुसत आम्ही वर चढत होतो. अर्ध्या तासातच माथ्यावर पोहोचलो. अगदी सह्याद्रीतल्या ट्रेकसारखं वाटत होतं. आजूबाजूला झाडी होती आणि समुद्राचा कुठे काही पत्ताच नव्हता! थोडा वेळ पुढे गेल्यावर काहीशी मोकळी जागा दिसली. तिथं पोहोचलो आणि दूरवर अडकून पडलेला वारा भपकन अंगावर आला. आधीच घामाने वैतागलेला जीव त्या वाऱ्याने जरा शांत झाला. खरी मजा तर पुढे होती. अजून काही अंतर गेलो आणि समोर हजर होता पॅरेडाईझ बीच! तसा बीचला काही आकार-उकार नव्हता. एका बाजूने काही खडक उगीच लोकलच्या दारात लोंबकळणाऱ्या टवाळ पोरांसारखे समुद्रात झुकले होते. अविरत आदळणाऱ्या लाटांची त्यांना नशा चढली असावी. खडकांच्या पलीकडे थोडीफार वाळू दिसत होती. हा गोकर्ण मधला एक अत्यंत रमणीय किनारा. शहरापासून तसा लांब असल्याने इथे फार लोक येत नाहीत. त्यामुळे तशी शांतता असते. शिवाय खडकांचे विलोभनीय भूदृष्य! म्हणूनच पॅरेडाईझ बीच म्हणत असावेत कदाचित. अतिशय तीव्र उताराची वाट उतरत आम्ही बीचवर पोहोचलो. त्या ओबडधोबड खडकांवर जरा वेळ विसावलो. बीचवर काही तुरळक पर्यटक होते. आम्हा ट्रेकर्सकडे विस्मित नजरेने बघत होते. हे कोण लोक, हे असे टेकडीवरून कसे काय इथे आले, आणि भर उन्हाचं बीचवर बियर पीत लोळायचं सोडून हे ट्रेकिंग कसले करतायत, असेच काहीसे प्रश्न त्यांच्या मनात येत असावेत. आम्ही उगीच त्यांना टाटा करून पुढे निघलो. 
 
स्मॉल हेल बीच
आणखी एक खडकाळ टप्पा पार केला आणि पोहोचलो स्मॉल हेल बीचवर. हा बीच म्हणजे नावालाच बीच होता. खडकाळ टेकडीच्या मध्यात एका खोबणीत लहानसा वाळूचा किनारा तयार झाला होता, एवढाच काय तो बीच! आजूबाजूला शिंपल्यांचा सडा पडला होता. समुद्राचा आवाज घुमल्यासारखा वाटत होता. इथे एका कोपऱ्यात काही विदेशी नागरिक एक तंबू उभारून राहिले होते. कॅम्पिंगची जागा असावी ती अशी. तिथून आम्ही पुढच्या खडकाळ टेकडीवर चढलो. हा म्हणजे एक नुसता उंचवटा होता. मात्र तिथले दृश्य अफाट होते. तीनही बाजूंनी समुद्राच्या लाटा आजूबाजूला आदळत होत्या. भन्नाट वारा सुटला होता. टेकडीवरची लहान-मोठी झाडं-झुडूपं वाऱ्याच्या तालावर नाचत होती. दुपारचं टळटळीत ऊन त्या वाऱ्याने निष्प्रभ करून टाकलं होतं. तिथल्या खडकावर उभं राहून एक मोठ्ठी आरोळी मारावी असं वाटत होतं. जणू त्या जागेतच काहीशी नशा होती. एवढ्यात एक समुद्रगरुडाची जोडी समोरून विहरताना दिसली. त्या वाऱ्यावर त्यांनी आपले विशाल पंख मोठ्या ऐटीत पसरले होते. कुठल्या हालचालीची आवश्यकताच नव्हती मुळी. गरम हवेच्या झोतावर स्वतःला मोठ्या आत्मविश्वासात झोकून देत ती जोडी जणू हा समुद्राचा भाग आपलीच जहागिरी आहे अशा आविर्भावात वावरत होती. थोडा वेळ घिरट्या मारून ते पक्षी एका माडाच्या शेंड्यावर विसावले. समुद्र्गरुड एकदा जोडीदार मिळाला की त्याच्याचसोबत आयुष्यभर राहतात. त्यांचे घरटेही एकाच ठिकाणी असते वर्षानुवर्षे. एक क्षण हेवा वाटला त्या पक्ष्यांचा. अशा स्वर्गीय किनाऱ्यावर घरकुल होते त्यांचे. अवघा रत्नाकर म्हणजे त्यांचे अंगण. आणि उंच उडायला फार कष्ट करायचीही गरज नाही. वारा असतोच मदतीला. जन्म-मृत्यूचे चक्र खरेच अस्तित्वात असेल तर एखाद्या जन्मी समुद्रगरुड व्हायला नक्कीच आवडेल. असो. 
ती खडकाळ टेकडी उतरून आम्ही पोहोचलो हाफ मून बीचवर. हाही एक लहानसा अंतर्वक्र किनारा होता. मात्र दोन बाजूंनी लहानशा टेकड्या समुद्रात घुसल्या होत्या. त्यामुळे तिथले भूदृष्य अगदी थायलंड किंवा हवाईसारखे वाटत होते. किनाऱ्याला लागून माडांची दाट झाडी होती. त्यात लहान-मोठ्या बीच हट्स दिसत होत्या. गोकर्णच्या पर्यटकप्रिय भागात आल्याची ती खूण होती. दुपारची वेळ असल्याने गर्दी तशी तुरळकच होती. आम्ही एका हटमध्ये थांबलो. उन्हात चालून घशाला कोरड पडली होती. मग शीतपेयांच्या बाटल्या रिचवल्या. थोड्या विश्रांतीनंतर पुढे निघालो. आजच्या दिवसाचा अर्धा प्रवास संपला होता. मात्र अजून गोकर्णमधले दोन मुख्य किनारे बघायचे बाकी होते. शिवाय संध्याकाळी वेळेत स्टेशनवरही पोहोचायचे होते. आम्ही पावलांचा वेग वाढवला.                                       

Leave a Reply