कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग ५ – उरलेसुरले किनारे आणि न हरवलेला कॅमेरा

हाफ मून बीचवरच्या विश्रांतीनंतर आम्ही पुढच्या बीचकडे निघालो. समोर अर्थातच एक टेकडी दिसत होती. ही आत्तापर्यंतची सगळ्यात उंच टेकडी असेल. वाटेने गर्द झाडी होती. चांगला तास लागला वर चढायला. आता पुढची वाट टेकडीच्या धारेने जात होती. डाव्या हाताला समुद्र गर्जत होता. उतारावर वाढलेली माडाची झाडं मोठ्या कसोशीने वाऱ्याशी झुंज देत उभी होती. थोड्या वेळातच वाट पुन्हा गर्द झाडीत शिरली. पानांच्या जाळीतून दुपारचं कडक उन हिरवं होऊन खाली झिरपत होती. लाल मातीतली पायवाट आणि ते हिरव्या छटेचं उन एक वेगळीच वातावरणनिर्मिती करीत होते. आता वाट उतरू लागली. हळूहळू झाडांची दाटी कमी होऊ लागली आणि समुद्र दिसू लागला. एका वळणावर आलो आणि समोर ॐ बीचचे नितांतसुंदर दृश्य नजरेस पडले. एकमेकास लागुन असलेल्या दोन अंतर्वक्र किनाऱ्यांमुळे या बीचला ओम बीच असे नाव पडले होते. दोन किनाऱ्यांच्या मधल्या भागात जमिनीचा एक लहानसा तुकडा समुद्रात शिरला होता. त्यावर एक लहानशी खडकाळ टेकडीही दिसत होती. इथे बरेच पर्यटक दिसत होते. ओम बीचचा हा “व्यू” बघण्यासाठी अनेक जण या वळणापर्यंत चढत येत होते. त्यामुळे तिथे काही लहान-सहान दुकानेही उगवली होती. गर्दी बघून आम्ही लगेचच तिथून काढता पाय घेतला. 

टेकडीच्या धारेवरून जाणारी वाट 

हिरवंं उन आणि लाल माती 

ओम बीचचे रम्य दृश्य 

ओम बीच तसा चालायला बराच मोठा होता. इथली वाळूही अगदी भुसभुशीत होती. ऊन मी म्हणत होतं. आता चालायचा अगदी कंटाळा आला होता. पण थोडेच अंतर राहिले होते. म्हणता म्हणता आम्ही कडले बीचवर पोहोचलो. हा गोकर्णमधला सगळ्यात गजबजलेला बीच. दुपारची वेळ असल्याने गर्दी तशी आटोक्यात होती. या बीचवर पोहण्यास असुरक्षित अशा काही जागा होत्या. तिथे तसे फलकही लावलेले होते. जागोजागी सुरक्षारक्षक लोकांवर नजर ठेवून होते. ती व्यवस्था बघून थोडेसे आश्चर्य तर वाटलेच पण समाधानही वाटले. भारतात कुठेतरी लोकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था आहे हे बघून जरा बरं वाटलं. बीचवरच्याच एका हॉटेलवर आमची जेवणाची सोय होती. इथे दोन तासांचा ब्रेक होता. जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही काही लोक पाण्यात खेळायला पळालो. दोन दिवसांचा शीण पाण्यात उतरल्यावर कुठच्या कुठे पळाला. लाटा उंच उसळत होत्या. दुपारच्या वेळचं ते समुद्राचं कोमट पाणी दुखऱ्या स्नायूंवर मायेचा हात फिरवत होतं. पाण्यात खेळता-खेळता तास कसा गेला कळलंच नाही. जेवण तयार झाल्याची हाक ऐकू आली आणि काहीशा अनिच्छेनेच पाण्याच्या बाहेर पडलो. आता सडकून भूक लागली होती. भरपेट जेवण झाले. काश एक छान डुलकी काढता आली असती! पण घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. 

कडले बीच 
आता गोकर्णचा मुख्य किनारा पार करून थेट ट्रेन स्टेशनवर जायचे होते. दुपारचे चार वाजत आले होते. उन्हाची तीव्रता जरा कमी झाली होती. मुख्य किनाऱ्याच्या एका अंगाला एक लहानसे मंदिर होते. तिथून बीच आणि समोरचा समुद्र यांचे रम्य दृश्य दिसत होते. आम्ही तिथे थोडा वेळ विसावलो. ग्रुप फोटो वगैरे काढले आणि बीचवरून बाहेर पडलो. आता शहरातून काही अंतर चालत बस स्थानकावर जायचे होते. ट्रेक तर संपला होता. म्हटलं आता ते अवजड ट्रेकिंग शूज काढून साध्या चपला घालू. दोन मिनिटे थांबून बदलाबदली केली आणि शूज नुसते एका पिशवीत घालून पुढे चालू लागलो. थोडं अंतर जातोय तेवढ्यात लक्षात आलं, गळ्यातला कॅमेरा कुठंय?? जिथे शूज काढले तिथे राहिला की काय? दोन क्षण काही सुचेचना! लगेच ट्रेक लीडरला सांगून मी मागे पळालो. शूज काढले तिथे येऊन पोहोचलो. आसपासच्या लोकांना वेड्यासारखा विचरू लागलो, कोणी एक काळी बॅग बघितली का. भेळपुरीवाल्याला विचारलं, पाणीपुरीवाल्याला विचारलं, समोरच्या बाकावर बसलेल्या बायकांना विचारलं, चौकातल्या ट्राफिक पोलिसालाही विचारलं. काहीच धड उत्तर मिळेना. आता जर कोणी चोरलाच असेल तर असा कोणाला विचारून मिळायची शक्यता नाहीच! पोलिसात तक्रार करावी का? ट्रेनच्या वेळेआधी ते करून होईल? आणि तरीही मिळायची काय शक्यता? एक नाही हजार विचार डोक्यात थैमान घालू लागले. कॅमेरा हरवला आहे आहे सत्य अजूनही पचले नव्हते. तितक्यात फोन वाजला. ट्रेक लीडरचाच फोन होता. “तुझा कॅमेरा इथे आमच्याकडे आहे, लवकर पुढे ये!” ते शब्द ऐकून जीवात जीव आला. धावतच पुढे गेलो. माझा घामेजलेला चेहरा बघून सगळे हसत होते. ग्रुपमधल्याच एका मुलीने तिच्या मित्राचा कॅमेरा समजून माझा कॅमेरा उचलला होता! शूज बदलण्याच्या नादात त्याकडे माझे लक्षच गेले नाही. नेहमी असतो तसा कॅमेरा गळ्यात असेल असे समजून मी पुढे चालू लागलो होतो. नक्की काय घडले नि कसे घडले कोणास ठाऊक! पण त्या काही मिनिटांसाठी माझा जीव असा काही टांगणीला लागला होता की विचारू नका! 

गोकर्ण मुख्य बीच 

एकदाचे आम्ही स्टेशनवर पोहोचलो. गाडीत शिरताच जेवण वगैरे उरकले आणि सगळेच निद्रेच्या स्वाधीन झालो. खडकाळ टेकड्या, विस्तीर्ण किनारे, रम्य सूर्यास्त आणि त्याचसोबत न हरवलेला कॅमेरा यांमुळे हा बीच ट्रेक आठवणींच्या गाठोड्यात कायमचा बांधला गेला आहे. 

समाप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *