नितांतसुंदर क्रोएशिया भाग ३ – मोड्रिक गुहेतील थरारक सफर

कोर्नाती बेटांची नयनरम्य सहल आणि झदारच्या किनाऱ्यावरून
दिसलेला अविस्मरणीय सूर्यास्त याची सुरस कथा हॉस्टेल मधल्या सहवाशांना सांगत आणि
तिथले फोटो दाखवत मी हॉस्टेलच्या स्वागत कक्षात सुस्तावलो होतो. पुढचा दिवस इस्टर
संडे चा होता. त्यामुळे जीवनावश्यक सोई-सुविधा वगळता बाकी सारेच बंद राहणार होते.
नशिबाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहणार होती. त्यामुळे तो दिवस मी झदार ते
डुब्रोवनिक या १० तासांच्या प्रवासासाठी राखून ठेवला होता. क्रोएशियामध्ये रेल्वे
नाही. त्यामुळे देशांतर्गत प्रवास बसने किंवा वैयक्तिक वाहनाने चालतो. रस्तेही
यथा-तथाच आहेत. झदार ते डुब्रोवनिक या जेमतेम ३५० किमी अंतरासाठी तिथली बस १० तास
लावते. हे गणितही पश्चिम युरोपच्या तुलनेत जरा आश्चर्यकारक होते. असो. माझी बस दुपारी
दीडची होती. त्यामुळे सकाळचा वेळ मोकळाच होता. या वेळेचा विनियोग कसा करता येईल
याच विवंचनेत मी होतो. तेवढ्यात माझी नजर हॉस्टेलच्या फलकावरील एका पत्रकावर पडली.
Explore Modric cave
with Zara Adventures
असे काहीसे
शीर्षक होते. ही कंपनी जवळच्याच एका गुहेत घेऊन जाणार होती. सफरीची एकूण वेळ ३
तासांची होती. चौकशी करायला फोन लावला. अनपेक्षितपणे ही कंपनी इस्टर संडेला चालू
होती. कंपनी कसली, मारयान नामक एक साहसी क्रीडाप्रकार-तज्ञ ही गुहा-सफर आयोजित करत
होता. मी लगेचच सकाळी ८ ची वेळ ठरवली. हॉस्टेल मधला आणखी एक भारतीय मुलगा, धर्मेश,
सोबत येण्यास तयार झाला.

रविवारचा दिवस उजाडला तोच पावसाळी हवेने. त्यात
हॉस्टेल मधली वीज गायब! स्वागतकक्षात कोणीच उपलब्ध नव्हते. एकंदरीत परिस्थिती बघता
गुहा-सफर आज होईल की नाही याची खात्री मला वाटेनाशी झाली. मात्र ठरल्या वेळेनुसार
मारयान गाडी घेऊन हजार झाला. सगळी तयारी करून आम्ही निघालो. आत्तापर्यंत ट्रेकिंग
बरेच झाले होते. त्यामुळे गिर्यारोहण आणि त्याच्याशी निगडीत क्रीडाप्रकार यांची बऱ्यापैकी
तोंड-ओळख होती. मात्र
caving शी कधी संबंध आला नव्हता. भारतात नैसर्गिक
गुहा फारशा नाहीत. ईशान्येकडील मेघालय आणि मिझोराम राज्यांत काही गुहा आहेत. मात्र
त्यांचाही सखोल अभ्यास अजून झालेला नाही. त्यामुळे
caving हा प्रकार भारतात अजून तितकासा प्रचलित नाही. त्यास
मराठीत आपण गुहावलोकन म्हणू. हा जरी साहसी क्रीडाप्रकार असला तरी यात गुहेतील
परिसंस्थेचा शास्त्रशुद्ध अभ्यासही अंतर्भूत आहे. मी मोठ्या उत्साहाने माझ्या
पहिल्या-वहिल्या गुहावलोकन-अनुभवाची वाट बघत होतो.

झदारमधल्या पॅक्लेन्शिया नॅशनल पार्कमध्ये (Paklencia National Park) मोड्रिक गावाजवळ ही गुहा
(Modric
cave
) आहे.
अर्ध्या तासातच आम्ही गावाजवळ पोहोचलो. मारयान हा एक प्रशिक्षित आणि अनुभवी गुहावलोकन
तज्ञ होता. त्याने आम्हाला गुहेत जाण्यासाठीचे कपडे आणि उंच बूट दिले. शिवाय
हेल्मेट, एक मजबूत दोरी वगैरे साधने दिली. हेल्मेटवर पुढच्या भागात एक छोटी ज्योत
तेवत होती. हा होता आमचा हेड-लॅम्प! बाजारात स्वस्तात मिळणारे
LED दिवे म्हणजे मारयानसाठी
चेष्टेचा विषय होता. ज्योतीमुळे पडणारा पिवळसर प्रकाश गुहेत जो अनुभव देतो त्याची
मजा
LED दिव्याने येत नाही
असं त्याचं मत होतं. ज्योत तेवत ठेवण्यासाठी लागणारं इंधन एका सिलिंडर मध्ये भरून
आमच्या खांद्यावर अडकवलं होतं. एकंदरीतच हॉलीवूड सिनेमातल्या दुर्गम प्रदेशात खजिना
शोधायला निघालेल्या नायकाप्रमाणे आमचा अवतार दिसत होता. मारयानने गुहेसंबंधी सर्व आवश्यक
माहिती दिली. हेल्मेटवरची ज्योत आपला हात भाजू न देता चालू-बंद कशी करायची याचे
प्रात्यक्षिकही आमच्याकडून करून घेतले. अखेरीस आमची वारी गुहेकडे निघाली.

मोड्रिक गुहेचे प्रवेशद्वार
रानातून थोडे अंतर जाताच एका माळरानावर आम्ही
पोहचलो. तिथल्या
एका उंचवट्याखाली एक गुहा दिसत होती. आत जायचा
मार्ग लोखंडी जाळीने बंद केला होता. मारयानने त्याच्याजवळील चावीने ती जाळी उघडली आणि
आम्ही आत शिरलो. आतमध्ये साधारण १० X १२ फूट आकाराची जागा होती. त्यातही नुसते
खडक, चिखल आणि शेवाळे दिसत होते. ही एवढीच गुहा? आमच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक
भाव पाहून मारयान हसू लागला आणि त्याने गुहेच्या एका कोपऱ्याकडे बोट दाखवले.
जेमतेम दीडेक फूट लांबी-रुंदीचे एक भोक लोखंडी जाळीने बंद केलेले दिसले. ‘हा आहे
गुहेत जाण्याचा रस्ता!’ मारयान हसत हसत म्हणाला. मला क्षणभर धडकीच भरली. उगीचच
Sanctum चित्रपटातली नको ती दृश्ये आठवू लागली. धीर
देत मारयान म्हणाला, ‘
don’t
worry, just follow my instructions’.
ते भोक म्हणजे जेमतेम एक माणूस सरपटत जाऊ शकेल
एवढा एक बोगदाच होता. मारयानच्या सूचनेप्रमाणे आम्ही रांगत रांगत त्या बोगद्यात शिरलो.
दोनेक मिनिटांतच पलीकडच्या बाजूने बाहेर पडलो.
गुहेच्या आत घेऊन जाणारा बोगदा 
पहावं तर काय, एखाद्या सभागृहाएवढी
प्रशस्त जागा इथे होती. आतमध्ये मिट्ट काळोख होता. केवळ आमच्या हेल्मेटवरील
ज्योतींचा मिणमिणता प्रकाश त्या अंधाराला चिरत जात होता. तापमान १५ अंश सेल्सियसच्या
आसपास असावं. एक कोंदट वास येत होता. गुहेच्या भिंती ओलसर आणि खडबडीत होत्या. सतत
झिरपणाऱ्या पाण्यामुळे भिंतींवर विशिष्ट आकार तयार झाले होते. गुहेच्या छतावरून
आणि जमिनीवरून असंख्य लवणस्तंभ तयार झालेले दिसत होते. एका वेगळ्याच दुनियेत आपण
आलो आहोत असे वाटत होते. गुहेत झिरपणारे पाणी मातीतल्या अनेक क्षारांनी युक्त
असते. असे क्षारयुक्त पाणी जेव्हा एकाच जागेवरून संथपणे ठिपकत राहते तेव्हा
त्यातील कॅलशियमचे स्तंभ तयार होतात. छतावरून खालच्या दिशेने वाढणाऱ्या स्तंभांना
stalacites तर जमिनीवर खालून वर वाढणाऱ्या स्तंभांना stalagmites असे संबोधले जाते. या स्तंभांच्या वाढीचा
वेग सरासरी वर्षाला ०.१३ मिमी एवढा असतो. पाण्याचा प्रवाह-वेग, त्यातले क्षार, गुहेचे
तापमान असे अनेक घटक त्यास कारणीभूत असतात. आत्तापर्यंत केवळ भूगोलाच्या पुस्तकात
वाचलेल्या या गोष्टी मी पहिल्यांदाच प्रत्यक्षात बघत होतो. सूर्यप्रकाशाचा अभाव, कमी
प्रमाणात असलेला प्राणवायू आणि थंड तापमान अशा परिस्थितीतही गुहांमध्ये काही सजीव
सापडतात. सूर्यप्रकाशावर अवलंबून नसणारे काही जीवाणू, बुरशीच्या काही जाती
,
कीटक व सरीसृप असे
वैविध्यपूर्ण प्राणीजीवन तिथे आढळते. त्यांचा अभ्यास हा जीवशास्त्राच्या दृष्टीने
फार महत्त्वाचा आहे. 

गुहेतील लवणस्तंभ
गुहावलोकन पोशाख आणि
हेल्मेटवरील ज्योत

मारयान हळूहळू पुढे घेऊन जात होता. कधी प्रशस्त
खोल्या तर कधी चिंचोळी पायवाट, कधी खडी चढण तर कधी हलकासा उतार असे गुहेचे अंतरंग
सतत बदलत होते. मार्गात दिसणारे लवणस्तंभांचे चित्र-विचित्र आकार मारयान दाखवत
होता. एका स्तंभाचा आकार जेलीफिश सारखा तर एकाचा आकार फुलदाणीसारखा होता. काही
अगदी लहान स्तंभांच्या टोकाशी पांढऱ्या रंगाचे नव-निर्मित स्तंभ दिसत होते. गुहेतल्या
एका सपाट मोकळ्या जागी आम्ही थांबलो. तिथे छताचा आकार एखाद्या घुमटासारखा भासत होता.
लहानग्या लवणस्तंभांनी त्यावर सुरेख नक्षीकाम केले होते. त्याच्या बरोबर खाली एक
सपाट दगड बसायच्या बाकासारखा वाटत होता. “ही जागा माझ्यासाठी खास महत्त्वाची आहे”
मारयान म्हणाला. “माझे लग्न इथे झाले होते.” आम्ही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू
लागलो. विमानात, डोंगरमाथ्यावर, बोटीवर वगैरे लग्न करणाऱ्या लोकांविषयी ऐकले होते.
पण गुहेत? ते पण अशा गुहेत जिथे सरपटत आत यावे लागते? आमचा विश्वास बसत नाही हे पाहून मारयानने खिशातून
एक फोटोच काढून दाखवला. खरोखर त्या सपाट दगडावर बसलेले वधू-वर आणि इतर काही मंडळी त्यात
दिसत होती. मग त्याच्या लग्ना-दरम्यान घडलेल्या गमती-जमती सांगून मारयानने आमचे
चांगलेच मनोरंजन केले. बिचारी त्याची बायको, लग्नाचा सुंदर पांढरा पोशाख घालून इथे
कशी आली असेल याचा विचार करत आम्हीही हसत होतो.

जेलीफिशसारखे दिसणारे
लवणस्तंभ 


एव्हाना आम्ही गुहेच्या बरेच आत आलो होतो. गुहेची
एकूण लांबी ८५० मीटर होती. पण अंधार आणि खडकाळ वाट यांमुळे ते अंतर बरेच जास्त
वाटत होते. पुढचा टप्पा जरा अवघड होता. एका अरुंद भेगेतून हळूहळू सरकत पुढे जायचे
होते. मारयानच्या सूचनेप्रमाणे आधी हात, मग डोके, आणि मग पाय त्या भेगेतून बाहेर काढत
आम्ही पुढच्या भागात पोहोचलो. हा गुहेचा शेवटचा भाग होता. तिथे आम्ही थोडा वेळ
विसावलो. मारयान म्हणाला, ‘तुमच्या ज्योती विझवा’. आम्ही ज्योती विझवाताच तिथला
मिट्ट काळोख जणू अंगावरच धावून आला. डोळे उघडले काय नि मिटले काय काही फरकच कळत
नव्हता. असा काळोख कधीच अनुभवला नव्हता. त्या काळोखाची काही क्षण अनुभूती घेऊन आम्ही
परतीच्या वाटेला लागलो. गुहेतून बाहेर पडताच एका प्रचंड दडपणातून बाहेर
पडल्यासारखे वाटले. अशा थरारक अनुभवासाठी मारयान चे आभार मानून आम्ही हॉस्टेल वर
परतलो.



अधिक फोटोंसाठी येथे क्लिक करा.     

Leave a Reply