चालुक्यनगरी बदामी – भाग ३ – पट्टदकल

आजचा दिवस पट्टदकल आणि ऐहोळे या दोन जागा आणि तिथल्या मंदिरांसाठी ठरवला होता. बदामीपासून पट्टदकल २२ किमी तर ऐहोळे त्यापुढे १४ किमी वर आहे. ही दोन्ही ठिकाणे चालुक्यकालीन मंदिरांसाठी सुप्रसिद्ध आहेत. बदामीवरून एक रिक्षा ठरवून ही दोन्ही ठिकाणे बघता येतात. मी आदल्या दिवशीच मुख्य बस स्थानकावर जाऊन एक रिक्षा ठरवली होती. ठरल्याप्रमाणे रिक्षावाला ९ वाजता हॉटेलवर हजर झाला. मी कॅमेरा वगैरे घेऊन बाहेर आलो आणि पाहतो तर काय, रिक्षावाला पल्सर बाईक घेऊन उभा! त्याच्या रिक्षात आयत्या वेळी काहीतरी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. तसाही मी एकटाच जाणार होतो. त्यामुळे धंदा बुडू नये म्हणून हा पठ्ठ्या चक्क बाईक घेऊन आला होता. त्याच्या हुशारीचं मला कौतुक वाटलं. बाईकवरून भटकायला मिळणार म्हणून मीही मनातल्या मनात खुश झालो. बदामीतल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून आम्ही पट्टदकलच्या दिशेने निघालो.     


बदामी शहरातून बाहेर पडलो आणि बाईकने वेग घेतला. स्वच्छ उन पडलं होतं. सकाळची वेळ असल्याने उन्हाचा चटका फारसा जाणवत नव्हता. दक्षिण-मध्य भारतातला हा भाग म्हणजे तसा दुष्काळीच. अलमट्टी धरणामुळे इथे वर्षभर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाण्याचे तसे दुर्भिक्ष नाही. मात्र अत्यल्प पर्जन्यमान असल्याने मोठे वृक्ष फार कमी दिसतात. सारा भूप्रदेश रेताड आणि खडकाळ दिसत होता. थोडीफार खुरटी झुडुपे दिसत होती. शेतांमधली कापणी नुकतीच झालेली असावी. त्यामुळे शेतेही उजाड दिसत होती. विजेच्या तारांवर वेड्या राघूंची (Green Bee Eater) लगबग सुरु होती. मध्येच एखादा नीलकंठ (Indian Roller) पंख पसरून मनोहारी निळाईचे दर्शन घडवत होता. दूरवरून ऐकू येणारा खंड्याचा कलकलाट इथे मी सुद्धा आहे असे ठासून सांगत होता. 

पट्टदकल मधील मंदिर समूह 

अर्ध्या-पाऊण तासांत आम्ही पट्टदकलला पोहोचलो. पट्टदकल हे बदामीसारखेच एक प्राचीन शहर. ग्रीक तत्त्ववेत्ता टॉलेमी याच्या Geography या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहलेल्या पुस्तकात या शहराचा उल्लेख सापडतो. पट्टदकल या नावाचा शब्दशः अर्थ होतो राज्याभिषेकाचा दगड. चालुक्य राजांनी सातव्या ते आठव्या शतकांच्या दरम्यान मलप्रभा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर राज्याभिषेकादि शाही समारंभांसाठी हा मंदिरसमूह बांधला. उत्तरोत्तर विकसित होत गेलेल्या चालुक्य स्थापत्यशैलीचे अत्युच्च स्वरूप या मंदिरांत बघायला मिळते. या समूहात एकूण ९ मंदिरे आहेत. सारी मंदिरे पूर्वाभिमुख असून शिवाला समर्पित आहेत. दक्षिण भारतीय ‘द्राविड’ शैली आणि उत्तर भारतीय ‘नागर’ शैली यांचे सुरेख मिश्रण या मंदिरांत दिसून येते. हा समूह युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेला आहे. प्रथमदर्शनी तरी पट्टदकल एक टिपिकल भारतीय खेडेगाव वाटत होते. आपण बरोबर जागी आलोय की नाही असा प्रश्न पडावा इतके  ते गाव लहान आणि अविकसित वाटत  होते. मात्र मंदिरांचा परिसर नजरेस पडला आणि इथे काहीतरी वेगळीच दुनिया वसली आहे की काय असा आभास झाला. अपेक्षेनुसार इथेही भारतीय पुरातत्व विभागाने मंदिरांचा परिसर कुंपणाने संरक्षित केला होता. मंदिरांच्या आजूबाजूला सुंदर बागही फुलवली होती. मी तिकीट काढून आत शिरलो. 

काडसिद्धेश्वर मंदिर आणि त्याच्या अग्रभागी असलेली नृत्यामग्न शिवाची मूर्ती   

आत शिरल्याबरोबर उजव्या हाताला काडसिद्धेश्वर आणि जंबुलिंगेश्वर अशी दोन लहान मंदिरे होती. मंदिरांची शिखरे ढासळलेली असली तरी बाकीची रचना तशी मजबूत होती. दोन्ही मंदिरांचा मूळ आकार चौरसाकृती होता. सातव्या शतकाच्या सुरुवातीला बांधली गेलेली ही मंदिरे नागर शैलीत बांधलेली होती. काडसिद्धेश्वर मंदिराच्या शिखरावर अग्रभागी नृत्यमग्न शिवाची विलक्षण मूर्ती लक्ष वेधून घेत होती. या मंदिराच्या इतर बाजूंना काही इतर मूर्ती कोरल्या होत्या. गर्भगृहात फारशी प्रकाशयोजना नव्हती. कदाचित देवासोबत होणाऱ्या संवादात प्रकाशाचा व्यत्यय नको असावा. जंबुलिंगेश्वर मंदिराच्या बाहेर अर्धभग्न अवस्थेतला नंदी दिसत होता. तिथून थोडं पुढे जाताच दिसले संगमेश्वर मंदिर. हे पट्टदकलमधील सर्वात जुने मंदिर आहे. चालुक्य राजा विजयादित्य याने आठव्या शतकात हे मंदिर बांधले. हे तुलनेने मोठे होते. याची रचना द्राविड शैलीतली होती. मंडप आणि प्रदक्षिणा मार्ग अजूनही सुस्थितीत होते. मंडपातील खांबांवरचे कोरीवकाम लक्ष वेधून घेत होते. इतक्या बारीक तपशीलांसह एक खांब पूर्ण करायला किती वेळ लागला असेल त्या काळी? किती मोबदला मिळत असेल त्या कारागिरांना? आणि हे कौशल्य कधी आणि कसे अस्तंगत झाले? अशा असंख्य प्रश्नांनी मनात गर्दी केली होती. मंदिराचे अंतरंग अनुभवायला म्हणून आत शिरलो. गर्भगृहाच्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग खुणावत होता. त्या अंधाऱ्या मार्गावर वरच्या झरोक्यातून झिरपणारा सूर्यप्रकाश एक विलक्षण वातावरण निर्मिती करत होता. एक प्रदक्षिणा पूर्ण करून मी मंडपात आलो. एका कोपऱ्यात बसून बदामी मध्ये विकत घेतलेले पुस्तक चाळू लागलो. थोडावेळ तिथे विश्रांती-वाचन करून मी पुढची मंदिरे बघायला निघालो. 

संगमेश्वर मंदिर 

गलगनाथ मंदिर 

समोरच होते गलगनाथ मंदिर. हेही उत्तर भारतीय नागर शैलीत बांधलेले होते. त्याच्या माथ्यावरचा कलश फारच विलोभनीय होता. पुढच्या ढासळलेल्या भागाच्या तुलनेत आमलक आणि कलश उत्तम स्थितीत होते. मंदिराच्या समोरचा प्रशस्त चौथरा त्याच्या जमीनदोस्त झालेल्या मंडपाच्या खुणा दर्शवत होता. उरल्यासुरल्या भागावरच्या देव-देवतांच्या मूर्ती तरीही प्रसन्न चेहऱ्याने येणाऱ्या भक्ताचे स्वागत करत होत्या. गलगनाथ मंदिराच्या पुढे होते काशीविश्वेवर मंदिर. हे या समूहातले सगळ्यात शेवटी बांधले गेलेले मंदिर. चालुक्य राजवटीत विकसित झालेल्या रेखा नागर शैलीचे हे उत्तम उदाहरण. पाच स्तरांनी बनलेल्या या मंदिराच्या शिखरावरचे आमलक आणि कलश आता ढासळले असले तरी शूकनास आणि शिखर मात्र उत्तम स्थितीत होते. शूकनासावरची उमा-महेशाची मूर्ती फारच सुरेख दिसत होती. शिखराच्या बाह्यभागावरचे जाळीदार नक्षीकाम मंदिराचे सौंदर्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते. त्या लहानमोठ्या चौकोनांत छाया-प्रकाशाचा अद्भुत खेळ मोठ्या रंगात आला होता. सूर्यास्ताच्या वेळी हा खेळ अजून किती सुंदर दिसत असेल याची कल्पना करत मी पुढच्या मंदिराकडे वळलो.

काशी विश्वेवर मंदिर आणि त्यावरचे जाळीदार नक्षीकाम 

आता मी पोहोचलो होतो पट्टदकलमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन मंदिरांजवळ – मल्लिकार्जुन मंदिर आणि विरुपाक्ष मंदिर. यांपैकी विरुपाक्ष मंदिर हे आजही वापरात असलेले देवस्थान आहे. हे मंदिर राणी लोका महादेवी हिने राजा विक्रमादित्य दुसरा याच्या पल्लवांवरील विजयाप्रीत्यर्थ बांधले. यां मंदिराचा मूळ आराखडा कांचीपुरम येथील कैलाशनाथ मंदिरावर बेतलेला आहे. मात्र स्थापत्यशैली खास चालुक्य वळणाची आहे. द्राविड शैलीत बांधलेल्या या मंदिराच्या समोर उंच चौथऱ्यावर नंदीमंडप आहे. चौरसाकृती गर्भगृहाच्या तीनही बाजूंनी प्रशस्त सभामंडप उभारलेला आहे. मंदिराच्या बाजूने इतर लहान-मोठी देवस्थाने बांधलेली आहेत. एकूण ३२ देवस्थानांपैकी आज ५-६ च शिल्लक आहेत. मी बूट काढून मंदिरात शिरलो. आत काही भाविकांची गर्दी होती. हे मंदिर जरी पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या भागात असले तरी इथे दर्शनासाठी यायला मागच्या बाजूने सोय होती. पहिल्यांदाच एका प्राचीन मंदिरात फुलांचा आणि उदबत्तीचा सुगंध, मंत्रोच्चार, घंटानाद असे नेहमीचे वातावरण अनुभवत होतो. गर्भगृहाबाहेरचा पुजारी लगबगीने सगळ्यांना तीर्थप्रसाद देत होता. आतापर्यंत पाहिलेल्या मंदिरात जाणवलेले गूढत्व इथे मात्र जाणवत नव्हते. काहीशा ओळखीच्या जागी आल्यासारखे वाटत होते. तिथल्या खांबांवर कोरलेल्या मूर्ती गतकाळातल्या नव्हे तर आजच्या वाटत होत्या. निव्वळ तिथे जाणाऱ्या भाविकांच्या मनातल्या भावनांनी त्या मंदिराच्या वातावरणावर अमूलाग्र परिणाम घडवला होता. आतापर्यंत केवळ स्थापत्यशैलीचे नमुने असणारे ते भग्नावशेष विरुपाक्ष मंदिरात मात्र अनादी-अनंत अशा मानवी श्रद्धेचे आणि भक्तीचे अधिष्ठान बनले होते. कुठून येत असेल ही उर्जा? काय घडत असेल माणसाच्या मेंदूत की ज्यातून भक्तीची निरंतर भावना निर्माण असेल? मनात मंथन सुरु होते आणि डोळे मंदिराच्या सभामंडपातले कोरीवकाम निरखण्यात गुंतले होते. इथल्या प्रत्येक खांबावर रामायण-महाभारत आणि पुराणातल्या कथा कोरल्या होत्या. या मंदिरातले कोरीवकाम म्हणजे इथल्या कलेचा कळसाध्यायच जणू! थोडा वेळ तिथे घालवून मी बाहेर पडलो. 

मंदिरातील अप्रतिम कोरीवकाम 

विरुपाक्ष मंदिराचे प्रवेशद्वार 

विरुपाक्ष मंदिराच्या शेजारीच होते मल्लिकार्जुन मंदिर. हे मंदिर म्हणजे विरुपाक्ष मंदिराची लहान प्रतिकृती. हे मंदिर त्याच सुमारास राणी त्रिलोक्या देवी हिने बांधले. काही सूक्ष्म स्थापत्यघटक वगळता या मंदिराची रचना विरुपाक्ष मंदिरासारखीच आहे. हे मात्र वापरात असलेले देवस्थान नाही. मंदिराभोवती एक चक्कर मारून मी विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन या मंदिरांच्या मधल्या अरुंद जागी पोहोचलो. इथे विलक्षण गारवा जाणवत होता. सकाळपासून कदाचित या जागी सूर्यप्रकाश पोहोचला नसावा. माझ्या चहूबाजूंनी पुराणातल्या देव-देवता पाषाणरुपात त्यांच्या हजारो वर्षे प्रचलित असलेल्या कथा सांगत होत्या. मधल्या एका उंचवट्यावर मी उभा राहिलो. स्मार्टफोनवर नुकतेच टाकलेले ३६० अंशात फोटो काढणारे एक अॅप मला वापरून पहायचे होते. त्यासाठी याहून उत्तम जागा कोणती? मी तिथे उभा राहून फोटो काढू लागलो. त्या जागेची सगळी अनुभूती मला त्या फोटोत बंदिस्त करायची होती. इतक्यात मागून एक सुरक्षारक्षक शिट्टी वाजवत तिथे आला. अनावधानाने मी ज्या उंच जागी उभा राहिलो होतो तो मल्लिकार्जुन मंदिराच्या भग्न भिंतीचा एक भाग होता! मी मुकाट्याने खाली उतरलो. त्या भग्न अवशेषांची मनोमन क्षमा मागितली. मागे वळलो तर समोरच होता विजयस्तंभ. हा स्तंभावरचे कन्नड भाषेतले शिलालेख अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावे मानले जातात. पल्लव राजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतिनिधित्व हा स्तंभ करतो. थोडा वेळ त्या भागात छायाचित्रण करून मी तिथून बाहेर पडलो. आता ऐहोळे मधल्या मंदिरांविषयी उत्सुकता मनात निर्माण झाली होती. 

खांबांवरील कलाकुसर 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *