आता चढ सुरु झाला. सकाळी हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा आता नकोशा दमट उष्म्यात बदलला होता. चार पावलांवर दम लागत होता. चढण फार तीव्र नव्हती. आजूबाजूची गर्द वनराई ती चढण जरा सुसह्य करत होती. आधीच ढगाळ हवा, त्यात उंच झाडांचा विस्तारलेला पर्णसंभार. त्यामुळे रानात अगदीच अंधारलेले होते. सह्याद्रीतल्या अंधारबन ट्रेकची आठवण होत होती. थोड्या वेळातच प्रचंड पाण्याचा घुमणारा आवाज कानावर येऊ लागला. धबधब्याच्या जवळ पोहोचल्याची ती खूण होती. उजवीकडच्या दरी झाडांच्या गर्दीतून वेगाने वाहणारे पाणी अधेमध्ये दृष्टीस पडत होते. आता मात्र कधी एकदा धबधब्याचे दर्शन होतेय असे झाले होते.
एक वळण पार केले आणि अचानक दोन झाडांच्या मधून एक फेसाळता पांढरा पडदा दृष्टीस पडला. क्षणभर कळेचना हे पाणी आहे की ढग आहेत! थोडे अजून वर चढलो आणि त्या अखंड जलप्रपाताचे दर्शन झाले. गर्द वनराई नेसलेल्या त्या उंच पहाडावरून पाणी घोंघावत खाली कोसळत होते. पडता पडता त्याच्या अनेक शाखा-उपशाखा बनत होत्या. कातळ-कपाऱ्यांत खेळून त्या पुन्हा मुख्य प्रवाहास बिलगत होत्या. पाण्याचे ते रूप पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. सारा थकवा क्षणार्धात दूर झाला. थोडा वेळ ते सारे दृश्य नजरेत सामावून मी कॅमेरा बाहेर काढला. त्या जागेवरून फोटो फेसबुक डीपी काढण्यात आम्ही सारेच मग्न झालो. डाव्या बाजूने एक वाट थोडी खाली उतरत धबधब्याच्या दिशेने जात होती. प्रवाहाच्या थोडं जवळ जाता यावं म्हणून तिथून खाली उतरलो.
गर्द झाडीतून दिसणारा तांबडी सुर्ला धबधबा |
ती जागा एखाद्या कुंडासारखी होती. तिन्ही बाजूंनी डोंगर होते. समोरच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा उजवीकडे दरीत झेपावत होता. इथून पाण्याचा प्रवाह अगदी ढेंगभर अंतरावर होता. बाजूला एक लहानसे डबकेसुद्धा तयार झाले होते. जणू निसर्गाने आमची पाण्यात डुंबायची सोयच करून ठेवली होती. पण पाण्याचा प्रवाह खूपच जास्त होता. शिवाय वाटही निसरडी झाली होती. एक घसरलेले पाउल म्हणजे कपाळमोक्षच! त्यामुळे आम्ही फार पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या दगडावर बसल्या-बसल्या तो धबधबा अनुभवणे म्हणजे अक्षरशः शब्दातीत होते. मुख्य म्हणजे त्या जागी आम्ही सहा जण वगळता बाकी कोणीच नव्हते!
मुंबईजवळच्या प्रसिद्ध धबधब्यांजवळ दिसणारी गर्दी आणि गोंगाट इथे नव्हते. अशा शांततेत निसर्ग अनुभवणे आजकाल अप्राप्यच झाले आहे. ती शांतता उपभोगण्यासाठी मी त्या दगडावरच काही मिनिटे ध्यानस्थ झालो. समर्थ रामदासांनी शिवथर घळीचे वर्णन करताना लिहलेल्या ओळी मनात घुमत होत्या – गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे | धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे || प्रत्येक श्वासागणिक त्या धबधब आवाजाचा ताल मी अनुभवत होतो. तेवढ्यात बारीक पाऊस सुरु झाला. धबधब्याचे उडणारे तुषार भिजवत होतेच. आता पाउसही त्यात सामील झाला. पावसाबरोबर आलेल्या गार हवेच्या झोताने आता हुडहुडी भरू लागली. जेमतेम अर्ध्या तासापूर्वी दमट हवेत घामाघूम झालेले आम्ही आता त्या प्रपाताच्या शेजारी कुडकुडत उभे होतो. निसर्गाची किमया म्हणजे अजबच! इथे कॅमेरा काढायला मात्र काही वाव नव्हता. मनसोक्त धबधबा अनुभवून आम्ही तिथून निघालो.
येतानाची उताराची वाट अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. खालच्या ओढ्याजवळ फोटो काढायला थोडा वेळ थांबलो. पावसाने भिजवले होतेच. त्यामुळे आता ओढ्यात डुंबायची इच्छा होत नव्हती. शिवाय मंदिरातही जायचे होते. लवकरच आम्ही मंदिराबाहेरच्या दुकानांजवळ पोहोचलो. मंदिराचा परिसर भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केला आहे. मंदिरात तुरळक गर्दी होती. प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि समोरच काळ्या बेसाल्ट पाषाणामध्ये घडवलेले सुबक मंदिर नजरेस पडले. आजूबाजूच्या गर्द हिरव्या रानाच्या पार्श्वभूमीवर ते काळ्या पाषाणातले मंदिर फारच उठून दिसत होते. हे मंदिर बाराव्या शतकात कदंब राजवटीत बांधले गेले. मंदिरासाठी वापरला गेलेला दगड हा त्या परिसरात सापडणाऱ्या लाल खडकाशी मिळता-जुळता नाही. त्यामुळे तो घाटमाथ्यावरून आणला गेला असावा असा कयास आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराची शैली कर्नाटकातील ऐहोळे येथील मंदिरांवर बेतलेली असून कळस अर्धवट बांधलेला आहे. या शैलीतले गोव्यातले हे एकमेव मंदिर आहे. घनदाट रानात बांधलेले असल्याने हे मंदिर परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहिले. मंदिरातले शिवलिंग अजूनही पूजेत आहे.
तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर |
आम्ही बूट काढून आत शिरलो. मंदिराच्या पायऱ्या चढताना पायांवर ट्रेकचा परिणाम जाणवत होता. गोव्यातल्या इतर मंदिरांपेक्षा हे तसे लहानसेच होते. मात्र त्यावरची कोरीवकला फारच सुरेख होती. मंडपातले स्तंभ साधेच होते; मात्र भौमितिक आकारांनी त्यांचे साधेपण खुलून दिसत होते. छतावारचे पानाफुलांचे कोरीवकाम फारच सुरेख होते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहाच्या बाहेर असलेले नागांचे शिल्प. साधारण दीड फूट उंचीचे, नागांचे शिल्प कोरलेले दोन आयताकृती दगड गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन बाजूंना ठेवलेले होते. जणू देवाचे द्वारपाल. आतमध्ये शिवलिंगासमोर निरांजन तेवत होते. दोन-चार फुले वाहलेली दिसत होती. त्या निरांजनाच्या मंद प्रकाशात ते गर्भगृह काहीसे गूढ मात्र तरीही प्रसन्न वाटत होते. दर्शनानंतर आम्ही मंदिराबाहेर पडलो. मंदिराच्या बाहेरील भिंतींवरचे कोरीवकाम अजूनच सुंदर होते. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
छतावरील सुरेख कोरीवकाम |
द्वारपालांसदृश वाटणारी नागशिल्पे |
रिसॉर्टवर परत आलो तेव्हा सुग्रास भोजन स्वागताला हजर होतेच. आम्ही लगेचच आवरून जेवणावर ताव मारला. जेवता-जेवता सहज माझं पायाकडे लक्ष गेलं आणि पाहतो तर काय, पायावर रक्ताचे ओघळ! ना काही वेदना ना काही जळजळ. हे म्हणजे हमखास जळूचे काम. पश्चिम घाटातली जंगले म्हटली की जळवा आल्याच. आता या ट्रेकमध्ये कोणत्या जागी जळू माझ्यावर पायावर चढली देव जाणे! तिच्या चाव्याने वाहू लागलेलं रक्त काही थांबत नव्हतं. जळवेच्या लाळेत हिपॅरीन नामक पदार्थ असतो जो रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवतो. मी दर दहा मिनिटाला रक्त पुसत होतो. शेवटी दोनेक तासांनी रक्त वहायचे थांबले. आश्चर्य म्हणजे केवळ मलाच हा जळवांचा अनुभव आला होता. असो. रिसॉर्टच्या मागच्या बाजूने एक नदी वाहत होती. परतीच्या प्रवासाला अजून वेळ होता. नदीकाठी थोडा वेळ घालवला आणि चहापान करून सामान आवरायला घेतले.
ट्रेकमध्ये जमलेला धमाल ग्रुप |
पाचच्या सुमारास आम्ही रिसॉर्टवरून निघालो. कुळें स्टेशनवरून मडगाव आणि तिथून मत्स्यगंधा एक्स्प्रेसने मुंबई असा बेत होता. ट्रेक संपल्याची हुरहूर मनात होती. पण गोव्यातले एक फारसे परिचित नसलेले ठिकाण अनुभवल्याचे समाधान मनात होते.