Tambadi Surla Trek – Part 1 – The Trail through a Dense Forest | तांबडी सुर्ला ट्रेक – भाग १ – घनदाट अरण्यातली पाऊलवाट

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात नयनरम्य समुद्रकिनारे, देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी, सळसळतं नाईटलाईफ, आणि एकूणच मस्तीभरा माहोल! पण याच गोव्याची फारशी परिचित नसलेली एक बाजूही आहे. ती म्हणजे पश्चिम घाटातले धबधबे, पुरातन मंदिरे, आणि वन्यजीवन. गेल्या काही वर्षांत चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातल्या दृश्यामुळे दूधसागर धबधबा नको तितक्या प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पण त्याच्याच आजूबाजूचे इतर धबधबे मात्र अजूनही त्यांचे रांगडेपण जपून आहेत. असाच एक धबधबा म्हणजे तांबडी सुर्ला. तिथलं घनदाट अरण्य, गर्द वृक्षराजीत लपलेला धबधबा, आणि पायथ्याचं प्राचीन शिवमंदिर याविषयी ट्रेकिंग समुदायाकडून बरेच काही ऐकून होतो. बरेच दिवस ती जागा to-do list वर होती. यंदाच्या पावसाळ्यातले ट्रेक ठरवताना अचानक एका परिचित ग्रुपच्या शेड्युलवर तांबडी सुर्ला ट्रेक दिसला. वेळेचं गणित जुळून येतंय असं दिसताच ट्रेक बुक करून टाकला. 
 
तांबडी सुर्ला ट्रेक फोटो कोलाज

ठरलेल्या वेळेप्रमाणे पुणे स्टेशनवर ग्रुप लीडर आणि इतर मेम्बर्सना भेटलो. शनिवारी साधारण साडेचारच्या सुमारास आमचा गोवा एक्सप्रेस ने प्रवास सुरु झाला. वाटेतल्या हरएक स्टेशनात थांबत डुगडुगत जाणारी ती गाडी गोव्याला पोहोचायला तब्बल १२ तास घेते! पण थेट कुळें स्टेशन गाठायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. असो. गाडीत दूधसागरला जाणारा तब्बल ६० जणांचा ग्रुप होता. आणि तांबडी सुर्लाला जाणारे आम्ही फक्त पाच! अश्विनी, अपर्णा, प्रिया, आणि स्मिता अशा मुंबईच्या चार मैत्रिणी एकत्र आल्या होत्या. ट्रेक लीडर म्हणून पुण्याचा हरपाल होता. सगळ्या ग्रुपसोबत लगेचच मैत्री झाली आणि गप्पांचा फड रंगला.

मग ट्रेकिंग मधले किस्से, भुता-खेताच्या गोष्टी, आणि काय नि काय. ट्रेनमधल्या गप्पांना विषयांचा कधी अंतच नसतो. कुळें स्टेशन पहाटे साडेचारला येणार होतं. साडेदहाच्या आसपास गप्पा आणि जेवण आवरून आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. पण एकतर स्लीपर क्लास, त्यात सगळ्या कुडमुड्या स्टेशनांवर थांबणारी गाडी, आणि दूधसागर वाला ६० जणांचा ग्रुप, यांमुळे आज झोप काही नशिबात नाही हे लवकरच कळून चुकले! जरा वेळ डोळा लागतोय तर कुठले तरी स्टेशन हजर! त्यात दूधसागर ट्रेकला जाणाऱ्यांना पहाटे साडेतीनच्या सुमारास धबधब्याजवळच्या कुठल्याशा अडनिड्या स्टेशनावर उतरायचे होते. त्यामुळे त्यांची तर दोन वाजल्यापासूनच खुडबुड सुरु झाली होती. 

 
तांबडी सुर्ला मंदिराचे स्थान
 
गाडी तासभर उशिराने धावत होती. पहाटे पाचच्या सुमारास अर्धवट झोपेतच आम्ही कुळें स्टेशनवर उतरलो. जवळच्याच एका जंगल रिसॉर्टवर एका दिवसाची राहण्या-जेवण्याची सोय केलेली होती. दहा मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो. सात वाजता नाश्ता वगैरे करून ट्रेकला निघायचे असे ठरवून आम्ही आन्हिकं उरकायला रूमवर गेलो. रूममधला पलंग पाहून वाटलं जरा वेळ डुलकी काढूया. तसाही चार मुलींना आवरायला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. असे म्हणून मी आणि हरपाल जरा पहुडलो. रात्रभर अर्धवट झोप झाल्याने पटकन डोळा लागला. दारावरची थाप ऐकून खडबडून जाग आली आणि घड्याळात पाहतो तर काय, सव्वासात!! या चौघी जणी सगळं आवरून-सावरून घुश्शातच बाहेर उभ्या होत्या. त्यात नाश्त्याची तर ऑर्डरपण दिलेली नव्हती. बाहेर ड्रायव्हर ताटकळत उभा होता! पाच मिनिटांची डुलकी फारच महागात पडली होती. आम्ही लगेचच नाश्त्याची ऑर्डर दिली आणि घाईघाईत आवरायला लागलो. सगळं होईस्तोवर आठ वाजले. तसा संपूर्ण दिवस हाताशी होता. त्यामुळे तासभर उशीर म्हणजे काही फार काळजीचं कारण नव्हतं. 
 
भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य प्रवेशद्वार
 
एकदाची आमची वरात निघाली. वातावरण प्रसन्न होतं. ऑगस्ट महिना असला तरी पावसाचा जोर फार नव्हता. रात्री कधीतरी एखादी सर येऊन गेलेली असावी. हवेतला तो ओलसर गारवा हवाहवासा वाटत होता. चिंब वनराई आळोखे-पिळोखे देत होती. गर्द झाडीतून जाणारा तो तुळतुळीत डांबरी रस्ता अजूनही झोपल्यागतच वाटत होता. मधेच उतरत्या छपराची, भलामोठा सोपा असलेली टुमदार घरे दिसत होती. अगदी तळकोकणात असावे असे वाटत होते. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले गोव्यातले जिल्हे म्हणजे एक वेगळीच दुनिया! पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली फारसा न आलेला हा भाग गोव्याच्या मूळ संस्कृतीचे दर्शन घडवतो. त्यामुळेच या भागाचे कोकणाशी असलेले साधर्म्य अगदी उठून दिसत होते. हळूहळू घरे मागे पडली आणि घनदाट अरण्य सुरु झाले. इतक्यात ‘भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य’ असा फलक दिसला. तिथून पुढे निघालो आणि आजूबाजूचे रान अजूनच दाट झाल्यासारखे भासू लागले. अर्ध्या तासातच आम्ही तांबडी सुर्ला महादेव मंदिरापाशी पोहोचलो. इथूनच ट्रेक सुरु होतो. सकाळची वेळ असल्याने परिसर अगदी शांत होता. मंदिराबाहेरचे दुकानदार नुकतेच दुकान उघडून चहाचा घोट घेत बसले होते. आम्ही लगेचच ट्रेक सुरु केला.
 
घनदाट रानातली पाऊलवाट
मंदिराच्या बाहेरून रानात शिरणारी ती तांबूसराड वाट आम्ही धरली आणि मोठ्या उत्साहात पुढे निघालो. पाचेक मिनिटातच गर्द रानाच्या मध्यात पोहोचलो. रानाचा तो विशिष्ट वास आसमंतात भरून राहिला होता. बाजूनेच एक ओढा खळाळत होता. मी लगेचच कॅमेरा बाहेर काढला. नशिबाने पाऊस नव्हता. इकडे-तिकडे फोटो काढत आमचा ट्रेक सुरु होता. पावसाळी ट्रेकिंग मध्ये वाटेत येणारे ओढे पार करणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. विशिष्ट दगडांवर पाय टाकत, तोल सावरत, कमीत कमी ओले होत पुढे जायचा उगीच प्रयत्न करायचा. मग शेवटी थोडा भिजलोच आहे अजून भिजूया असे म्हणून पाण्यातच बसकण मारायची! इथला ओढा काही त्याला अपवाद नव्हता. पण आज भिजण्यासाठी धबधब्यावर जायचे होते. म्हणून ओढ्याचा मोह टाळून आम्ही पुढे निघालो. आता वाट लहान-मोठ्या चढ-उतारावरून जात होती. रानातल्या दमट उष्म्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. हवेतली आर्द्रता एवढी होती की चष्म्यावर सतत बाष्प जमा होत होते. अशी आर्द्रता कॅमेराला फारच मारक. मी मुकाट्याने कॅमेरा आत टाकला. 
 
हिरवंगार रान आणि खळाळणारा ओढा
क्रमशः 

Leave a Reply