मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ९ – बटेश्वर मंदिर समूह

आज सहलीचा शेवटचा दिवस होता. आजचा दिवस ठरवला होता ग्वाल्हेरच्या उत्तरेकडील मोरेना जिल्ह्यातील बटेश्वर, गढी पडावली, आणि मितावली या ऐतिहासिक जागांसाठी. या सर्व जागा मुख्य गावांपासून दूर, आडवाटेवर आहेत. तिथे पोहोचायला कोणतीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. शिवाय या जागा बघून थेट विमानतळावर जायचे होते. मग संपूर्ण दिवसभरासाठी एक टॅक्सी बुक केली. ठरल्याप्रमाणे साडेसात वाजता टॅक्सीवाला हॉटेलवर हजर झाला. चेक आउट करून मी निघालो. आज वातावरण जरा ढगाळ होते. पाऊस पडेल असे वाटत होते. मधूनच उन्हाची एखादी तिरीप झेपावत होती. गार वारा सुटला होता. रोड ट्रीप साठी एकदमच मस्त वातावरण होतं. चालकही गप्पिष्ट होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही चाललो होतो. 

पुनर्स्थापित केलेली मंदिरे 

पहिला थांबा होता बटेश्वर मंदिर समूह. इथे साधारण सातव्या ते आठव्या शतकात गुर्जर प्रतिहार राजवटीत बांधली गेलेली सुमारे २०० मंदिरे आहेत. तेराव्या शतकात ही मंदिरे सम्पूर्ण जमीनदोस्त झाली. त्याचे कारण नक्की मुस्लीम आक्रमणे होते की भूकंप हे नक्की सांगता येत नाही. मात्र एकोणिसाव्या शतकात जेव्हा ही जागा पुन्हा निदर्शनास आली तेव्हा इथे दगडांचा नुसता ढिगारा होता. २००५ मध्ये के के मुहम्मद या ASI च्या अधिकाऱ्याने या मंदिरांची पुन्हा उभारणी करण्याचा विडा उचलला. तेव्हा हा सगळा भाग चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांच्या हातात होता. मुळातच हा भाग कित्येक दशकांपासून दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध होता. मात्र मुहम्मद यांनी त्यांच्या म्होरक्याला हे समजावले की मंदिरे त्यांच्या पूर्वजांनी बांधलेली आहेत. मग तो पुनर्स्थापनेस मदत करण्यास राजी झाला. त्याच्या लोकांनी या कामात मदतही केली. पुढच्या काही वर्षांत मुहम्मद यांच्या चमूने एखादे प्रचंड जीग्सौ पझल सोडवावे तसे एक-एक दगड वेगळा काढून, त्याची मूळची जागा शोधून काढून, साधारण पन्नास-एक मंदिरे पुन्हा उभारली. हे सारे काम निश्चितच प्रशंसनीय होते. आज ही सारी मंदिरे गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी आहेत. असा इतिहास बघता ही जागा पाहण्यास मी फारच उत्सुक होतो.

पुजारी काकांच्या झोपडीजवळून दिसणरे दृश्य 

मंदिराच्या कळसावर बसलेला मोर 
ग्वाल्हेरहून तासाभरात मी तिथे पोहोचलो. परिसरात फारसे कुणी पर्यटक नव्हते. त्यामुळे तिथे शांत आणि प्रसन्न वाटत होतं. वालुकाश्मात घडवलेली मंदिरे ढगांतून झिरपत येणाऱ्या प्रकाशात गूढ वाटत होती. मी कॅमेरा काढला आणि फोटो काढू लागलो. मंदिरांच्या आजूबाजूला असंख्य अवशेष विखुरलेले होते. कोणता भाग कुठे लावायचा हे कसे काय ठरवले असेल ASI च्या लोकांनी याच अचंब्यात मी इकडेतिकडे फिरत होतो. ही मंदिरे भारतात इतरत्र आढळणाऱ्या मंदिरांपेक्षा एकदम वेगळी आहेत. प्रत्येक मंदिर म्हणजे एखाद्या मोठ्या मंदिराची लहान आणि सोपी प्रतिकृती. एक चौरसाकृती चौथरा, त्यावर चार भिंती, वर कळस, आणि मध्यभागी देवाची मूर्ती. एकूण उंची केवळ १०-१२ फूट. बहुतांश मंदिरे शिवाची असून काही मंदिरे विष्णू आणि शक्तीची देखील आहेत. मंदिरांवर नटराज, सप्तमातृका, शिव-पार्वती विवाह, विष्णू दशावतार, मैथुनमग्न व्यक्ती, योद्धे, अशा अनेक आकृती कोरलेल्या आहेत. या समूहातले मुख्य मंदिर म्हणजे भूतेश्वर मंदिर. हे एक मोठे पंचरथ मंदिर आहे. जेव्हा सगळी मंदिरे उद्ध्वस्त झाली होती तेव्हा हे एकाच मंदिर थोडेफार बऱ्या अवस्थेत होते. त्याच्या नावावरूनच या समूहाला बटेश्वर किंवा बाटेसर म्हणतात. हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा थोडे मोठे होते. मुख्य मंदिर आणि त्याची दहा उपमंदिरे अशी त्याची रचना होती. मंदिरांच्या मागेच एक लहानशी टेकडी होती. आजूबाजूला बरीच घनदाट झाडी होती. मध्येच मोराचे केकारव ऐकू येत होते. आवाजाचा मागोवा घेतला तर एका मंदिराच्या कळसावर पक्षिराज मोठ्या दिमाखात बसलेला दिसला. तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात मी गुंगून गेलो. 


एकसारख्या पद्धतीने बांधलेली मंदिरे 
तेवढ्यात तिथल्या एका मंदिरातून एक वयस्क पुजारी बाहेर येताना दिसले. इथे पूजा-अर्चाही होते हे बघून मला आश्चर्य वाटलं. मी उगाच त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. हे पुजारी काका मंदिरांच्या परिसरातच एका झोपडीत रहात होते. मला मंदिरांच्या कथेत रस आहे हे पाहून त्यांनी त्यांच्या झोपडीतून एक जाडजूड अल्बम काढला. त्यात ASI ने केलेल्या कामाचा फोटोग्राफिक तपशील होता. मला तर खजिनाच हाती लागल्यासारखे झाले. बराच वेळ मी तो अल्बम चाळत बसलो. पुजारी काका तिथले बारीकसारीक किस्से ऐकवत होते. 

इतक्यात जवळच्या कुठल्याशा शाळेची मुलं एकदम गलका करत मंदिरांच्या आवारात शिरली. मंदिरांच्या भिंतींत त्यांचा आरडाओरडा, पकडापकडी वगैरे सुरु झालं. सोबत आलेले शिक्षक एका कोपऱ्यात बसून गप्पा मारत होते. मला ते सगळं दृश्य बघून अक्षरशः संताप आला. मुलंच ती. कुठेही गेली तरी खेळणारच. मग इतक्या लहान मुलांना अशा ठिकाणी आणावं तरी का? एखाद्या जागेचं पावित्र्य जपणं वगैरे समजण्याचं त्यांचं वय आहे का? पण मग त्यांना आपल्या वारशाची ओळख तरी कशी होणार? मुलांना हे सगळे समजावून सांगणे शिक्षकांचे काम नाही का? उगीच माझ्या डोक्यात विचारमंथन सुरु होतं. शेवटी एका शिक्षकाला मी जाऊन सुनावलं. बिचारा शिक्षक सगळ्या पोरांना गोळा करून निघून गेला. पुजारी काका नुसते माझ्याकडे बघत हसत होते. त्यांच्यासाठी हा रोजचाच प्रकार असेल म्हणा. मुलांना निदान दटावता तरी येतं. मोठी माणसं अशी वागत असतील तर काय करावे? असो. या सगळ्यात वेळ कसा गेला कळलेच नाही. खजुराहोपेक्षा जुनी असूनही या मंदिरांना तेवढी प्रसिद्धी लाभलेली नाही. स्थानिक पर्यटकांशिवाय इथे फारसं कुणी फिरकत नाही. निधीअभावी पुनर्स्थापनेचं काम रखडलेलं आहे. या जागेला पुढच्या काळात बरे दिवस यावेत अशी प्रार्थना करून, पुजारी काकांना थोडीफार दक्षिणा देऊन, आणि परिसरात अजून थोडी फोटोग्राफी करून मी तिथून निघालो.  

ढगाळ आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अजूनच सुंदर दैत होती 

क्रमशः 

Leave a Reply