अंधारबन Andharban trek

पावसाळ्याच्या दिवसांतली सह्याद्रीतली भटकंती
म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच. एरवी रुक्ष वाटणारा इथला निसर्ग पर्जन्यऋतूचे
आगमन होताच नव्या चैत्यनाने सळसळू लागतो. काळे-कभिन्न डोंगरकडे हळूच हिरवी शाल
परिधान करतात. फेसाळणारे धबधबे आणि ताम्बुसराड ओहोळ वाट मिळेल तसे धावू लागतात.
उंच डोंगरमाथे आणि कृष्णमेघ म्हणजे वर्षभराने भेटणारे बालसवंगडीच. त्यांची एकदा का
गळाभेट झाली की चार महिन्यांसाठी रमीचा डाव रंगलाच म्हणून समजा. श्रावणात पावसाचा
जोर ओसरला की घाटातली पठारे विविधरंगी रानफुलांनी बहरून जातात. गेली काही वर्षे
परदेशात वास्तव्यास असल्याने या रम्य सोहळ्यास मी मुकलो होतो. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याची
फारच आतुरतेने वाट पाहत होतो. यथावकाश पाऊस अवतरला. आसपासच्या भूदृश्यावर हिरवी
मखमल चढू लागली. पाऊस स्थिरावल्याचे पाहून मी सह्याद्रीतल्या भटकंतीचे आयोजन करू
लागलो. एव्हाना सह्याद्रीतले बरेचसे गड-किल्ले पायाखालून गेले होते. नव्या
ठिकाणांचा शोध सुरु होता. तेवढ्यात वाचनात आलं एक अपरिचित नाव – अंधारबन! फेसबुकवरील
नोंदी पाहता हे ठिकाण बरेच लोकप्रिय होत चालल्याचे जाणवत होते. जुलै महिन्यातला एक
सप्ताहांत निवडला आणि
Trek
Mates India
या
ग्रुपवर अंधारबन च्या ट्रेकची नोंदणी करून टाकली.

अंधारबन पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात येतं.
नावाप्रमाणेच हा ट्रेक घनदाट रानातून जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे
भारतातल्या अति-जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणांपैकी एक. त्यामुळे या परिसरात
घनदाट वृक्षराजी आढळते. ही सदाहरित वने त्यांतील वैविध्यपूर्ण जीवसंपदेसाठी
प्रसिद्ध आहेत. अंधारबन चे अरण्य हे त्यातलेच एक संपन्न आणि अस्पर्शित अरण्य. पुण्याहून
मुळशी जलाशयामार्गे कोकणात उतरणारा घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. याच रस्त्यावरून
ताम्हिणी गाव सोडलं की उजवीकडे थेट लोणावळ्याकडे जाणारा फाटा फुटतो. याच रस्त्यावर
लागतं पिंप्री गाव. अंधारबनचा ट्रेक याच गावापासून सुरु होतो. मुंबईहून जाताना
पाली मार्गे ताम्हिणी घाट गाठता येतो. आम्ही मुंबईहून मध्यरात्रीच्या सुमारास बसने
निघालो. मजल-दरमजल करत पहाटे साडेपाचच्या सुमारास पिंप्री गावात पोहोचलो. गावात
चहा-नाश्त्याची सोय केलेली होती. गावातलेच दोघे तरुण मार्गदर्शक म्हणून आमच्यासोबत
येणार होते. ग्रुप मधल्या लोकांची ओळख परेड झाली, महत्त्वाच्या सूचना दिल्या
गेल्या आणि आम्ही ट्रेक साठी सज्ज झालो.

अंधारबनाकडे जाणारी वाट 
गावाजवळच्या एका बंधाऱ्याजवळ ट्रेकचा आरंभ बिंदू आहे.
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता. दाट धुक्याचा एक पुंजका समोरच्या
डोंगराला वेढा देऊन बसला होता. उगवत्या सूर्याचे कोवळे किरण उगाच ढगांमधून वाट
काढायचा प्रयत्न करत होते. आसपासच्या हिरवळीला तर काही सीमाच नव्हती. गेले काही
दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बंधाऱ्यामागचे पाणी संथपणे पलीकडच्या खडकांवर उतरत
होते. वातावरणात एक विलक्षण प्रसन्नता जाणवत होती. आम्ही हर हर महादेव ची आरोळी
ठोकली आणि ट्रेकला सुरुवात केली. या ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे यात कुठेच चढाई
करावी लागत नाही. ट्रेकचा जवळपास निम्म्याहून अधिक मार्ग सपाट पठारावरून जातो. तर
उरलेला मार्ग टप्प्या-टप्प्याने थेट कोकणात उतरतो. मात्र चालायचे एकूण अंतर तब्बल १४
किमी भरते.

बंधाऱ्यावरून थोडं पुढे जाताच डाव्या हाताला खोल
दरी दिसू लागली. दरीत दूरवर एक जलाशय दिसत होता. हेच ते कुंडलिका नदीचे खोरे.
अंधारबनातल्या असंख्य ओहोळांची बनते कुंडलिका नदी. या नदीवर भिरा गावाजवळ एक
छोटेसे धरण बांधले आहे. त्याचाच जलाशय घाटमाथ्यावरून दिसत होता. डोंगरकड्यांवरून
सर्व बाजूंनी धबधबे दरीत उतरत होते. आसपासची हिरवीगार वनश्री दरीतल्या बेभान वाऱ्यावर
सळसळत होती. त्या दृश्याचा आस्वाद घेत आम्ही काही वेळ स्थिरावलो. दोन-चार फोटो
काढून होतायत तेवढ्यात धुक्याचे लोट दरीत उतरू लागले. बघता बघता सारी दरी धुक्याने
भरून गेली. दरीतला जलाशय तर दूरच राहिला, काही मीटर अंतरावरचा माणूस दिसणेही अवघड
होऊ लागले. धुकं अजून दाट झालं तर पुढची वाट सापडणं मुश्कील होईल म्हणून आम्ही चालण्याचा
वेग वाढवला. दरीच्या काठाने जाणारी वाट आता रानात शिरली. दाट झाडीतून वाट काढत
आम्ही पुढे सरकू लागलो. तेवढ्यात एक खळाळता ओढा मार्गात आला. त्याच्या वरच्या
अंगाला एक लहानसा धबधबा तयार झाला होता. गर्द हिरव्या झाडीत वाहणारा तो धबधबा पाहून
भिजण्याचा मोह कुणाला आवरेल? आपसूकच सगळ्यांची पावलं तिथे वळली. भिजण्याचा मनसोक्त
आनंद लुटून आम्ही पुढे निघालो.
कुंडलिका नदीचे खोरे आणि भिरा जलाशय 
घनदाट अरण्यातून जाणारी पायवाट 
यापुढची वाट घनदाट अरण्यातून जात होती. वाटेत
पाण्याचे लहानसहान ओहोळ आडवे येत होते. लाल मातीच्या लिबलिबीत चिखलातून पचक-पचक
आवाज करत आम्ही पुढे चाललो होतो. आधीच ढगांनी अडवलेला सूर्यप्रकाश या अरण्यातल्या
दाट पर्णसंभारापुढे हार मानून अंग चोरून बसला होता. गडद धुकं रानात ठिय्या देऊन
बसलं होतं. एकंदरीतच सारे वातावरण एखाद्या भयपटात शोभेल असे वाटत होते. या
अरण्याला अंधारबन का म्हणत असावेत याची पुरेपूर प्रचीती येथे येत होती. रानात
डासांनी उच्छाद मांडला होता. दोन क्षण जरी एका जागी उभं राहिलं तरी डासोपंतांची झुंड
अंगावर हल्ला-बोल करत होती. डासांच्या चावण्यापेक्षा त्यांची चेहऱ्याभोवतीची
गुणगुणच अधिक त्रासदायक वाटत होती. तेवढ्यात चिखलात काहीतरी वळवळताना दिसलं.
पाहिलं तर साप!
Checkered
keelback
जातीच्या
बिनविषारी सापाचा हा लहानगा
(juvenile) होता.
मराठीत त्याला दिवड म्हणतात. संपूर्ण आशिया खंडात गोड्या पाण्याच्या स्रोतांजवळ ही
सर्पजात आढळते.
त्या छोट्या दिवडीपासून योग्य अंतर ठेवून आम्ही
पुढे निघालो. जवळपास तासभर जंगल तुडवल्यानंतर आम्ही एका मोकळ्या जागेवर पोहोचलो.
तिथेच खडकावर बसकण मारली आणि जेवणाचे डबे उघडले. भूक तर लागलीच होती. जेवणानंतर
थोडा वेळ
गप्पागोष्टी आणि फोटोसेशन करण्यात घालवला आणि पुढे निघालो.

कारवीच्या कळ्या 
पुढची वाट मोकळ्या पठारावरून जात होती. आता धुकं
काहीसं निवळलं होतं. आजूबाजूला दिसणारी भाताची खाचरं एखादं गाव जवळ आल्याचे संकेत देत
होती. तासाभराच्या पायपिटीनंतर आम्ही हिरडी गावात पोहोचलो. गाव कसलं, वीसेक घरांचा
एक पाडाच होता तो. गावात फक्त म्हातारी माणसं दिसत होती. तरुण लोक आसपासच्या
मोठ्या गावांत नोकरी-धंद्याच्या निमित्ताने स्थायिक झाले होते. आडवाटेवरच्या या
एवढ्याशा पाड्यावर राहून करतील तरी काय? गावात पाचेक मिनिटं विश्रांती घेऊन आम्ही
पुढे निघालो. इथून पुढची वाट उताराची होती. मोकळ्या पठारावरून आम्ही पुन्हा एकदा
घनदाट अरण्यात दाखल झालो होतो. तसा उतार फार तीव्र नव्हता. मार्गात कारवीची जाळी
लागली. कारवी ही पश्चिम घाटात आढळणारी एक प्रदेशनिष्ठ वनस्पती. जेमतेम १०-१२ फुट उंच
आणि सरळसोट वाढणाऱ्या या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला आठ वर्षांतून एकदा
येणारा बहर. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची ही फुले एकदा फुलायला लागली की सगळी
दऱ्या-खोरे रंगलेली दिसू लागतात. यंदाच्या वर्षी (२०१६) त्यांचा बहर अपेक्षित आहे.
अंधारबनातल्या कारवीच्या झुडपांना इवल्याशा कळ्या लागलेल्या दिसत होत्या. महिन्याभरात
त्या उमलतील तेव्हा इथले दृश्य पाहण्यासारखे असेल.

आता मार्गात मोठाले खडक दिसत होते. खडकांवरचे
मखमली शैवाल आमच्या तोल सावरण्याच्या कौशल्याला खुले आव्हान देत होते. थोड्याच
वेळात एक भलामोठा ओढा दृष्टीस पडला. घनदाट झाडीतून ओढ्याचे पाणी खळाळत होते.
पाण्यात भिजण्याची ही शेवटची संधी म्हणून आम्ही सगळ्यांनी ओढ्याच्या पात्रात बसकण
मारली. ते थंडगार पाणी अंगावरून जाताना सगळा शीण दूर करत होतं. ग्रुप मधल्या अनोळखी
चेहऱ्यांशी एव्हाना चांगलीच मैत्री झाली होती. त्या नव्या-जुन्या सवंगड्यांसोबत
यथेच्छ मस्ती करून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. ट्रेकचा हा शेवटचा टप्पा होता.
तेवढ्यात अंधारून आलं आणि पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण ट्रेक मध्ये हुलकावणी
देणारा पाऊस या अखेरच्या टप्प्यात आमची साथ द्यायला आला होता. एका लयीत बरसणाऱ्या
आषाढसरींना अंगावर झेलत आम्ही रानातली निसरडी पायवाट चालू लागलो. मध्येच तीव्र
उतार, कधी मोकळे पठार, तर कधी भातशेती असे वळणा-वळणावर भूदृष्य पालटत होते. आकाशात
दाटलेले कृष्णमेघ आणि मागे उभा ठाकलेला सह्यकडा मोठ्या कौतुकाने आम्हा पामरांची ट्रेक
संपविण्याची लगबग बघत होते. प्रत्येक ट्रेक मध्ये एक असा क्षण येतो की त्यात आपण
भोवतालच्या निसर्गाशी एकरूप होऊन जातो. अंगात कितीही थकवा असला, निसर्गाने कितीही
रौद्र रूप धारण केलेले असले, तरी ती रानावनातली रग्गड वाट संपूच नये असे वाटत राहते.
आपल्या मनात उपजतच असलेली निसर्गाबद्दलची अनिवार ओढ कदाचित उफाळून वर येत असावी.
ट्रेकिंग सारख्या तंगडतोड साहसी प्रकाराकडे खेचून नेणारी हीच ओढ असेल काय?

मार्गात आलेला ओढा 
संपू नये वाटणारी ती वाट अखेरीस नागशेत गावाजवळ येऊन
संपली. पावसानेही एव्हाना आपली खेळी आटोपती घेतली होती. आमची बस गावाजवळ तयारच होती. गावातल्याच
एका घरात कपडे बदलून आम्ही बसमध्ये स्थानापन्न झालो. अंधारबनाला अलविदा करून बस निघाली.
गार वाऱ्याच्या झुळुकीसोबत निद्रादेवी कधी अंगात शिरली ते कळलंच नाही. झोप कसली,
बेशुद्धीच म्हणा ना! दोन तासांनी चहापानासाठी बस थांबली तेव्हा कुठे आम्ही भानावर
आलो. रस्त्यातल्या एका उपहारगृहात पेटपूजा करून आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना
झालो. शरीर जरी थकले असले तरी मन मात्र एका अगम्य तृप्तीने भरलेले होते.
 
  
ट्रेक मध्ये जमलेला मस्त ग्रुप 
                          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *