ईशान्य भारत. भारताच्या नकाशात फुलपाखराच्या पंखासारखा दिसणारा हा प्रदेश मला लहानपणापासूनच खुणावत आला होता. इथली घनदाट अरण्यं, धुक्याने वेढलेले डोंगर, प्रचंड नद्या, उंच धबधबे, हिरवागार निसर्ग आणि उत्तरेला उभ्या असलेल्या हिमशिखरांच्या कथा अनेकदा वाचनातून भेटल्या होत्या. टीव्हीवरील माहितीपट, युट्यूबवरील ट्रॅव्हल व्लॉग्स आणि अलीकडच्या काळात इंस्टाग्रामवरील रील्समधून हा प्रदेश वारंवार समोर येत राहिला. पण प्रत्यक्ष तिथे जाण्याची संधी मात्र काही मिळत नव्हती.

आतापर्यंत भारतातील अनेक भाग भटकून झाले होते. दक्षिण भारत, पश्चिम भारत, उत्तर भारत, वायव्य भारत, सगळीकडे भरपूर फिरणं झालं होतं. गेली काही वर्ष हिमाचल प्रदेशात वास्तव्य असल्यामुळे पश्चिम हिमालयही जवळून अनुभवला होता. पण हिमालयाचं पूर्वेकडचं रूप नेमकं कसं असेल याविषयी मनात कायमच एक वेगळी उत्सुकता दाटून राहिली होती. ईशान्य भारतात कधी जाणार याचीच वाट पाहत होतो. २०२५ साल सुरू झालं आणि एखादी चांगली ट्रिप करायची चर्चा मनात सुरू झाली. ऑक्टोबर महिना जवळ येत होता. यावेळी तरी ईशान्य भारताला जायचंच, असं ठरवलं. एका संध्याकाळी सहज इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना तवांग, गुवाहाटी आणि काझीरंगा कव्हर करणारी एक बाईक ट्रिप नजरेस पडली. एक बराच स्थिरावलेला ट्रॅव्हल ग्रुप ही ट्रिप आयोजित करत होता. तारखा जुळत होत्या, प्लॅन जुळत होता आणि मनही तयार होतं. म्हटलं, बस, आता जायचंच!
दोन-तीन मित्रांना विचारलं आणि आश्चर्य म्हणजे बंगलोरमध्ये असलेला माझा मित्र सुशीलही लगेच तयार झाला. अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र कुठेतरी बाईकवरून फिरायला मिळणार होतं. त्यात ऑक्टोबर महिना म्हणजे भटकंतीसाठी अगदी परफेक्ट वेळ. नुकताच संपलेला मॉन्सून, हिरवाईने नटलेले डोंगर, स्वच्छ निळं आकाश आणि अजून फारशी सुरू न झालेली थंडी. दिवाळीनंतरचा आठवडा असल्यामुळे गर्दीही तुलनेने कमी असणार होती. रस्ते पूर्ण खुले, हवेत गारवा आणि सभोवताली ताजातवाना निसर्ग. ट्रिपसाठी याहून चांगला सीझन असूच शकत नव्हता. मग एकदाची ट्रीप बुक केली आणि निघायच्या दिवसाची वाट बघत बसलो.
ट्रिपची सुरुवात गुवाहाटीहून होणार होती. मुंबई ते गुवाहाटी हा साधारण अडीच-तीन तासांचा विमानप्रवास. ट्रिप दुपारनंतर सुरू होणार असल्यामुळे सकाळचं विमान घेणं शक्य होतं. पण अर्धवट झोपेत थेट ट्रिप सुरू करण्यापेक्षा एक दिवस आधीच पोहोचलेलं बरं असं म्हणून मी एक दिवस आधीची फ्लाईट बुक केली. मात्र त्या दिवशी फ्लाईटने चांगलाच संयमाचा अंत पाहिला. सततच्या डिले नंतर शेवटी रात्री साडेबारा-एकच्या सुमारास गुवाहाटीत उतरलो. सुदैवाने हॉटेल विमानतळाजवळच बुक केलं होतं. टॅक्सी करून हॉटेलवर पोहोचलो. सुशील दुपारच्या फ्लाईटने आधीच पोहोचला होता. चेक-इन केलं आणि पुढच्या प्रवासाच्या उत्साहातच कधी झोप लागली ते कळलंच नाही.
दुसऱ्या दिवशी आम्ही जरा निवांतच उठलो. ब्रेकफास्ट आटोपला. हॉटेल शहरापासून लांब आणि विमानतळाजवळ असल्याने आसपास बघण्यासारखे काही नव्हते. आम्ही आरामात गप्पा मारत बसलो होतो. म्हणता म्हणता अकरा वाजले आणि ट्रीपच्या गाईड चा फोन आला. साडेबारापर्यन्त त्यांची बस विमानतळावरून निघणार होती. मग सामानाची व्यवस्थित आवराआवर करायला लागलो. बाईक जॅकेट बाहेर काढलं, हेल्मेट तयार ठेवलं, रायडिंग शूज घातले. एक छोटी बॅकपॅक तयार केली. त्यात पाणी, थोडंफार खाणं, कॅप, सनग्लासेस आणि बाकी काही जरूरीच्या गोष्टी ठेवल्या. मोठी बॅग मात्र सपोर्ट व्हेईकलमध्ये जाणार होती. अशा बाइकिंग ट्रिप्स साधारण खूप व्यवस्थित आयोजित केलेल्या असतात. तुम्हाला फक्त बाईक चालवण्यावर लक्ष द्यायचं असतं. बाकी मोठं सामान सपोर्ट व्हेईकलमध्ये जातं. त्या गाडीत मेकॅनिक आणि गाईड असतो. संपूर्ण ग्रुपसोबत दोन कॅप्टन असतात. एक पुढून मार्गदर्शन करत असतो आणि दुसरा सगळ्यांच्या मागे राहून कुणी मागे पडत नाही ना हे बघत असतो. सर्वात शेवटी सपोर्ट व्हेईकल असतंच.
ठरल्याप्रमाणे साडेबाराच्या सुमारास पिकअप गाडी आली आणि आम्ही गुवाहाटी शहरात पोहोचलो. तिथे सगळ्या ग्रुपची ओळख झाली. आमचा कॅप्टन आशिष एकदम बोलका आणि उत्साही होता. सगळ्यांशी लगेच त्याचं छान जमून गेलं होतं. थोड्याच वेळात सगळ्यांना बाईक्स अलॉट झाल्या. मला आणि सुशीलला रॉयल एनफील्डची मिटीऑर मिळाली. ती पाहून मी अक्षरशः खुश झालो. कारण मनात आधीपासून कुणकुण होती की कदाचित क्लासिक बुलेट मिळेल. बुलेट चालवण्याचा माझा अनुभव फारसा सुखद नव्हता. हिमालयन गाडीही उंच असल्यामुळे मला ती कधी फार कम्फर्टेबल वाटली नव्हती. त्यामुळे मिटीऑर मिळणं म्हणजे माझ्यासाठी अगदी परफेक्ट गोष्ट होती.

सुशील मागे बसणार होता आणि पुढचा बराचसा प्रवास तुलनेने सोपा असणार होता. हा काही लडाख किंवा स्पितीसारखा खडतर ऑफरोड टेरेन नव्हता. ईशान्य भारतात बऱ्याच ठिकाणी रस्ते चांगले आहेत. त्यामुळे फारशी काळजी नव्हती. शेवटी आम्ही बाईक जॅकेट चढवलं, हेल्मेट घातलं, “हर हर महादेव” म्हणालो आणि प्रवासाला सुरुवात केली.
क्रमशः