वादी रमच्या वाळवंटातले इतर काही वैशिष्ट्यपूर्ण पहाड बघून आम्ही पाच वाजेपर्यंत कॅम्पवर पोहोचलो. डोंगरकड्याच्या आश्रयाने, एका खोलगट भागात
तो कॅम्प उभारला होता. राहण्या-जेवण्याच्या सर्व आवश्यक त्या सुविधा तिथे उपलब्ध होत्या. सामान-सुमान तंबूमध्ये टाकून आम्ही कॅम्पच्या बाहेर सूर्यास्त बघायला म्हणून येऊन थांबलो. जसजसे सूर्यबिंब क्षितिजावर सरकू लागले तसतसा आजूबाजूच्या
डोंगरकड्यांचा रंग बदलू लागला. लालबुंद झालेल्या सूर्याच्या प्रभेने ते डोंगर आणि त्याखालची वाळू अक्षरशः चमकू लागली. त्या काही क्षणांसाठी तिथले भूदृश्य म्हणजे मंगळाचा पृष्ठभाग वाटत होता. मंत्रमुग्ध होऊन आम्ही सारे निसर्गाची किमया पाहत होतो. माझ्या कॅमेराला तर जराही उसंत नव्हती.