हळू हळू धीर करून मी पाण्यात उडी मारली. दोन्ही हातांनी त्या चौकटीला घट्ट पकडून चेहरा पाण्याखाली नेला. आणि काय ते दृश्य! रंगीबेरंगी प्रवाळ आणि त्यावर पोहणारे लहान-लहान मासे! त्यातले धमक पिवळ्या रंगाचे प्रवाळ तर फारच आकर्षक दिसत होते. त्यांचे आकार तर कित्ती वेगवेगळे! काही हातातल्या पंख्यासारखे, काही काटेरी झुडुपांसारखे, काही गोल स्पंजसारखे, तर काही वळवळणार्या सापासारखे. सगळे दृश्य अगदी डिस्कवरी चॅनेल वर दाखवतात तसे दिसत होते. काश माझ्याकडे गो-प्रो असता!