Beautiful Bali – Part 3 – The picturesque sunset of Uluwatu | नयनरम्य बाली – भाग ३ – उलूवातूचा रम्य सूर्यास्त

गरुडा-विष्णु-कांचना पार्कमधून बाहेर पडलो आणि उलूवातूच्या दिशेने निघालो. आता चांगलीच भूक लागली होती. रस्त्यात बरीच उपहारगृहे दिसत होती. पण मनासारखे काही दिसत नव्हते. तेवढ्यात पाटी दिसली सुलूबान बीच अशी. मस्तपैकी बीचवर बसून जेवण करू असं म्हणून मी बीचकडे वळलो. हा बीच म्हणजे क्लिफ बीच होता. म्हणजे थेट समुद्रात उतरणारा डोंगरकडा आणि त्याखाली थोडीफार पुळण. खाली उतरायला पायर्‍या बांधलेल्या होत्या. पायर्‍यांच्या बाजूने कड्याला बिलगूनच असंख्य उपहारगृहे होती. दिसणारे दृश्य जितके सुंदर तितक्या पदार्थांच्या किमती जास्त असे गणित होते. इथल्या लाटा सर्फिंगसाठी अनुकूल होत्या. त्यामुळे सर्फिंगचे सामान विकणारी आणि सर्फिंग शिकवणारी बरीच दुकाने होती. आधी बीच बघून येऊ असे म्हणून मी पायर्‍या उतरू लागलो. वाट जरा निसरडीच होती. जसजसे खाली उतरू  लागलो तसा लाटांचा जोरदार आवाज येऊ लागला. दोन कड्यांचा मध्ये एक घळई निर्माण झाली होती. काहीसे गूढ वाटत होते. आजूबाजूला एक-दोन गुहा देखील होत्या. पुळण अगदीच अरुंद होती. लाटा वेगाने आदळत होत्या. किनारा बहुतांश खडकाळच होता. बसायला अशी जागा नव्हतीच. मग मी सरळ वर आलो आणि एका उपहारगृहात शिरलो. फ्राइड राईस मागवला आणि समोरचे दृश्य बघत बघत खाऊ लागलो. इंडोनेशिया मध्ये शाकाहारी जेवण मिळणे फार अवघड नाही. इथल्या जेवणात मोठ्या प्रमाणात भाज्या, भाताचे विविध प्रकार, नारळाचे दूध, वगैरे पदार्थ असतात. इंडोनेशियन जेवणाबद्दल पुढे सविस्तर लिहिनेच. जेवण आटोपून मी उलूवातूच्या प्रसिद्ध मंदिराकडे निघालो.

सुलूबानचा क्लिफ बीच
बीचकडे जाणाऱ्या पायऱ्या

एव्हाना चार वाजत आले होते. उन्हं कलू लागली होती. सूर्यास्ताच्या आधी मंदिर व्यवस्थित पाहता यावे म्हणून मी स्कूटरचा वेग वाढवला. तेवढ्यात मंदिराची पाटी दिसलीच. पार्किंगची जागा गाड्यांनी भरून गेली होती. एकंदरीत आत जत्रा असणार याचा अंदाज आला होता. मंदिराबाहेर भाड्याने मिळणारे सारोंग नेसून मी आत शिरलो. प्रत्यक्ष मंदिरात जाता येत नव्हतेच. पर्यटक मंदिराचे पावित्र्य नष्ट करतील म्हणून बाली मधल्या बर्‍याच मोठ्या मंदिरांत पर्यटकांना प्रवेश निषिद्ध आहे. बाली मधली मंदिरे म्हणजे एक मोकळे प्रांगण आणि त्यात उतरत्या छपरांचे मनोरे अशी रचना असते. तशीच इथेही होती. बाहेरून प्रांगणाच्या भिंतीवरचे कोरीवकाम आणि मनोर्‍यांची सुंदर रचना पाहता येत होती. पण उलूवातूचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिर नव्हतेच मुळी. ते होते त्या जागेचे सौंदर्य आणि तिथून दिसणारा सूर्यास्त. मंदिराच्या मागेच डोंगरकडा थेट समुद्रात कोसळत होता. जवळपास चार-पाचशे फूट असेल त्या डोंगरकडयाची उंची. खाली अथांग समुद्राच्या लाटा बेभान आदळत होत्या. मस्त वारा सुटला होता. आकाश सोनेरी-गुलाबी झाले होते. बालीच्या बेटाचा हा दक्षिणेतर भाग. हा तोच हिन्दी महासागर जो कधीतरी लहानपणी कन्याकुमारीला पाहिलेला. एखाद्या बालसवंगड्याची बर्‍याच वर्षांनी भेट व्हावी आणि ओळख पटल्यावर त्याच्याशी गळाभेट व्हावी तसं वाटत होतं. मंदिराच्या पाठीमागचा  हा भाग गर्दीने खच्चून भरला होता. अर्धे तर भारतीयच दिसत होते. लाल टोप्या घातलेली मराठी मंडळीही दिसत होती. पलीकडच्या मोकळ्या भागात तिथे रोज सादर होणार्‍या रामायणावर आधारित शोची तयारी चालू होती. त्याची तिकिटे काढलेल्या लोकांनी आधीच तिकडे तोबा गर्दी केली होती. एवढ्या गर्दीने त्या सुंदर जागेचा पार विचका करून टाकला होता. मला तर तिथून निघून जावं असं वाटू लागलं होतं. तेवढ्यात लक्ष गेलं मागच्या बाजूने डोंगरकड्यालगत बांधलेल्या पायवाटेकडे. तिथे जरा कमी गर्दी दिसत होती.

उलूवातूचे मंदिर
गर्दी कमी असलेली जागा आणि तिथले रम्य दृश्य
उलूवातूचा डोंगरकडा आणि त्याच्या अंगाने जाणारी पायवाट

मी सरळ त्या पायवाटेवरून चालू लागलो. थोड्या अंतरावरच एक बसायची जागा होती. इथून सूर्य अगदी समोर दिसत होता. लांबवर उलुवातूचे डोंगरकड्याच्या टोकावर असलेले मंदिर दिसत होते. गर्दी त्यामानाने कमी होती. मी तिथेच बसकण मारली आणि फोटो काढू लागलो. कलत्या सूर्याच्या प्रकाशात तो डोंगरकडा, खालचा समुद्र, फेसाळत्या लाटा, आणि लांबवरचे मंदिर, सारेच विलक्षण दिसत होते. सूर्यबिंब आता लाल-केशरी झाले होते. पाहता पाहता क्षितिजावरच्या धुरकट हवेने त्या केशरी गोळ्याला कवेत घेतले आणि अक्षरशः क्षणार्धात सगळा खेळ संपला! समुद्रात बुडणार्‍या सूर्याला बघायला आलेल्या सगळ्याच पर्यटकांचा हिरमोड झाला होता. निसर्गाच्या खेळापुढे आम्हा पर्यटकांच्या इच्छेची काय तमा? नाही म्हणायला थोडाफार केशरी प्रकाश उरला होता. थोडे अजून फोटो काढून मी तिथून निघालो. पायवाटेवर माकडांनी उच्छाद मांडला होता. कोणाचे खाऊचे पुडे, कोणाचे चष्मे, कोणाच्या बाटल्या, माकडं बिनधास्त ओढून घेऊन जात होती. आणि गोर्‍या पर्यटकांना त्याचे अगदी कौतुक! त्या सगळ्या कोलाहलातून वाट काढत आणि माकडांपासून सुरक्षित अंतर ठेवून मी पार्किंगच्या जागेकडे पोहोचलो. अंधार भराभर पडत होता. मी स्कूटर चालू केली आणि परतीचा रस्ता धरला.

सनसेट पॉइंट
म्हणता म्हणता नाहीसा झालेला सूर्य

क्रमशः

Leave a Reply