Traversing Madhya Pradesh – Part 2 – Architectural Jewels of Khajuraho | मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग २ – खजुराहोची स्थापत्यरत्ने – पूर्व मंदिरसमूह

पहाटे साडेसहाला ट्रेन खजुराहोला पोहोचली. अर्धवट झोपेतच मी खाली उतरलो. हवेत चांगलाच गारठा होता. हलकं धुकं पसरलं होतं. रिक्षाने शहरात पोहोचलो. झोस्टेल नामक हॉस्टेल वर आधीच बुकिंग केलेलं होतं. युरोपातल्या हॉस्टेल्सच्या धर्तीवर भारतातल्या लोकप्रिय पर्यटनाच्या जागी ही हॉस्टेल्स बांधण्यात आली आहेत. एकट्याने फिरणाऱ्या बॅकपॅकर तरुणांसाठी ही हॉस्टेल्स म्हणजे अगदी सोयीची. इथे वाजवी किमतीत दर्जेदार सेवा तर मिळतेच. शिवाय समविचारी पर्यटकांशी संवादही साधता येतो. हॉस्टेलवर जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली. मग आवरून नाश्ता करायला बाहेर पडलो. 
 
खजुराहो मध्ये स्थानिक पर्यटकांपेक्षा परदेशी पर्यटकांचीच वर्दळ जास्त दिसत होती. त्यामुळे इथल्या उपहारगृहांतला मेनूही परदेशी लोकांना मानवेल असा दिसत होता. आणि त्यांचे दरही चढे होते. युरोपात बाहेर मोकळ्या हवेत बसून खाण्याची पद्धत आहे. इथेही त्याच पद्धतीने बाहेर टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. मधेच एखादा रुफ-टॉप कॅफे दिसत होता. चायनीज, जापनीज, रशियन वगैरे भाषांत लिहलेले फलक दिसत होते. साधा आलू पराठा देणारी जागा मात्र कुठेच दिसत नव्हती. आपल्याच देशात आपल्याच पद्धतीचं खाणं शोधावं लागणं यापेक्षा दुर्दैव ते काय? खरे तर स्थानिक बुंदेली पदार्थ जगासमोर मांडायची ही एक उत्तम संधी आहे. पण लक्षात कोण घेतो? असो. शेवटी एका आडबाजूला समोसा-जिलेबी-पोहे वगैरे विकणारे लहानसे दुकान दिसले. तिथे पोहे खाता-खाता दिवसभर कुठे-कुठे फिरायचे त्याची आखणी करू लागलो.  
पार्श्वनाथ मंदिराचा प्रचंड आकार

खजुराहो मध्ये एकूण ८५ मंदिरे होती. किंबहुना, ८५ मंदिरांच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांपैकी आज केवळ २२ मंदिरे उभी आहेत. या मंदिरांचे तीन मुख्य समूह आहेत – पूर्व, पश्चिम, आणि दक्षिण. पश्चिम समूह हा मुख्य समूह समजला जातो. इथली ११ मंदिरे ASI ने संरक्षक भिंत आणि सभोवती उद्यान वगैरे उभारून जतन केली आहेत. हा समूह हॉस्टेलच्या समोरच होता. इथे संध्याकाळी लाईट अँड साउंड शो असतो. त्यामुळे हा समूह संध्याकाळी बघायचा आणि तसेच शो बघायला जायचे असे मी ठरवले. पूर्व समूह हा खजुराहो गावाच्या पूर्वेकडे, साधारण ५ किमी अंतरावर आहे. ही मंदिरे काहीशी विखुरलेली आहेत. मी आधी ती मंदिरे बघायचे ठरवले. जवळच एक सायकलीचे दुकान दिसले. तिथून एक सायकल भाड्याने घेतली आणि निघालो. कॅमेरा आणि बॅग सांभाळत सायकल चालवणे म्हणजे कसरतच होती. जमवलं एकदाचं. वातावरण तसे ढगाळ होते. गारठा तर होताच. सायकलीवरून जाताना गार हवा अंगाला झोंबत होती. 

 
आदिनाथ मंदिर
छतावरचे सुरेख कोरीवकाम
 
अर्ध्या तासातच जैन मंदिरांपाशी पोहोचलो. या समुहात आदिनाथ, पार्श्वनाथ, आणि शांतीनाथ अशी तीन मंदिरे आहेत. आत शिरल्यावर पहिले दिसते ते शांतीनाथ मंदिर. दहाव्या शतकातल्या काही मंदिरांच्या अवशेषांना एकत्र करून १८७० मध्ये हे मंदिर बांधले गेले. गाभारा आणि मंडपातले काही खांब वगळता बाकी सारे बांधकाम नवीन होते. मंदिरातली शांतीनाथांची चौदा फूट उंच मूर्ती शांत आणि प्रसन्न वाटत होती. मंदिर नित्य पूजेत असल्याचे दिसत होते. तिथे थोडा वेळ थांबून मी बाहेर पडलो. समोरच होते पार्श्वनाथ मंदिर. मंदिराचा प्रचंड विस्तार बघून क्षणभर स्तंभित झालो. सुबक मूर्तींनी सजलेल्या भिंती आणि आकाशाला भिडू पाहणारे कळस कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये मावत नव्हते. तेवढ्यात एक जण गाईड हवा का म्हणून विचारायला आला. खजुराहोसारख्या ठिकाणी नुसती मंदिरे पाहण्यात काहीच अर्थ नाही. त्यांचा इतिहास, शिल्पांचे अर्थ समजून घ्यायचे असतील तर मार्गदर्शक हवाच. मग त्याच्यासोबत मंदिर फिरू लागलो. 
 
पायातला काटा काढणारी अप्सरा
आयलायनर लावणारी अप्सरा
वीणावादन करणारी सरस्वती
मंदिर एका मोठ्या चौथऱ्यावर उभारलेले होते. अर्धमंडपाचे खांब आणि छत अत्यंत नाजूक कोरीवकामाने सजवलेले होते. इथल्या शिल्पांमध्ये जैन आणि वैष्णव देवतांचे मिश्रण आढळते. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गंगा-यमुना कोरलेल्या होत्या. वरच्या भागावर विष्णू दशावतार होते. तर बाजूने आतमध्ये काळ्या पाषाणात घडवलेली पार्श्वनाथांची मूर्ती दिसत होती. हे मंदिर आधी आदिनाथांचे होते असे म्हणतात. सध्याची मूर्ती इथे १८६० मध्ये स्थापली गेली. गाभाऱ्यातून बाहेर पडून आम्ही प्रदक्षिणा मार्गाने फिरू लागलो. इथे अप्सरांच्या काही सुबक मूर्ती होत्या. हातात आरसा धरून कपाळावर कुंकू लावणारी, पायात शिरलेला काटा काढणारी, लहान मूल हातात घेतलेली, पत्र लिहणारी, आयलायनर लावणारी, पाठमोरी वळून शृंगार करणारी, अशा अनेक पोझेस तिथे पाषाणातून घडवलेल्या होत्या.
वरच्या बाजूला काही मैथुनशिल्पे होती. शिवाय काही देव-देवतांच्या मूर्तीही होत्या. तिथून बाहेर पडून मग आम्ही बाहेरची शिल्पे बघू लागलो. अप्सरांच्या तशाच काही मूर्ती इथेही होत्या. त्याव्यतिरिक्त अष्टदिक्पाल दिसत होते. राम-लक्ष्मण-सीता, लक्ष्मी-विष्णू, सरस्वती, श्रीकृष्ण यांच्याही मूर्ती होत्या. सर्व मूर्तींचे शरीरसौष्ठव उत्तम पद्धतीने साकारलेले होते. त्यांनी नेसलेली वस्त्रे, अलंकार, इत्यादींचे केलेले अत्यंत नाजूक चित्रण अचंबित करणारे होते. मला तर किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. तिथून आम्ही आदिनाथ मंदिराकडे वळलो. हे मंदिर थोडे लहान होते. मात्र एकंदर रचना सारखीच होती. इथेही बाहेरच्या बाजूने अप्सरा आणि देवतांच्या मूर्ती होत्या. गाईड प्रत्येक मूर्तीचे वैशिष्ट्य सांगत होता आणि मी ऐकता ऐकता फोटो काढत होतो. साधारण दीडेक तास तिथे घालवल्यानंतर मी पूर्व समुहातल्या इतर मंदिरांकडे वळलो. 
 
अप्सरा आणि देवतांच्या मूर्ती
 
वामन मंदिर, जवारी मंदिर आणि ब्रह्मा मंदिर अशी तीन मंदिरे खजुराहो गावाच्या पुढे, नरोरा तलावाच्या आसपास होती. पहिले दृष्टीस पडले वामन मंदिर. याची रचना काहीशी बसकी होती. शिखराच्या रेषा भिंतींशी सलग होत्या आणि शिखरावर इतर उपघटक नव्हते. बाजूने नेहमीची अप्सरांची आणि देवतांची शिल्पे होती. गाभाऱ्यात वामनाची चतुर्भुज मूर्ती होती. मूर्ती दुर्दैवाने भंगलेल्या अवस्थेत होती. अर्ध मंडपाच्या वरच्या बाजूला कोपऱ्यांमध्ये सुबक अशी गजशिल्पे दिसत होती. इथे थोडे फोटो काढून मी जवारी मंदिराकडे वळलो.
हे मंदिर काहीसे उभट आकाराचे होते. अर्धमंडप, मुखमंडप, आणि गाभारा अशी रचना होती. बाहेरच्या बाजूने शिल्पांचे तीन स्तर होते. मुख्य शिखर इतर उपशिखरांनी वेढलेले होते. वामन मंदिराप्रमाणेच या मंदिराला अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग नव्हता. गाभाऱ्यात विष्णूची चतुर्भुज मूर्ती होती. दुर्दैवाने हीही मूर्ती भंगलेली होती. आकार लहान असल्याने नजरेच्या एका टप्प्यात मंदिराचे स्थापत्यसौंदर्य अनुभवता येत होते. समोरच होते ब्रह्मा मंदिर. नरोरा तलावाच्या काठावर अगदी मोक्याच्या जागी हे मंदिर बांधले होते. मंदिराचा गाभारा वगळता इतर भाग शिल्लक नाहीत. गाभाऱ्यात चतुर्मुखी ब्रह्मदेवाची मूर्ती होती. बाकी रचना अत्यंत साधी होती. दारावरील मोजकी शिल्पे वगळता इतर काही कोरीवकाम नव्हते. मात्र चौथऱ्यावरून मागच्या तलावाचे विलोभनीय दृश्य दिसत होते. इथे मी जरा वेळ विसावलो. तेवढ्यात पावसाचे बारीक थेंब पडू लागले. पाऊस अजून वाढायच्या आत परतावे म्हणून मी लगेच निघालो. 
 
बसक्या आकाराचे वामन मंदिर आणि कोपऱ्यातली गजशिल्पे
भंगलेली वामन मूर्ती
जवारी मंदिर
जवारी मंदिरातली विष्णू मूर्ती
नरोरा तलावाच्या काठावरचे ब्रह्मा मंदिर
एव्हाना दुपारचे साडेबारा वाजे होते. जवळच्या हॉटेलवर जेवण उरकले आणि विश्रांतीसाठी हॉस्टेलवर परतलो. 
 
क्रमशः 

Leave a Reply