अर्ध्या तासातच आम्ही गावाजवळ पोहोचलो. मारयान हा एक प्रशिक्षित आणि अनुभवी गुहावलोकन तज्ञ होता. त्याने आम्हाला गुहेत जाण्यासाठीचे कपडे आणि उंच बूट दिले. शिवाय हेल्मेट, एक मजबूत दोरी वगैरे साधने दिली. हेल्मेटवर पुढच्या भागात एक छोटी ज्योत तेवत होती. हा होता आमचा हेड-लॅम्प! बाजारात स्वस्तात मिळणारे LED दिवे म्हणजे रयानसाठी चेष्टेचा विषय होता. ज्योतीमुळे पडणारा पिवळसर प्रकाश गुहेत जो अनुभव देतो त्याची मजा LED दिव्याने येत नाही असं त्याचं मत होतं.