जॉर्डनच्या वाळवंटात – भाग २ – अम्मान शहर आणि अजलूनची बर्फाच्छादित वाट

जाग आली तेव्हा पावणे अकरा वाजले होते. विमानप्रवासाचा
ताण आणि दोन तासांनी पुढे सरकलेले घड्याळ यांची छान युती जमली होती. आन्हिकं आवरून
आज काय पहायचे आहे याचा विचार करू लागलो. सहज खिडकी उघडली आणि समोरच्या दृश्याने
स्तब्धच झालो. अम्मान शहरातील सुप्रसिद्ध रोमन थिएटर समोरच दिसत होते. याच ‘व्यू’
साठी मी ते हॉटेल निवडले होते. पण हॉटेलच्या अंतर्गत सुविधांनी एकदमच भ्रमनिरास
झाला होता. असो. मी लगेचच रोमन थिएटर 
बघायला बाहेर पडलो. तीन टप्प्यांमध्ये विभागलेली त्याची भारदास्त, अर्धवर्तुळाकृती
रचना अम्मानच्या गतवैभवाची साक्ष देत होती. टेकडीच्या नैसर्गिक उताराचा उपयोग करून
बांधलेल्या या सभागृहामध्ये ६००० लोक बसू शकतील एवढी आसनक्षमता आहे. जवळच एक वस्तुसंग्रहालयही
उभारले आहे. जिथे प्राचीन काळी ग्लॅडिएटर्सची झुंज होत असे त्या ठिकाणी एक छानसे
उद्यान विकसित केलेले होते. अम्मानमधले नागरिक तिथे सहज भटकायला म्हणून आले होते.
हवेत गारवा असला तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश यांमुळे वातावरण प्रसन्न
वाटत होते. हे सभागृह ईसवी सनाच्या दुसऱ्या शतकात बांधले गेले. त्या काळी अम्मानचे
नाव फिलाडेल्फिया असे होते. जॉर्डनचा हा भाग ग्रीक समाज्र्याचा भाग होता. त्या
काळातील अनेक लहान-मोठे अवशेष शहरात विखुरलेले आहेत. थोडा वेळ त्या परिसरात फिरून
मी हॉटेलवर परतलो.
अम्मानमधील रोमन थिएटर – फोटो आंतरजालावरून साभार  
माझ्या आधी ठरलेल्या रूपरेषेप्रमाणे आजचा दिवस
अजलून आणि जेराश या जॉर्डनच्या उत्तर भागातील ठिकाणांसाठी ठरवलेला होता. चौकशी
केल्यावर कळले की त्या दिशेने जाणारी बस ११ वाजताच गेली होती. पुढची बस संध्याकाळी
४ वाजता होती. पुढचा-मागचा विचार न करता मी सरळ सालेहला फोन लावला आणि जेराशला घेऊन
जाशील का म्हणून विचारले. नशिबाने तो उपलब्ध होता. त्याच्या कालच्या ऑफर बद्दल मी
अजून काही निर्णय घेतला नव्हता. संपूर्ण ५ दिवसांसाठी एकट्याने गाडी आणि ड्रायव्हर
भाड्यावर घेणे फार महाग पडेल असे वाटत होते. मात्र जेराशला जाण्यासाठी दुसरा काही
पर्याय नव्हता. यथावकाश सालेह गाडी घेऊन हॉटेल वर आला. जेराशच्या आधी अजलूनचा
किल्ला पाहणे अधिक सोयीस्कर ठरेल असे सालेहने सुचवले. मी संमती दर्शवली आणि आम्ही
अजलूनच्या दिशेने निघालो.

अम्मान शहरातील एक रस्ता 
माझे हॉटेल शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात होते. तिथल्या
चिंचोळ्या, चढ-उतारांच्या रस्त्यांवरून गाडी धावत होती. अम्मान शहर हे सरासरी ७००
मीटर उंचीच्या १६ टेकड्यांवर वसलेले आहे. त्यामुळे सतत चढ-उतार असणे स्वाभाविक
होते. अम्मानचा चेहरामोहरा भारतातल्या एखाद्या मध्यम आकाराच्या शहरासारखा वाटत
होता. कुठे अस्ताव्यस्त वाढलेली वस्ती तर कुठे आकर्षक पद्धतीने बांधलेल्या उंच
इमारती. एखादा भाग एकदम स्वच्छ आणि चकचकीत तर पलीकडच्याच चौकात झोपडपट्टी. एक
वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या इमारती वाळूच्या विविध छटांमध्ये रंगवलेल्या होत्या.
भूदृश्याशी मिळती-जुळती रंगसंगती असल्याने इथल्या इमारती भूदृश्याचाच एक भाग वाटत होत्या.
जशी गाडी धावू लागली तशा सालेहच्या गप्पा सुरु झाल्या. अम्मान आणि जॉर्डनच्या
उत्तर भागात काही दिवसांपूर्वीच विक्रमी हिमवर्षाव झाला होता. शहरातल्या उंच
भागांत अजूनही बर्फ साचलेले दिसत होते. इथे हिमवर्षाव म्हणजे अगदीच दुर्मिळ घटना.
त्यामुळे इथली व्यवस्था हिमवर्षावाला सामोरी जाण्यास सक्षम नाही. त्यात मागच्या
आठवड्यातला हिमवर्षाव म्हणजे काही गेल्या काही दशकांमधला सर्वात मोठा हिमवर्षाव
होता. शहरातल्या काही भागांत तब्बल ५ फुट बर्फ साचलं होतं. त्यादरम्यान इथली सगळी
व्यवस्था पार कोलमडून पडली होती. साचलेल्या बर्फामुळे सालेहला त्याची गाडी बाहेरच
काढता आली नव्हती. मागच्या आठवड्यात त्याचा काहीच धंदा झाला नव्हता. हळूहळू बर्फ
वितळल्यानंतर सारी काही पूर्वपदावर येत होते. मी अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलो नाही
याबद्दल मी नशिबाचे आभार मानले.

अम्मानचा शहरी भाग मागे टाकून गाडी आता मोकळ्या
हायवेवरून धावू लागली. जॉर्डनचा उत्तर भाग डोंगराळ आहे. इथे कडक उन्हाळा आणि ऊबदार,
पण पावसाळी हिवाळा असे भूमध्य सागरी प्रकारचे हवामान आढळते. इटली आणि स्पेनप्रमाणे
हाही प्रदेश ऑलिव्हच्या झाडांसाठी अनुकूल आहे. रस्त्याच्या कडेने असंख्य ऑलिव्हच्या
बागा दिसत होत्या. व्हिनेगरमध्ये मुरवलेली ऑलिव्हफळे विकणारे विक्रेते जागोजागी
दिसत होते. गाडी जसजशी डोंगरावर चढू लागली तसतसा आजूबाजूला प्रचंड बर्फ दिसू
लागला. काही ठिकाणी तर मी जॉर्डनमध्ये आहे की जर्मनीमध्ये अशी शंका यावी इतका बर्फ
होता. आसपासच्या शहरांमधली मंडळी बर्फात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटत होती. राजस्थानात
अचानक रोहतांग पास अवतरावा अशी गमतीदार परिस्थिती दिसत होती. खाली उतरून काही फोटो
काढण्याचा मोह मलाही आवरला नाही.

अजलूनच्या वाटेवर साचलेला बर्फ 

किल्ल्यावरचा निरीक्षण मनोरा 
यथावकाश मी अजलूनला पोहोचलो. गावाजवळच्या एका
डोंगरावर अजलूनचा सुप्रसिद्ध किल्ला आहे.
हा किल्ला १२ व्या
शतकात बांधला गेला. दमास्कस ते दक्षिण जॉर्डन आणि त्यापुढे इजिप्तपर्यंत जाणाऱ्या
व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला उपयोगात येई. किल्ल्याकडे
जाणारा रस्ता नुकताच मोकळा केला गेला होता. किल्ल्याच्या अंतर्गत भागात अजूनही
बर्फ आणि चिखल होता. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ फारशी नव्हती. किल्ल्याचा आकार
काही फार मोठा नव्हता. इथली स्थापत्यशैली वेगळीच वाटत होती. किल्ल्याच्या एका
अंगाला असलेला, आता अर्धा-अधिक ढासळलेला निरीक्षण मनोरा लक्ष वेधून घेत होता.
बाह्यांगाची बरीच पडझड झालेली असली तरी अंतर्गत भाग बऱ्यापैकी शाबूत होता. आतमधल्या
खोल्या पिवळसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळल्या होत्या. किल्ल्याच्या पुरातन
सौंदर्याला बाधा येऊ न देता केलेली प्रकाशयोजना निश्चितच कौतुकास्पद होती. मला दोन
क्षण सह्याद्रीतल्या किल्ल्यांची अवस्था आठवली. उगीच सात्विक संतापाने मूड खराब
होऊ नये म्हणून मी तो विचार झटकून टाकला. इतक्यात किल्ल्याच्या सज्ज्यावर दोन गुबगुबीत
मांजरी बसलेल्या दिसल्या. पर्यटकांशी लडिवाळपणे वागून काहीतरी अन्न पदरात पाडून
घेणे हा त्यांचा नित्यक्रमच असावा. असो. सज्ज्यावरून आसपासचा परिसर न्याहाळता येत होता.
डोंगरमाथ्यावरचे बर्फ, उतारावरच्या ऑलिव्हच्या बागा, आणि मधूनच दिसणारी लहान-सहान
गावे असे ते दृष्य फारच मोहक वाटत होते. तिथे थोडा वेळ छायाचित्रण करून मी गाडीकडे
परतलो.


अजलूनच्या किल्ल्यातील प्रकाशयोजना

अजलूनच्या किल्ल्याचे ढासळलेले बाह्यांग 
आता भूक लागली होती. खाण्याच्या शोधार्थ आम्ही
अजलून गावात गाडी वळवली. हे गाव म्हणजे भारतातल्या एखाद्या गावासारखंच वाटत होतं.
आपल्याकडे जिथे-तिथे उंडारणाऱ्या गाई मात्र इथे दिसत नव्हत्या. विशेष म्हणजे
रस्त्यावर किंवा बाजारात महिला अगदीच तुरळक होत्या. सगळीकडे फक्त पुरुष. घराच्या
चौकटीत अडकलेल्या तिथल्या महिलांबद्दल वाईट वाटलं. पण सालेहला मात्र त्याबद्दल
काही वैषम्य वाटलेलं जाणवलं नाही. असो. गावातलेच एक उपहारगृह त्याने माझ्यासाठी
शोधले. शाकाहारी असणं म्हणजे काय हे इथल्या लोकांना समजावता येईल का याच्या चिंतेत
मी होतो. पण सालेहने माझे काम अगदीच सोपे करून टाकले. जगभरातल्या पर्यटकांना
फिरवल्यामुळे त्याचे लोकांच्या आहारविषयक सवयींचे ज्ञान पक्के होते. त्याने
माझ्यासाठी गरमागरम फलाफल आणि हम्मस मागवला. सोबत पिटा ब्रेड, अरेबिक पद्धतीची
कोशिंबीर, आणि आयरान (ताक) सुद्धा मागवले. पश्चिम आशियाई प्रकारचे अन्न याआधी
जर्मनीत बऱ्याचदा खाल्ले होते. पण जॉर्डन मधल्या फलाफलची चवच न्यारी होती. जेवण
उरकून आम्ही जेराशच्या दिशेने निघालो.

किल्ल्याच्या सज्ज्यावरून दिसणारे दृश्य 
सज्ज्यावर ऊन खात बसलेले मांजर 
क्रमशः

0 thoughts on “जॉर्डनच्या वाळवंटात – भाग २ – अम्मान शहर आणि अजलूनची बर्फाच्छादित वाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *