कुद्रेमुखची रानवाट – भाग २ – शोला परिसंस्थेत प्रवेश

मुलोडी गावात चहा-नाश्ता उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. पाऊस अधून-मधून कोसळत होता. वातावरण कुंद होते. गार वाऱ्यावर हुडहुडी भरत होती. फार जास्त पाऊस लागू नये अशी अपेक्षा करत आम्ही हर हर महादेव म्हणून ट्रेकला सुरुवात केली. गावातून बाहेर पडताच मंद चढण सुरु झाली. आजूबाजूच्या डोंगरांवर नुसती खुरटी झुडूपं आणि गवत दिसत होते. उंच आणि घनदाट झाडं कधीच मागे पडली होती. आपण बऱ्यापैकी उंचीवर असल्याचं जाणवत होतं. तेवढ्यात वन विभागाची चेक पोस्ट दिसली. आम्ही पहाटे दिलेल्या ओळखपत्राच्या प्रती इथल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. तो प्रत्येकाचं नाव घेऊन तीच वक्ती आहे की नाही हे तपासून बघत होता. शिवाय प्रत्येकाच्या बॅगेत किती प्लास्टिकच्या पिशव्या आहेत हेही तपासणं चाललं होतं. माणशी केवळ एकच पिशवी वर न्यायची परवानगी होती. त्यामुळे दुपारच्या जेवणाचं पाकीट वगळता इतर सगळं समान इथे काढून ठेवावं लागलं. तसा उपक्रम स्तुत्यच होता. कुद्रेमुखचा परिसर अति-संवेदनशील असल्याने वन विभाग इथल्या पर्यावरणाच्या बाबतीत बराच दक्ष होता. महाराष्ट्रातल्या वन विभागाला कधी जाग येणार देव जाणे. असो. सगळी तपासणी पूर्ण होतेय तेवढ्यात पावसाची एक जोरदार सर आली. वाऱ्याने थंडी वाजू लागली. आता सगळा ट्रेक या अशाच वातावरणात करायचा आहे याची मनोमन तयारी करत आम्ही पुढे निघालो. 

वाटेतले रम्य दृश्य 
वन विभागाची चेक पोस्ट 


दरीत फोफावलेलं गच्च रान आणि माथ्यावरची खुरटी झुडपे 
एका डोंगरधारेच्या अंगाने वर-खाली होत ती वाट हळूहळू कुद्रेमुखच्या शिखराच्या दिशेने जात होती. काही अंतर मोकळ्या गवताळ भागातून रेंगाळत ती वाट मध्येच डोंगराच्या बेचक्यात शिरत होती. डोंगराच्या बेचक्यांमध्ये घनदाट रान फोफावलं होतं. त्या रानात प्रवेश केला की वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटे. भर दिवसा दाटून आलेला अंधार, पानांतून सळसळत वाहणारा वारा, वरून पावसाचे थेंब, आणि ते उबदार दमट वातावरण थोडा वेळ हवंहवंसं वाटे. मग त्या बेचक्यातून धोधो वाहणारा ओढा आडवा येई. आपल्या घुमणाऱ्या ध्रोन्कारात तो पावसाच्या आवाजावरही मात करे. त्या तांबुसराड पाण्यात झोकून द्यावंसं वाटे. मग अचानक ते दाटलेलं रान कोंदट आणि भयाण वाटू लागे. ओढा पार करून थोडं वर चढलं की वाट रानातून बाहेर येई. मग ती पुन्हा डोंगरधारेच्या अंगाने खुरट्या गवतातून सरपटत पुढे जाताना दिसे. त्यावरून तोल सावरत चालू लागताच वाऱ्यासोबत पाऊस सपासप अंगावर चालून येई. मग पुन्हा कधी बेचक्यातलं रान येतंय याची वाट बघत जीव पुढे चालू लागे. 

बेचक्यातल्या कोंदट रानातून वाहणारा ओढा  

रमतगमत, पावसाचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो होतो. एक गोष्ट मात्र या आनंदात सतत व्यत्यय आणत होती. ती म्हणजे जळवा!! पश्चिम घाट म्हटलं म्हणजे जळवा आल्याच. त्यात कुद्रेमुखचं हे रान म्हणजे जळवांचं जणू माहेरच. इथे प्रत्येक पावलावर कुठेतरी जळू दिसत होती. आम्ही दर दहा पावलांवर अंगावर कुठे जळू चढलिये का ते बघत होतो. कोणाच्या अंगावर चढलेली दिसली तर लगेच सावध करत होतो. ट्रेक लीडर आमच्याकडे बघून हसत होता. म्हणत होता, पिऊ दे की थोडंफार रक्त. काही होत नाही. त्याचं म्हणणं खरंच होतं म्हणा. जळवांच्या चावण्याने कुठले रोग होत असल्याचे ऐकीवात नाही. शिवाय त्या दंशाने कसली विषबाधाही होत नाही. थोडंफार रक्त वाहतं एवढंच. तासभर जळू-दक्षता अभियान राबवल्यानंतर आम्ही शेवटी हार मानली. काय व्हायचंय ते होऊदेत. एकदा स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन केलं की त्याने देऊ केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत तशा स्वीकारायच्या.  

वाटेतला फलक आणि समोर ढगांच्या दुलईत दडलेले कुद्रेमुख शिखर 

वर-खाली होणारी ती वाट आता एका सपाट भागावर येऊन पोहोचली. इथे कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाचा एक फलक लावलेला होता. समोर ढगांनी व्यापलेला एक प्रचंड डोंगर दिसत होता. हेच कुद्रेमुख शिखर. त्या फलकावरच्या चित्रानुसार इथून कुद्रेमुख शिखराचा संपूर्ण व्यू दिसतो. मात्र आज ढगांच्या साम्राज्यामुळे तसा व्यू काही आमच्या नशिबात नव्हता. तिथे थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो. पाऊस जरा ओसरला होता. वातावरण प्रसन्न वाटत होतं. थोडं अंतर पुढे जाताच तीव्र चढण सुरु झाली. वीसेक मिनिटांच्या चढाईनंतर एका उंच टेकडीवर वाट येऊन थबकली. इथून साऱ्या कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाचा रम्य परिसर दिसत होता. हिरवा मखमली शालू पांघरलेले डोंगर जणू ढगांशी हवा-पाण्याच्या गप्पा मारत होते. नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार गोलाकार टेकड्या दिसत होत्या. महाराष्ट्रातला सह्याद्री आणि इथला सह्याद्री यांत हाच फरक आहे. अग्निजन्य खडकामुळे महाराष्ट्रातला सह्याद्री रांगडा वाटतो. बेलाग ताशीव कडे, माथ्यावरची बोडकी पठारे आणि पायथ्याशी बिलगलेली अरण्ये असे महाराष्ट्रातले त्याचे रूप. इथे कर्नाटकात मात्र तो काळासावळा खडक कुठे दिसत नाही. गोल-गोल टेकड्या एकमेकांच्या अंगावर चढत आभाळाला स्पर्श करू पाहतात. त्यांच्या उताराने गच्च रान पसरत जातं. मग एका उंचीनंतर मोठे वृक्ष तग धरू शकत नाहीत तिथपासून खुरट्या झुडपांचा आणि गवताचा प्रदेश सुरु होतो. हाच तो नानाविध प्रदेशनिष्ठ प्रजातींना आसरा देणारा शोला प्रदेश. भारतातली एक अद्वितीय परिसंस्था त्या ठिकाणी मी अनुभवत होतो. 

हिरवा शालू नेसलेले डोंगर 

शोला परिसंस्था 

अजून जवळपास अर्धी चढाई बाकी होती. आम्ही पावलांचा वेग वाढवला.

क्रमश: 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *