ओरछाहून सकाळी लवकरच निघालो. तिथून झाशी साधारण १३ किमी आहे. अर्ध्या-पाउण तासातच झाशी रेल्वे स्थानकात पोहोचलो. इथून ग्वाल्हेरला जायला बऱ्याच गाड्या होत्या. तिकीट खिडकीवर आल्यावर कळलं की मुळातच लेट झालेली एक सुपरफास्ट एक्स्प्रेस लवकरच स्टेशनात शिरते आहे. मग लगेचच तिकीट काढलं. आधीच लेट झालेली ही गाडी अजून लेट न होवो असं म्हणून मी गाडीत चढलो. एखाद्या लांब पल्ल्याच्या गाडीच्या जनरल डब्यातून जायचा माझा पहिलाच अनुभव असावा कदाचित. बसायला जागा नव्हतीच. समोर एक तरुण बसला होता. माझ्या गळ्यातल्या कॅमेऱ्याकडे निरखून बघत होता. त्याने थोडंसं सरकून बसायला जागा करून दिली. मी सहज महणून त्याला विचारू लागलो, गाडी किती वाजता पोहोचेल, कायमच लेट असते का, वगैरे. मग ओळख-पाळख झाली.
तर हा तरुण, आशिष, मुळचा ग्वाल्हेरचा. सध्या कुठल्याशा कंपनीत एच आर म्हणून काम करत होता. फोटोग्राफी करायचा थोडीफार. आवड-निवड जुळली की गप्पागोष्टी सुरु होतात. आमची तर लगेच मैत्रीही झाली. मी ग्वाल्हेरला खास फिरायला म्हणून आलो आहे याचे त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते. एकीकडे खास आपलं शहर बघायला कोणी मुंबईकडचा पाहुणा आला आहे याचा आनंदही होत होता. उत्साहात येऊन तो म्हणाला, “मैं आपको शहर घुमाउंगा!” मला तर अगदीच आनंद झाला. एखादं शहर बघायला स्थानिक माणसासारखी दुसरी कोणती सोबत नाही. त्यात आशिषसारखा आपल्या शहरावर मनापासून प्रेम करणारा कोणी असेल तर बातच न्यारी! मग आम्ही संपूर्ण दिवसाचा प्लॅन बनवला. तेवढ्यात ग्वाल्हेर आलंच.
|
जय विलास महालाचे प्रवेशद्वार |
|
महालाचा प्रशस्त परिसर |
हॉटेल स्टेशनच्या जवळच होतं. मी चेक इन केलं, आंघोळ वगैरे उरकली, आणि जेवायला बाहेर पडलो. ऑर्डर दिली आणि गुगलवर सगळ्यात जवळ कोणती प्रेक्षणीय जागा आहे ते शोधू लागलो. ग्वाल्हेर हे मध्य भारतातलं एक महत्त्वाचं शहर. त्याचा इतिहास कित्येक शतके मागे जाणारा. त्यापैकी मध्ययुगातला तोमर राजवटीचा काळ म्हणजे ग्वाल्हेरच्या इतिहासातलं सुवर्णयुग. पुढे अठराव्या शतकात, पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर, महादजी शिंदे (आताचे नाव सिंदिया) या मराठा सरदाराने ग्वाल्हेरचे तख्त मिळवले. त्यानंतर भारत स्वतंत्र होईपर्यंत ग्वाल्हेर हे एक संस्थान म्हणून राहिले. १८५७ च्या उठावात ग्वाल्हेर हे महत्त्वाच्या घडामोडींचा केंद्रबिंदू होते. असा रंजक इतिहास लाभलेल्या या शहरात मन मंदिर महाल, ग्वाल्हेर किल्ला, गोपाचल पर्वत, सास-बहु मंदिर, जय विलास महाल, अशा अनेक प्रेक्षणीय वास्तू आहेत. त्यांपैकी जय विलास महाल माझ्या हॉटेलपासून जवळच होता.
|
महालातील देवघर |
जेवण उरकलं आणि जय विलास महालाकडे निघालो. युरोपियन आणि भारतीय स्थापत्यशैलींचे उत्तम मिश्रण असलेला हा महाल जयाजीराव सिंदिया यांनी १८७४ मध्ये बांधला. महालाचा केवळ एक भाग वस्तूसंग्रहालय म्हणून पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. इतर भागात अजूनही सिंदिया कुटुंबियांचे वास्तव्य आहे. तिकीट काढून मी आत शिरलो. मध्यभागी विस्तीर्ण बाग, त्यात एक कारंजे, चारही बाजूंनी सममितीत बांधलेली गोथिक शैलीतली पांढरी शुभ्र इमारत, सारे अगदी युरोपातल्या एखाद्या समर पॅलेससारखी भासत होती. सज्जे मात्र भारतीय शैलीत सुशोभित केलेले होते. अधूनमधून डोकावणारे घुमट खास मध्ययुगीन भारतीय शैलीचा आभास निर्माण करत होते.
आतील दालनांत सिंदिया घराण्याचा इतिहास, त्यांच्या वापरातल्या वस्तू, त्यांचे दिवाणखाने, वगैरे गोष्टी सुबकतेने मांडल्या होत्या. त्या महालातले देवघर म्हणजे आपल्या टू-बी-एच-के फ्लॅट एवढं मोठं होतं! घराण्याची श्रीमंती आणि राजांची कलासक्तता त्यातून भरभरून दिसून येत होती. या महालातले सर्वात उल्लेखनीय दालन म्हणजे दरबार हॉल. हे दालन म्हणजे अक्षरशः भव्यदिव्य होतं. मोठाले डायनिंग टेबल, नाजूक कोरीवकाम केलेल्या खुर्च्या, छतावरची सुरेख सोनेरी चित्रे, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मध्यभागी असलेले महाकाय झुंबर! मी पाचेक मिनिटं नुसता पाहतच राहिलो. काय श्रीमंती होती या देशात कधी काळी! मग उगीच वैभवशाली इतिहास आणि अस्वस्थ करणारे वर्तमान असे विचार मनात रुंजी घालू लागले. तेवढ्यात आशिषचा फोन आला. तो अर्ध्या तासात भेटणार होता महालाच्या बाहेर. मग थोडेफार फोटो काढून तिथून बाहेर पडलो.
|
जय विलास महालातील दिवाणखाना |
|
दरबार दालनातील महाकाय झुंबर |
ठरल्याप्रमाणे आशिष त्याची स्कूटर घेऊन हजर होता. सुरुवातीलाच आम्ही गोपाचल पर्वतावरील ग्वाल्हेरच्या किल्ल्याकडे निघालो. हा किल्ला म्हणजे भारतातल्या काही सर्वात प्रेक्षणीय किल्ल्यांपैकी एक. मुघल सम्राट बाबरने म्हटल्याप्रमाणे हा किल्ला म्हणजे हिंदुस्तानातील किल्ल्यांच्या माळेतील एक मोती आहे! आम्ही स्कूटर पार्क केली आणि किल्ला भटकायला निघालो. किल्ल्याचा आवार प्रचंड मोठा होता. इथले प्रमुख आकर्षण म्हणजे मन मंदिर महाल. महालाचे नेटके बुरुज दुरूनच खुणावत होते. इथल्या भिंतीवर घडवलेले रंगीत नक्षीकाम आणि प्राण्या-पक्ष्यांच्या आकृती महालाचे वेगळेपण दर्शवत होत्या. आत शिरलो आणि एकापेक्षा एक सरस दालने दिसू लागली. मध्यवर्ती भागातले प्रांगण तर फारच सुंदर होते. प्रत्येक खांबावर आणि सज्ज्यावर नाजूक कोरीवकाम केलेले होते. महालातले गोल तळघर आणि तिथली ध्वनीक्षेपण यंत्रणा एकदमच इंटरेस्टिंग होती.
|
मन मंदिर महालाचे बुरुज आणि तटबंदी |
|
भिंतींवरील सुरेख नक्षीकाम |
|
ग्वाल्हेरचे ट्रेड मार्क दृश्य |
महाल आतून फिरून झाल्यावर आम्ही बाहेरच्या व्यू पॉइंट वर आलो. इथून एका बाजूला अवघे ग्वाल्हेर शहर दिसत होते तर दुसऱ्या बाजूला मन मंदिर महालाची सुरेख तटबंदी. इथले दृश्य म्हणजे जणू ग्वाल्हेरचा ट्रेडमार्क! हलका वारा सुटला होता. दुपारची वेळ असली तरी इथे डोंगरावर गारठा जाणवत होता. आम्ही थोडा वेळ तिथे टेकलो. प्रकाश विरुध्द दिशेने होता. पण या जागी फोटो नाही काढून कसं चालेल? तिथून जवळच महालाचे मुख्य द्वार होते. याची रचना तर अफाट होती. दोन बाजूंनी उत्तुंग मनोरे, मधल्या भागात एक निरीक्षण सज्जा, कमानीच्या आकाराचा प्रचंड दरवाजा, आणि भिंतींवर रेखाटलेले सुरेख नक्षीकाम, सारेच अद्भुत होते. इथे थोडीफार फोटोग्राफी करून आम्ही किल्ल्याच्या इतर भागाकडे वळलो. मन मंदिर महालाच्या मागच्या बाजूला गुजरी महाल, कर्ण महाल, विक्रम महाल असे अजूनही काही महाल आहेत. यांपैकी काही महाल चांगल्या अवस्थेत आहेत तर काही अगदीच जीर्णावस्थेत. तिथे एक फेरफटका मारला आणि मंदिरांकडे वळलो.
|
मन मंदिर महालातील नाजूक नक्षीकाम |
|
किल्ल्यावरचे इतर काही महाल |
|
किल्य्यावर येणारा मार्ग |
|
महाकाय प्रवेशद्वार |
क्रमशः